‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, पिलासाठी तिने झोका झाडाला टांगला ’
वरुळ,ता.२५(प्रतिनिधी) ‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, पिलासाठी तिने झोका झाडाला टांगला’ अशा शब्दांत सुगरणीच्या कौशल्याला शब्दबद्ध करणाऱ्या ग्रामीण कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यामुळे सुगरणीचा खोपा सर्वत्र परिचित झाला.मात्र ग्रामीण भागांत पावलोपावली सर्वत्र दिसणारे सुगरण व इतर पक्ष्यांची घरटी वाढत्या वृक्षतोडीसह विहिरीत लोंबकळणाऱ्या झुडपाचीही तोड झाल्याने पशुपक्षी, सुगरणी अन्यत्र स्थलांतरीत होऊन त्यांच्या खोप्यांना कडुलिंब, बाभुळ, पिंपळ, बदाम, हिवरांच्या झाडांनी आपल्याकडे आकर्षित करून कवेत घेतले.रस्त्याने जातांना झाडां- झाडांवर लोंबकळणारे सुगरणीचे खोपे वाटसरूंना आपल्याकडे आकर्षित करत असल्याचे चित्र वरुळ (ता.शिरपुर)सह चौफेर पाहवयास मिळते.
प्रत्येक पक्ष्यांना त्यांची अंडी व पिलांची जोपासना करतांना सुरक्षिततेची काळजी असते. त्यामुळे सुगरण पक्षाचे घरटे बोरी, सुबाभळी आदी काटेरी झाडं किंवा जेथे साप, मुंगूस, माणूस, शिकारी पक्षी जाणार नाहीत अशा विहिरीकाठच्या झुकलेल्या झाडांवर ते खोपे तयार करतात. कारण त्यांची अंडी व पिलं खाणारे साप, मुंगूस, शिकारी पक्षी यांच्याबरोबरच घराच्या बेडरूम, ऑफिसची शोभा वाढवण्यासाठी त्यांचे खोपे चोरणाऱ्या माणसांचीही त्यांना भीती असते. गवताच्या काड्या गोळा करून विहिरीकाठी असलेल्या पिंपळ, बाभळ, बोर, काटेरी झुडपं, कडुलिंब आदी विहिरीपेक्षा उंच व विहिरीत झुकलेल्या झाडाच्या फांदयास घरटी बनवण्यासाठी सुगरण पक्षी पहिली पसंती दाखवतो. मात्र मागील अनेक वर्षापासून वृक्षतोड आणि विहिरी, बारवा कमी झाल्याने त्यांनीही बदल स्वीकारला आहे. बेसुमार वृक्षतोड, विहीरीऐव जी घेतल्या जाणाऱ्या कूपनलिका, नदी पात्रातून केली जाणारी पाईपलाईन आदीमुळे सुगरणीच्या पारंपरिक वसाहती सुंकटात सापडल्या आहेत.ते पण काळानुरूप या बदलांशी जुळवून घेत आहे. हे पक्षी आता आपली घरटे बनविण्यासाठी जागा बदलत आहे. बेसुमार झालेल्या वृक्षतोडीने सुगरणीच्या खोप्याची आता कूसच बदलली आहे.
हळुहळू आता काळाच्या ओघात जागोजागी दिसणारे घरटे लुप्त होत आहेत. घरटीसाठी सुरक्षीत वाटणारी विहीरी काठची जागा आता त्यांना अडगळीची व असुरक्षित वाटत आहे. या सुगरणीने बनवलेल्या घरट्यात वरच्या बाजूने प्रवेश असतो. तर सुगरणीच्या खोप्याचे प्रवेशद्वार खालच्या बाजूच्या पोकळीतून असते. त्यांची कलाकुसर पाहुन माणसांला हेवा न वाटावा हे नवलच म्हणावे लागेल. यंदा उंच तर काही बुटक्या झाडाच्या वेगवेगळ्या फांद्यांना सुगरणाने किमान आठ ते दहा घरटे बांधल्याचे दिसुन येते.
विहीरीजवळील झाडे,गर्द हिरवाईच्या ठिकाणी सुगरणीची किलबिलाट ऐकावयास मिळतो, अगदी वादळी वारे, अन् मुसळधार-पावसात सुगरणीची घरटी फांदीला घट्ट बांधलेले असल्याने सुरक्षित राहतात.सुगरणीची घरटे बांधण्याची कला मानवाला अचंबित करणारी आहे .







