सु.ए.सो. ज्युनियर कॉलेज कळंबोली येथे १२ वीच्या विध्यार्थांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान संपन्न
जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल आणि सुधागड एज्युकेशन सोसायटी चे ज्युनियर कॉलेज कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान संपन्न
कळंबोली (साहित्यभूमी प्रतिनिधी )- जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल आणि सुधागड एज्युकेशन सोसायटी चे ज्युनियर कॉलेज कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत सुधागड विद्यासंकुल च्या प्रशस्त सभागृहात डॉ. महेश अभ्यंकर ( मुंबई ) यांचे स्पर्धा परीक्षा तयारी बाबतचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन ( व्याख्यान ) संपन्न झाले.
या व्याख्यान समारंभाचे अध्यक्ष सुधागड विद्या संकुलाचे प्राचार्य मा.श्री. राजेंद्र पालवे सर , अतिथी मार्गदर्शक डॉ. महेश अभ्यंकर,जाणीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर, सुधागड विद्यासंकुलातील कार्यालयीन प्रमुख सौ. बीना मॅडम, ज्येष्ठ प्राध्यापक श्री जितेंद्र पवार अश्या मान्यवर मंडळी समारंभाच्या व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सदर कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आला. प्रा. सौ चारू तबकडे आणि विद्यार्थिनींनी ईश स्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ केला. निवेदिका प्रा.सौ. स्वाती पाटील यांनी समारंभाचे अध्यक्षपद मा. प्राचार्य पालवे सरांनी भूषावावे अशी विनंती केली तर प्रा. के. ए. पाटील यांनी अध्यक्ष निवडीला अनुमोदन दिले. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचा परिचय आणि सत्कार प्रा. एल.एल.कोळेकर यांनी सादर केला. मान्यवरांना सुधागड संकुल तर्फे पुष्पगुच्छ आणि जाणीव संस्थे तर्फे भेट वस्तू प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
समारंभाचे प्रास्ताविक भाषण करताना जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर यांनी जाणीव संस्थेचे सामाजिक , शैक्षणिक उपक्रमाबद्दल माहिती देताना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी जाणीव तर्फे हा उपक्रम राबवताना सुधागड संकुलाचे प्राचार्य श्री पालवे सर व जाणीव चे प्रकल्प संचालक प्रा. संजय पाटील यांनी सहकार्य केल्यानेच हा उपक्रम प्रत्यक्ष साकार झाल्याचा आनंद होत आहे असे म्हटले. असेच उपक्रम पनवेल आणि परिसरातील शाळांमध्ये राबवण्याचा मानस श्री गोरेगावकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात व्यक्त केला.
प्राचार्य पालवे सर- विद्यार्थी हिताचे उत्तमोत्तम उपक्रम जाणीव सामाजिक सेवा संस्था राबवते आणि त्यासाठी आपला अमूल्य वेळ देऊन डॉ. अभ्यंकर आमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा स्रोत ठरतात याचा मनस्वी आनंद वाटतो.
आजच्या समारंभाचे अतिथी मार्गदर्शक डॉ. महेश अभ्यंकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून सीईटी,जेईई आणि नीट यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना अविश्रांत मेहनत , टाईम मॅनेजमेंट , शारीरिक आणि मानसिक स्वास्थ यांचे नियोजन कसे असावे याबाबत माहिती दिली. तब्बल दोन तास अतिशय प्रभावी पद्धतीने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे उपस्थिती विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना डॉ. महेश अभ्यंकर यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित विद्यार्थी , पालक आणि शिक्षकांनी डॉ. अभ्यंकर यांच्या वैशिष्टपूर्ण सादरीकरणाला टाळ्यांच्या कडकडाटाने भरभरून प्रतिसाद दिला.
या समारंभाला सुधागड ज्युनियर कॉलेज कळंबोली येथील १२ वी सायन्स चे ४०० विद्यार्थी , त्यांचे पालक , सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी आणि जाणीव संस्थेचे श्री महेश मुद्रस, श्री अवधूत गोंधळेकर, श्री संजय पाटील आदी मान्यवर या समारंभाला उपस्थित होते. या समारंभाचे सूत्र संचालन प्रा. सौ. स्वाती पाटील यांनी केले तर आभार प्रकटीकरण प्रा. सौ. चारू तबकडे यांनी मानले.