चाळीसगाव महाविद्यालयातील प्रमोद पवार यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर मांडला मुलींच्या मोफत पासचा प्रश्न
चाळीसगाव दि.
ग्रामीण भागातील पदवीपर्यंतच्या विद्यार्थीनींना मोफत पासची सुविधा द्या चाळीसगावच्या विद्यार्थ्याची 49 व्या राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात मागणी
राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात विधिमंडळ सचिवालय विधान भवनात 20 ते 27 डिसेंबर या कालावधीत ‘संसदीय कार्यप्रणाली आणि प्रथा’ या विषयावर 49 वे संसदीय अभ्यास वर्ग पार पडले. त्यात राज्यातील 12 विद्यापीठांचे सुमारे 100 विद्यार्थी उपस्थित होते. सात दिवस विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने झाली. मंगळवार दिनांक 27 रोजी अभ्यास वर्गाचा समारोप झाला.
समारोपाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मार्गदर्शन केले.
विधिमंडळाच्या सभागृहात झालेल्या अभ्यास वर्गात बी.पी. आर्ट्स एस.एम.ए. सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स कॉलेज चाळीसगाव महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रमोद भरतसिंग पवार हा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत सहभागी झाला होता. त्यात प्रमोद पवार याने ग्रामीण भागातील मुलींच्या मोफत पास योजनेबाबतचा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पहिली ते बारावीपर्यंत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत त्रैमासिक पास योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ पदवी स्तरापर्यंत मुलींना देता येईल का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नागपूरच्या एका विद्यार्थिनीला गरिबीमुळे शिक्षण घेता आले नाही व पाससाठी पैसे नसल्याने तिने टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्या केली होती. म्हणून या योजनेला पुढे नेता येईल का ज्यामुळे राज्यातील माझ्या बहिणींसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे अशी भावना प्रमोद पवार यांनी आपल्या प्रश्नातून मांडली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देश प्रबळ सुरक्षित बनविण्यासाठी आपल्या देशात राईट टू एज्युकेशन कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे असे सांगत शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात त्यात कुठे अभाव होत असेल कमतरता पडत असेल तर निश्चितपणे योग्यरीत्या या भावना मंत्रिमंडळाकडे पोहोचवू व न्याय मिळवून द्यायची भूमिका घेऊ असे सांगितले.
सदर निवडी संदर्भात प्राचार्य डॉ. मिलिंदजी बिल्दीकर यांचे मार्गदर्शन लाभले व क.ब.चौ. उ.म.विद्यापीठ जळगाव कडून संघ व्यवस्थापक म्हणून राज्यशास्त्र विभागाचे प्रा. नितीन नन्नवरे यांची निवड झाली होती.







