तानाजी पाटील यांच्याविरोधात ईडी कडे तक्रार….
एक हजार सत्तर एकर जमीन बलकावल्याचा आरोप :
संपूर्ण पाटील कुटुंबाची चौकशीची मागणी :मच्छिंद्र माळी यांनी केली तक्रार : चौकशीची मागणी
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील शिवसेनेचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील व त्यांच्या पत्नी मनीषा पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना पदाचा गैर वापर करून एक हजार सत्तर एकर जमीन संपादित केली असून त्यांच्या कुटूंबाची चौकशी करण्याची मागणी मच्छिंद्र माळी यांनी अंमलबजावणी संचलयनाकडे केली आहे.
मच्छिंद्र माळी यांनी तक्रारीत म्हंटले आहे की,तानाजी पाटील व त्यांची पत्नी मनीषा पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर वाम मार्गाने त्यांच्या नावे व मुलाच्या नावे तसेच भाऊ व भावजय यांच्या नावे मालमत्ता संपादित केली आहे.
सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून तानाजी पाटील व त्यांच्या पत्नी मनीषा पाटील या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. तानाजी पाटील व त्यांच्या पत्नी जनतेमधून जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांनी जंगम गुंतवणूक व आलिशान गाड्या मिळविल्या आहेत. तसेच मुंबई, पुणे याच सह मोठ्या शहरांमधून स्थावर मालमत्ता घेत त्यामध्ये गुंतवणूक केली आहे.
आटपाडी तालुक्यातील दिघंची, करगणी, आटपाडी, पुजारवाडी, शेरेवाडी, मुढेवाडी, विठ्ठलापूर,मापटेमळा, खरसुंडी, याच सह वासुद ता.सांगोला जि सोलापूर याठिकाणी एकूण 1070 एकर जमीन मिळविली आहे.
यामध्ये तानाजी पाटील यांच्या नावे 66 एकर , त्यांच्या पत्नी मनीषा पाटील यांच्या नावे 21 एकर, मुलगा पृथ्वीराज याच्या नावे 12 एकर, तर भाऊ शिवाजी पाटील यांच्या नावे तब्बल 934 एकर , शिवाजी पाटील यांच्या पत्नी विजयादेवी यांच्या नावे 21 एकर , शिवाजी पाटील यांचा मुलगा रोहन यांच्या नावे 12 एकर इतकी जमीन आहे .
तसेच दोन पेट्रोल पंप ,विविध बँका मधून मुदत ठेवीची गुंतवणूक ,पुणे मुंबई यासारख्या महानगरामध्ये सदनिका व मोकळे भूखंड खरेदी केले आहेत . त्यांची चौकशी केल्यास सर्व सत्य बाहेर येईल.
तानाजी पाटील व इतरांनी संगणमत करून मनी लॉन्ड्री अधिनियमाचे उल्लंघन केले असून त्यांनी गोरगरिबांच्या जमिनी काढून घेतले असून त्या सबधितांनी स्थानिक पोलिसांच्याकडे तक्रारी दिल्या असून त्याच्यावर दखलपत्र गुन्हे नोंद झाले आहेत.
तानाजी पाटील व त्यांच्या पत्नी मनीषा पाटील या सांगली जिल्हा परिषदेच्या आटपाडी विभागातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून जनतेतून निवडून आले होते. यावेळी त्यांना मिळालेले अधिकाराचा गैर वापर करून वाम मार्गाने संपत्ती संपत्ती केली असून यासाठी तानाजी पाटील यांचा मुलगा पृथ्वीराज भाऊ शिवाजी भाऊ जय देवी व पुतण्या रोहन यांनी सहकार केले आहे. तानाजी पाटील व मनीषा पाटील यांनी अधिकारावर असताना बेकायदेशीर कमावलेल्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी माळी यांनी ईडी कडे केली आहे.







