१० जुलै – मातृ सुरक्षा दिन
त-हाडी
आज मातृ सुरक्षा दिन !
२००५ सालापासून १० जुलै हा दिवस ‘मातृ सुरक्षा दिन’ मानला जातो. जागतिक आरोग्य संघटनेनं याची जगभर अंमलबजावणी सुरू केली. मातेचं संगोपन आणि मातृत्वादरम्यानच्या कालावधीत होणाऱ्या मातांच्या मृत्युदरात झालेली वाढ, त्यांची होणारी परवड रोखण्यासाठी हा प्रयत्न सुरू झाला.
परंतु त्या आधीपासूनच आपल्या संस्कृतीनं माता व तिला होणाऱ्या बाळाच्या काळजीचा विचार केला आहे. तंत्रज्ञान वा माध्यमांच्या प्रगतीमुळे काळ आणि तंत्रज्ञान कितीही पुढे गेलेलं असलं तरीही आज झालेल्या जाणीवेला, जागृतीला संस्कारांचं आणि संस्कृतीचं मोठं पाठबळ असावंच लागतं.
हिरवंगार गर्भरेशमी वस्त्र परिधान केलेल्या धरतीलाही ‘मातृत्व’ (नवनिर्मिती होत असतानाच्या) प्राप्त होण्याच्या काळातच, म्हणजे १० जुलैला ‘मातृसुरक्षा दिन’ साजरा केला जातो, हा एक योगायोगाच म्हणायला हवा. कारण स्त्री ही सर्जनशील धरतीचीच प्रतिमा आहे.
आज जागतिक पातळीवर ‘मातृ सुरक्षा दिन’ साजरा होत असला, तरी भारतात मात्र प्राचीन काळापासूनच मातृसुरक्षेचा विचार झाला असल्याचा संदर्भ आढळतो. मातृत्वाशी सुसंगत उपमा देऊन असं म्हणता येईल, की या विषयालाही ‘दुधा’वरील मृदुमुलायम सायीप्रमाणे कोमल स्तर आहेत.
आज मात्र ‘मातृसुरक्षा दिना’ ची आजच्या मातृ सुरक्षेइतकीच उपेक्षा झालेली दिसते. १० जुलैला साजऱ्या होणाऱ्या मातृसुरक्षा दिना मध्ये दोन अपत्यांदरम्यानच्या योग्य अंतराचा विचार केला गेला आहे. यानंतरचा दुसरा दिवस म्हणजे ११ जुलै हा ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
अशा प्रकारे या दोन दिवसांचा परस्परांशी संबंध आहे. दोन मुलांमध्ये जर सुरक्षित अंतर राहिलं नाही, तर मातेचं व पर्यायानं बालकाचंही आरोग्य धोक्यात येईल. वारंवार धूप होऊन कस कमी होत जाणाऱ्या जमिनी सारखी मातेची अवस्था होईल. ज्यामुळे तिचं मातृत्व हे ‘लाभलेलं’ न होता ‘लादलेलं’ होईल. जर दोन मुलांमधला ‘पाळणा लांबवला नाही’ तर ‘जगाच्या उद्धारासाठी’ तिच्या हाती असलेल्या ‘पाळण्याच्या दोरी’ चा तिच्याच ‘गळ्याभोवती फास’ होऊ लागेल.
मातृत्वप्राप्तीचा आनंद खरोखरच ‘दिव्य’ (स्वर्गीय) असला, तरी ते प्राप्त होण्यासाठीही तिला ‘दिव्या’तून जावं लागतं. म्हणूनच ‘सुखप्रसूती’ हाही मातृसुरक्षेचाच एक भाग आहे.