पोषक वातावरणामुळे गहू पीक बहरले;
गेल्या आठवड्यांपासून थंडीचा जोर वाढला
त-हाडी प्रतिनिधी : सध्या अनेकांना हुडहुडी भरविणारी थंडी त्रासदायक ठरत असले तरी शेत शिवारातील रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांसाठी ती पोषक ठरत आहे. तसेच प्रारंभी पेरणी केलेल्या गव्हाच्या पिकांना ओंब्या लागल्याने गव्हाचे पीक चांगलेच बहरले आहे. गेल्या महिन्यात ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मावा, थ्रीप्स, बुरशी रोगांचे अतिक्रमण झाले. यात मोठ्या प्रमाणावर औषधे, कीटकनाशके यांची फवारणी करण्यासाठी शेतकरी वर्गास आर्थिक फटका बसला.
यावर्षी गहू व हरभरा या रबी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. गत काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे हे पीक संकटात सापडले होते; परंतु आता वातावरण निरभ्र झाल्याने ही पिके बहरली आहेत. त्यात गहू पीक चांगलेच बहरात असून, सद्य:स्थितीत पिकाच्या ओंब्याही परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे यंदा या पिकाचे उत्पादन वाढण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.
गेल्या दोन आठवड्यांपूर्वी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते, मात्र त्यानंतर वातावरणात बदल झाल्याने पिकांना अनुकूल असे वातावरण तयार झाले. गहू, हरभरा पिकांच्या जोमदार वाढीसाठी व परिपक्व होण्यासाठी लागणारी थंडी सध्या असल्याने पिके चांगलीच जोमात आली आहे.
फोटो : शिरपूर तालुक्यातील गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने रब्बीतील गहू पीक जोमात आले.







