पत्रकारांचा बुलंद आवाज अशी ओळख बनलेल्या ‘व्हाईस ऑफ मीडिया’ संघटनेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी सांम टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी भूषण अहिरे यांची नियुक्ती….
धुळे-: पत्रकारांचा बुलंद आवाज अशी ओळख बनलेल्या व देशातील २१ राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या ‘व्हाईस ऑफ मीडिया’ संघटनेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी सांम टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी भूषण अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला यांनी भूषण अहिरे यांना नियुक्तीपत्र पाठविले आहे.
‘व्हाईस ऑफ मीडिया’ ही संघटना ५० ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारिता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी निर्माण केली आहे. महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत राज्याध्यक्ष राजा माने, कार्याध्यक्ष संजय आवटे, उपाध्यक्ष मंदार फणसे, धर्मेंद्र जोरे, डॉ. नरेंद्र बोरलेपवार, सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, सहसरचिटणीस राहुल पांडे, कोषाध्यक्ष चेतन थोरात, शंतनु डोईफोडे, संघटक सुधीर लंके, परवेज खान व अश्विनी डोके यांचा समावेश आहे.
धुळे जिल्ह्यात भूषण अहिरे यांनी आपल्या निर्भीड आणि सडेतोड पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे. पत्रकारितेमधील उज्ज्वल कारकीर्द काम पाहून ‘व्हाईस ऑफ मीडिया’ संघटनेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी संघटनेच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. मूल्याधारित पत्रकारिता ही विचारधारा कायम राहावी. ज्या पत्रकारितेच्या जिवावर या सृष्टीचा डोलारा चालतो, ती पत्रकारिता शाबूत राहावी, सुरक्षित राहावी, यासाठीच आपण काम करणार आहोत, असा विश्वास नियुक्तीपत्रात व्यक्त केला आहे.
या नियुक्तीबद्दल प्रसिद्धी माध्यमांसह सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. दरम्यान, ‘व्हाईस ऑफ मीडिया’ संघटनेची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांनी जिल्हा कार्यकारिणी व सर्व तालुका कार्यकारिणीची लवकरच निवड करण्यात येणार असल्याचे सांगितले.







