अर्थसंकल्प सर्वव्यापक व सर्वसमावेशक
लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांची प्रतिक्रिया
त-हाडी,दि.02(प्रतिनिधी) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महिला, विद्यार्थी, शेतकरी, नोकरपेशावर्ग, व्यावसायिकांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवणारा आहे. तसेच अर्थसंकल्प सर्वव्यापक, सर्वसमावेशक व देशाचे आर्थिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेणारा आहे, अशी प्रतिक्रिया त-हाडी येथील लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांनी व्यक्त केली.
सरपंच, जयश्री धनगर यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकातून, देशातील ‘सप्तर्षी’ सूत्रातील घटकांचा विकास साधण्याचा मोदी सरकारचा संकल्प भविष्यातील देशाच्या आर्थिक उन्नतीची शाश्वती देणारा हा अर्थसंकल्प आहे, असे म्हटले. करदात्यांना 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करमाफीची क्रांतिकारी घोषणा असेल, शेतकरी पीक कर्ज योजनेसाठी 20 लाख कोटी रुपये रकमेची वाढ असेल, महिला सन्मान बचत पत्रांवरील आकर्षक व्याजदराची तरतूद असेल, अशा शाश्वत योजनांना मूर्त रूप देण्याचे काम या अर्थसंकल्पात झाले आहे, असेही नमूद केले.
या ऐतिहासिक अर्थसंकल्पाचे आपण मनस्वी स्वागत करत आहोत, असे स्पष्ट करीत ग्रामविकास, गोरगरीब जनता, आदिवासी, आर्थिक व सामाजिक मागासवर्गीय घटकांना, मध्यमवर्गियांना आर्थिक शक्ती देणार्या या अर्थसंकल्पात पंतप्रधान मोदींची ‘राष्ट्रप्रथम’ या संकल्पनेची प्रेरणा दिसून आली. मागील नऊ वर्षात जगात दहाव्या क्रमांकावर असणारी आपल्या देशाची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर येऊन पोहोचली आहे. हे पंतप्रधान मोदींच्या आर्थिक धोरणांचे यश आहे.
कोविड महामारीच्या काळात उद्भवलेल्या अभूतपूर्व संकटाला देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थ नेतृत्वाखाली मात दिली. या संकटामुळे संपूर्ण जगातील अर्थव्यवस्था मंदीच्या विळख्यात असताना ‘आयएमएफ’ने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या आधीच देशाचा आर्थिक वृद्धीदर 6.8 टक्के राहणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. यावरून आपण भारताच्या ऐतिहासिक आर्थिक स्थिरता व संपन्नतेची कल्पना येईल, असेही त्या म्हणाल्या.







