पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा; शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप
त-हाडी प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यासह त-हाडी परिसरातील शेती निसर्गाच्या भरवशावर असल्याने कोणते संकट येईल व पिके होत्याची नव्हती होतील हे सांगता येत नाही. त्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी शासनाच्या मदतीकडे डोळे लाऊन आहे. परंतु पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्यामुळे शेतकरी नाराज आहेत.
नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी शासनाच्या वतीने सुरक्षा कवच म्हणून पीक विमा योजना सुरू आहे. मात्र, योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम संबंधित कंपन्या करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
यावर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊनही मोबदला देण्यास टाळाटाळ केली जात आहे. कंपन्या प्रसंगी स्वतःचे नियम लावून शेतकऱ्यांची बोळवण करतात. तर, काही शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला देऊन त्यांची थट्टा केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत.
भविष्यात पीकविमा काढण्यावर याचा मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे.
गत वर्षापासून पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. पीकविमा भरलेला असताना आणि विमा मिळण्यासाठी पात्र असतानाही विमा न देता | टाळाटाळ करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट दोन वर्षापासून सुरू आहे. सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. भरपाईसाठी शेतकऱ्यांची पीकविमा कंपनीकडे तक्रारी वजा अर्ज केले.







