आवकळी पावसाने झालेल्या नुकसानीचे
पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या – जयश्री धनगर
प्रतिनिधीःत-हाडी
शिरपूर तालुक्यात आवकळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त-हाडी येथील लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांनी केली आहे.
तालुक्यात ६ मार्च सोमवार रोजीच्या सकाळपासून ते मंगळवार ७ मार्च पर्यंत ढगांचा गडगडाट, वादळ, वेगाच्या वाऱ्यासह सतत बिगरमोसमी अवकाळी पाऊस पडत असून या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. आंबा पिकासह काढणीला आलेला गहू, ज्वारी, हरभरा, उन्हाळी बाजरी, मका आदींसह कांदा , टरबुज, खरबूज या सारख्या फळ पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तानावर असलेल्या सीताफळाच्या झाडांनाही या पावसाने आता कळी फुटणार असून ती उन्हाळ्यात उष्णतेने गळून पडणार आहे. परिणामी याचा सीताफळाचा मृग बहर फुटण्यावर मोठा परिणाम होणार असून सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्याची नितांत गरज आहे अशी मागणी त-हाडीचे लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांनी केली आहे.
त-हाडी, ममाणे, अभानपुर विखरण अभानपुर जळोद, जवखेडा महसूल मंडळातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून हाता – तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
मागील वर्षीच्या अतिवृष्टीचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाहीत तसेच कापूस, कांदा भाव वाढतील या अपेक्षेने हे मालं अजून घरातच आहेत. तडजोड करून रोजचाच दिवस काढत असतांनाच या नव्या संकटाने शेतकरी आणखी मेटाकुटीस आला आहे.
शासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन झालेल्या पिकाची ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जयश्री धनगर यांनी केली आहे.
तालुक्यातील त-हाडी येथील अल्पभूधारक शेतकरी
डायाभाई सोनवणे यांच्या शेतातील गहू सोमवारच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने असा आडवा झाला आहे.







