खरीपपूर्व शेती मशागतीला इंधन
दरवाढीचा बसतोय फटका!
शेतीच्या कामाला वेग
त-हाडी- यावर्षी पाऊस वेळेवर दाखल होण्याचे संकेत हवामान खात्याने दिल्याने शिरपुर तालुक्यातील त-हाडी परिसरात खरीपपूर्व शेतीकामांना वेग आला आहे. ट्रॅक्टरने मशागत केली जात असून इंधन दरवाढीचा मात्र शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
गेल्या वर्षी बेमोसमी पावसाने शेतातील पिकांचे अतोनात नुकसान केल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. यावर्षीच्या खरिपात तरी निसर्ग साथ देईल आणि शेतीतून काहीतरी उत्पन्न हाती येईल या आशेने शेतकरी मशागतीत व्यस्त झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. बैलजोडीद्वारे अनेक शेतकरी आपल्या शेतात मशागत करतात. मात्र, ज्यांच्याकडे बैल नाहीत त्यांना आधुनिक पद्धतीच्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून, शेती मशागत केली जात आहे. यापेक्षा ट्रॅक्टर सहज उपलब्ध होत आहेत. शिवाय, वेळेची बचत होते आणि शेतीची नांगरणी खोलवर होते. यामुळे शेतकऱ्यांचा
ट्रॅक्टरद्वारे मशागतीकडे कल वाढला आहे.
परंपरागत बैलजोडीच्या साह्याने मशागत न करता आधुनिक पद्धतीने म्हणजेच ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्यावर सध्या जोर दिसून येत आहे. यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला कापूस, मूग या पिकासासाठी शेतकरी शेतीची मशागत करण्यासाठी भर उन्हामध्ये तयारी करताना दिसत आहे..
नांगरणीच्या तासा वाढले दर
ट्रॅक्टरच्या साह्याने नागरणी करताना शेतकऱ्याला मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी इंधन दरवाढीमुळे २१०० ते २२०० रुपये प्रति तास पैसे मोजावे लागत आहे. तर मागील वर्षी हाच दर सतराशे ते अठराशे रुपये एवढा होता.







