पांढऱ्या सोन्याला थोडीफार झळाळी.!आठ हजार रुपये प्रति क्विंटलकडे वाटचाल.”
‘भाववाढीच्या अपेक्षा अजूनही शेतकऱ्यांना असल्यामुळे कापूस मिळेना..’
महेंद्र खोंडे
त-हाडी :- कॉटनबेल्टची किनार लाभलेल्या पश्चिम खान्देशातील धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यावर्षी निसर्गाने मारले असतांनाच कापसाच्या भावानेही आवश्यक त्यावेळी मंदी निभावल्याने जवळपास शेतकऱ्यांचा कापूस हा ६ ते सात,साडेसात हजार रुपये प्रति क्विंटलने घरातून निघून गेला आहे.आता कमीअधिक शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांच्या घरातील कापसाला नुकताच ७८०० ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचे आसपास भाव मिळत असला तरी कमी शेतकऱ्याचा यातून फायदा होणार आहे.कारण शेतकरी हा आशावादी व भाव न घेणाराच प्राणी ठरला असल्याने भावाची वाढती अपेक्षा ही त्याच्यासाठी आतापर्यंत नुकसान करणारीच ठरली आहे.आजरोजी कापसाला ग्रामीण भागात सरासरी आठ हजार रुपये प्रति क्विंटलचे भाव मिळत असल्याने शेतकरी सुखावला असतांना भाव वाढीची अपेक्षा अजून वाढल्याने कापूस विकण्यासाठी या वर्गाने आज तरी हात आखडता घेतला आहे.
शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन शेतकरी घेत असले तरी यावर्षी कधी कमी पाऊस तर कधी अतिवृष्टी सोबतच कपाशीवर आलेल्या लाल्या सदृश्य रोगामुळे कापसाच्या उत्पादकतेवर परिणाम झाल्यामुळे आता खरे तर कापसाच्या दरात हमीभावापेक्षा तेजी अनुभवली जात आहे.तसेही काही वर्षीच्या बोन्डअळीमुळे यावर्षी पाहिजे त्याप्रमाणात शेतकऱ्यांनी कपाशीला जवळ न करता अनेक पिकाकडे मोर्चा वळविला पण त्यातूनही उत्पन्न कमी मिळाले सोबतच आवश्यक भाव मिळाला नसल्याचे शल्य असतांनाच घरात नसलेल्या कापसाच्या वाढत्या दरामुळे हा वर्ग चिंतेत पडला आहे. यावर्षी आतापर्यंत तर अनेक दिवस साडे सहा हजार ते ६८०० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास कितीतरी दिवस कापूस खेळत राहिल्याने त्याच भावात अनेकांनी कापूस विकून टाकला आहे.आता दोन दिवसांपूर्वी अचानक कापसाच्या भावात तेजी आल्याने जास्त भावाच्या अपेक्षा शेतकऱ्यांच्या अजून वाढल्या आहेत.
"शेतकऱ्यांच्या नजरा दहा हजार पार..कडे."
सद्या कापसाच्या भावात दिवसेंदिवस तेजी सुरू असल्याने कापूस देण्यासाठी शेतकरी वेट अँड वॉच च्या भूमिकेचा अवलंब सद्या तरी करत असून दहा हजार रुपये तरी भाव मिळावा या अपेक्षेवर बसललेे आहेत.
“शासकीय आधारभूत किमतीकडे कानाडोळा.”
सद्या खाजगी बाजारपेठेत कापसाच्या भावात तेजी असल्याने शेतकऱ्यांचे शासनाच्या आधारभूत किंमत खरेदीकडेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.कारण त्याचे दर व सद्या असलेली भावातील तेजी सोबतच घरातच कापसाची विक्री होत असल्याने वाहतूक खर्चही वाचत असल्याने शेतकऱ्यांनी या प्रकाराकडे कानाडोळा केला आहे.
कापसाचे दर वाढतील या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी खूप दिवस कापूस ठेवला परंतु कापसाचे दर हे खूप दिवस स्थिर राहिल्याने अनेकांनी तर साडे सहा ते ७ हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान कापूस विकला आहे. अजून भाव कमी होऊ नये म्हणून मंदीतच कापूस विकल्याने आताचे भाव वाढीचा फायदाच काय अशा प्रतिक्रिया पण सद्या शेतकऱ्यात उमटत आहेत.







