जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अमोलकचंद विधी मार्फत चर्चासत्र
यवतयमाळ:
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि अमोलकचंद विधी महाविद्यालयाच्या “विधि सेवा चिकित्सा केंद्र ” यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जागरूकतेसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती चे डॉ. प्रकाश दाभाडे , श्री नथमल गोयनका विधी महाविद्यालय अकोला चे प्राचार्य गजानन एगावकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. अध्यक्ष स्थानी जिविसेप्रा चे सचिव, न्यायाधीश एम.आर.ए.शेख होते तर प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार यांची प्रमुख उपस्थिती होती
.
डॉ. प्रकाश दाभाडे यांनी मुलांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ यावर मार्गदर्शन करतांना कायद्याची पार्श्वभूमी व त्यातील महत्वाच्या तरतुदींवर भाष्य केले. शिक्षण विषयक संविधानिक तरतुदी , दुरुस्तीनंतर झालेले बदल आणि न्यायालयीन खटल्यात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निवाडे याची विस्तृत माहिती दिली.उन्नीकृश्नन खटल्यातील बारकावे आणि कायदा अस्तित्वात आल्यानंतर ची सामाजिक परिस्थिती यावर चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत बालकांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेत असून मनमानी करणाऱ्या शाळांवर कठोर कार्यवाही ची तरतुद असल्याचे त्यांनी म्हटले .कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले त्यावर ही त्यांनी समाधानकारक चर्चा करून निरसन केले.
प्राचार्य गजानन एगावकर ह्यांनी अनैतिक मानवी देहाचा व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ यावर मार्गदर्शन केले. कायदा तयार झाला तेव्हाची परिस्थिती आणि सध्याच्या बदलत्या तांत्रिक परिस्थितीत बराच बदल झाल्याने कायद्यात काही संरचनात्मक बदल आवश्यक असल्याचे त्यांनी भाष्य केले. वेश्या व्यवसाय, कुंटनखाने ,सुधारगृहांची स्थिती , कायद्याने नियमन केले असले तरी मोठ्या प्रमाणात अनैतिक व्यापार होतात आणि मुले मुली तसेच महिला याच्या बळी ठरत आहेत. शोषण झालेल्या व्यक्तीच नंतर शोषण करतांना दिसतात.अनेक ठिकाणी मानवी अवयवांची तस्करी पण होताना दिसते.
बदलत्या सामाजिक व तांत्रिक युगीन संदर्भात आज कायद्याच्या कडक अंमलबजावणीची गरज असल्याचे ते म्हणाले. सांविधानिक व आंतरराष्ट्रीय कायद्याचा संदर्भ देत त्यांनी कायद्याचे अनेक पैलू उलगडून दाखविले.
न्यायाधीश एम.आर.ए. शेख यांनी अध्यक्षिय भाषणात कायदेविषयक मुद्यावर चर्चासत्राची गरज असल्याचे ते म्हणाले. यामुळे कायदेविषयक जागरूकता निर्माण होण्यास मदत होते परिनामी कायदे प्रभावीपणे अंमलबजावणी करता येतात. तसेच काही तृटी असल्यास त्या संबंधितांच्या लक्षात आणता येतात असे विचार मांडले.
सुरूवातीला प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार यांनी प्रास्तविक करून चर्चासत्राची रूपरेषा विषद केली.
चर्चासत्राचे संचालन डॉ. विजेश मुणोत ह्यांनी केले तर विधी सेवा चिकित्सा केंद्राचे प्रभारी डॉ. संदीप नगराळे यांनी आभार मानले.
याप्रसंगी प्रा. वैशाली फाळे, प्रा.छाया पोटे,प्रा.स्वप्नील सगणे, प्रा.अंजली दिवाकर,प्रा.वंदना पसारी आदी शिक्षक आणि तिनशे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.