पडळकरवाडी व कुरुंदवाडीत कभी खुशी कभी गम…
बिनविरोध साठी नेत्यांचा प्रयत्न असफल, अखेर निवडणूक लागलीच
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यांमध्ये सर्वच राजकीय नेत्यांनी आपापल्या गावची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु काही ठिकाणी यश आले, तर अनेक ठिकाणी अपयश आले.
त्यामध्ये आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील पडळकरवाडी व कुरुंदवाडी येथे सुद्धा सर्वच राजकीय नेत्यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु काही प्रमाणामध्ये यश आले तर काही सदस्यांचे व सरपंच पदाचे अर्ज राहिल्याने या दोन्ही गावांमध्ये निवडणूकीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
पडळकरवाडी येथे गावातील ग्रामस्थांनी एकत्र बसून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवले होते. परंतु गावातीलच काही नागरिकांना हा निर्णय मान्य नसल्याने पडळकरवाडी येथे सरपंच पदासाठी 2 अर्ज दाखल झाले, तर तिन्हीही वार्ड मध्ये अर्ज दाखल झाले असल्याने येथे निवडणूक लागली आहे.
वार्ड क्रमांक 1 मध्ये 2 अर्ज वार्ड क्रमांक 2 मध्ये 1 अर्ज वार्ड क्रमांक 3 मध्ये 1 अर्ज जादा झाल्याने येथे निवडणूक लागली आहे तर 3 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
कुरुंदवाडीमध्ये एकूण सात सदस्य व सरपंच एक असे आठ जण सदस्य असून त्यापैकी वार्ड क्रमांक दोन व तीन मध्ये प्रत्येकी दोन दोन अर्ज राहिल्याने व सरपंच पदासाठी एकच अर्ज असल्याने येथे बिनविरोध निवडणूक झाली आहे.
परंतु वार्ड क्रमांक एक मध्ये तीन अर्ज जास्त असल्याने वार्ड क्रमांक एक साठी निवडणूक लागली आहे.
पडळकरवाडी व कुरुंदवाडी या गावातील गावगाड्यातील म्होरक्यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले होते, सर्व राजकीय भेदभाव बाजूला ठेवून सर्वजण एकत्र आले होते. परंतु आम्हाला या प्रक्रियेमध्ये का विचारले नाही म्हणून काही नागरिकांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला व निवडणुकीमध्ये आपले अर्ज दाखल केले आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून व निवडणुकीचा प्रोग्रॅम प्रसिद्ध झाल्यापासून दोन्ही गावांमध्ये निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी पक्ष बाजूला ठेवून गावचा खर्च वाचवण्यासाठी व गावचा विकास एका विचाराने करण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्धार केला होता. परंतु काही हेवेदावे असल्याने पुन्हा बिनविरोधचा प्रयत्न अयशस्वी झाला असून वरील दोन्ही गावांमध्ये काही प्रमाणात अर्ज राहिल्याने येथे निवडणुका होणार हे स्पष्ट झाले आहे.







