त-हाडी परिसरात फुलोऱ्यातील तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव; शेतकरी आर्थिक संकटात
त-हाडी प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यातील त-हाडीसह परिसरात मागील चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.
सध्या तुरीचे पीक फुले व शेंगाच्या अवस्थेत असून, या पिकावर शेंगा पोखणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तुरीचे उत्पादन वाचविण्यासाठी शेतकरी कीटकनाशक औषधींची फवारणी करू लागला आहे.
परिसरातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे अगोदरच खरीप हंगामातील सोयाबीन व कापसाचे नुकसान झाल्यामुळे चिंतेत आहेत. परतीच्या पावसामुळे शेतातील तूर पीक चांगले आले आहे. त्यामुळे तूर पिकावरच शेतकऱ्यांचे पुढील आर्थिक नियोजन अवलंबून राहणार आहे. मृग नक्षत्रामध्ये चांगला पाऊस न झाला व वेळेवर पेरणी झाली होती; परंतु त्यानंतर पावसाने दोन महिने उघडीप दिल्यामुळे उडीद, मूग, सोयाबीन या कमी कालावधीच्या पिकावर मोठा फटका बसला होता.
ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यातील परतीचा पाऊस तूर पिकाला पोषक ठरला गेला. आता तुरीचे पीक फुले बहरावर व काही ठिकाणी शेंगात दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत; मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने तूर पिकास घातक ठरू लागले आहे. अशा वातावरणात तुरीवर किडींचा प्रादुर्भाव होत आहे. हिरवी अळी, बोंडअळी, पाने गुंडाळणारी अळी, घाटेअळी, तसेच शेंग माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे.
तुरीचे पीक फुलोऱ्यात आल्यानंतर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होते. त्यामुळे तूर पिकाचे सर्वांत जास्त नुकसान होते. पीक वाचविण्यासाठी काही शेतकरी महागड्या कीटकनाशक औषधींची फवारणी करू लागले आहेत. खरीप हंगामातील नुकसानीमुळे आर्थिक कचाट्यात सापडलेले अनेक शेतकरी मजुरीसाठी तरतूद नसल्याने स्वत: फवारणी करीत आहेत.
शेतशिवारांत सध्या तूर पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे.
या वातावरणात या किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या किडींचा प्रादुर्भाव कळ्या व फुले लागल्यापासून शेंगांपर्यंतच्या काळात आढळून येतो. शेंगा पोखरणऱ्या अळ्या सुरवातीला पिकाच्या कोवळ्या पानांवर, फुलांवर किंवा शेंगांवर उपजीविका करतात. नंतर शेंगा भरताना त्या दाणे खातात. दाणे खात असताना त्या शरीराचा पुढील भाग शेंगांमध्ये खुपसून व बाकीचा भाग बाहेर ठेवलेल्या अवस्थेत शेतात आढळतात. त्यामुळे आतील कोवळ्या दाण्याचे जवळपास 60-80 टक्के नुकसान झाले आहेत.






