कांद्याने रडवले:शेतकऱ्याने ७ रुपये किलोने विकलेला कांदा सामान्य ग्राहकाला १२ रुपयांना; ना शेतकऱ्यांचा फायदा, ना ग्राहकांचा
ललिता खोंडे…
त-हाडी :-सद्यस्थितीत आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने कांद्याचे भाव कमालिचे घसरल्यान कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला ठोक बाजारात ६ ते ७ रुपये किलो दर मिळत असल्याने लागवड खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचा तर लागवड खर्चही निघेनासा झाल्याने कांद्याने यंदा त्यांना रडवले आहे. शेतकऱ्याने सहा ते सात रुपये किलो या दराने घाऊक बाजारपेठेत विक्री केलेला कांदा सामान्य ग्राहकांना १० ते १२ रुपये किलो याप्रमाणे खरेदी करावा लागत आहे.
शिरपूर तालुक्यात रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते. अलिकडे शेतकरी कांद्याची लागवड करीत आहेत. तालुक्यात या वर्षी शेतकऱ्यांनी जवळपास एक ते दिड हजार हेक्टरवर कांद्याची लागवड केली आहे. लागवडी पासून ते काढणीपर्यंतचा खर्च वजा केला असता कांदा विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. त्यांचे आर्थिक गणित चुकले आहे.
कांदा साठवण्याची व्यवस्था असावी….
जिथे पिकते तिथे प्रक्रिया उद्योग नसल्याने वाढीव उत्पन्न उत्पादकाला मिळत नाही. शेतकऱ्यांना वाढीव व भरघोस उत्पन्न मिळावे यासाठी शेतकरी प्रोड्युसर कंपन्यांनी एकत्र येऊन प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, तसेच कृषी विभागाने साठवणूक गृहासारखी शाश्वत उपाययोजना करावी, अशी मागणी कांदा उत्पादकांकडून करण्यात येत आहे.
लागवडीपासूनच कांद्याला ग्रहण….
ऐन लागवडीच्या वेळी महाविरतणने थकित बिलापोटी शेतातील विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे कांद्याला पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळाले नाही. त्याचा उत्पादनावर परिणाम झाला. लागवडी पासून कांद्याला लागलेले ग्रहण त्याला मिळणाऱ्या कमी भावापर्यंत कायम असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कांदाचाळ फायदेशीर…
तालुक्यात अंदाजे १ ते दिड हजार हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात सरासरी एकरी ३० ते ४० क्विंटल उत्पादन होते. कांद्याला भाव मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी त्याची साठवणूक केल्यास फायदेशीर ठरेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदाचाळ तयार करायला हवी परंतू त्यासाठी शासनाची योजनासुद्धा शेतकर्यां पर्यंत जाणे गरजेचे आहे.कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती द्यावी परंतु तसे न होता एखादा शेतकरी हाताशी धरून चिरीमिरी करून १०पैकी दोन शेतकऱ्यांची बोळवण केली जाते
कांद्याने आणले रडू…
मागील वर्षी कांद्याला या वर्षीच्या तुलनेत तिप्पटीने भाव होते. मात्र या वर्षी लागवड खर्चही निघाला नाही. या वर्षी भाववाढीची अपेक्षा होती, परंतु भाव घसरल्याने तोटा सहन करावा लागत आहे. कांद्याने डोळ्यात पाणी आणले आहे.
दूहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा..!







