साठवून ठेवलेल्या पांढऱ्या सोन्याला भाव मिळेना; मात्र घरात काही झोपता येईना : पिसवांमुळे शेतकऱ्यांच्या आरोग्याला धोका
महेंद्र खोंडे
त-हाडी प्रतिनिधी
: यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिना सुरू झाल्यावर देखील कापूस विकला नसल्याने घरात साठवून ठेवलेल्या कापसामध्ये किडे तयार होत असून, या पिसामुळे शेतकऱ्यांच्या घरातील सदस्यांच्या अंगाला खाज सुटण्याचे प्रमाण वाढले आहे.
ग्रामीण भागात या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. कापसाला जास्त भाव मिळत नसल्यामुळे विकता देखील येत नाही. तर दुसरीकडे त्यांच्यातील पिसामुळे अंगाला सुटणाऱ्या खाजमुळे कापूस घरात ठेवायलाही आता शेतकरी तयार नसल्याने शेतकरी दुहेरी अडचणीत सापडले आहेत. खाजऱ्याच्या समस्येमुळे शेतकरीही कंटाळले असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी या त्रासामुळे कापूस विक्री करण्यास सुरुवात केली आहे. काही शेतकरी घरात कापूस असल्याने रात्रीच्या वेळेस थंडीतही घराबाहेर झोपणे पसंत करत आहेत.
अनेक संकटांचा सामना करून पांढरं सोनं शेतकऱ्यांनी पिकविले. परंतु, माल हाती येताच बाजारातील दर उतरले. परिणामी आता कापूस घरात ठेवावा तर त्याला पिसर्व लागतायत अन् बाजारपेठेत भाव मिळत नाही, अशा द्विधा मनःस्थितीत तालुक्यातील कापूस उत्पादक अडकला आहे. अनेकांच्या नजरा आता दरवाढीकडे लागल्या आहेत.
प्रारंभी कापसाला ११ हजार रुपयांचा भाव मिळाला. मात्र ११ हजारांवरून हे दर सात हजार ८०० पर्यंत आले आहेत. दरवाढीच्या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे. मात्र दिवसेंदिवस कापसाचे भाव कमी होत आहेत. अपेक्षेप्रमाणे कापसाला भाव मिळत नसल्याने कापसाच्या गंजी प्रत्येक घरात पाहायला मिळत आहेत. या कापसाच्या गंजीला आता पिसवा लागल्या आहेत. त्यामुळे त्या चावा घेतल्यानंतर अंगाला खाज सुटते. त्यामुळे कापसाच्या गंजीजवळ जाऊन पाहणे सुद्धा शेतकऱ्यांना धोकादायक झाले आहे
फोटो- शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेला. कापूस







