“ओला दुष्काळ उंबरठ्यावर..”
‘पंधरवड्यात सूर्यदर्शनच नाही;शेतीच्या आंतरमशागतीला अडथळा.’
“पिकात तण झाल्यामुळे तणनाशकांचा खर्च वाढला.”
त-हाडी :- यावर्षी आतापर्यंतच्या पावसाळ्यात तालुक्यात शक्यतो रिमझिम पाऊस पडत आहे.गत पंधरवड्यात तर दररोज असा पाऊस होत असतांना सूर्यदर्शन दुर्लभ झाले असल्यामुळे पिकांची स्थिती नाजूक बनत चालली आहे.त्यामुळे सद्याची परिस्थिती ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात शंभर ते १०५ टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तविला होता.तशी शाश्वती आता येऊ लागली असली तरी जोरदार पावसाअभावी नदी नाले अजूनही पाण्यासाठी आतुर आहेत.दररोज पावसाची हजेरी लागून रिमझिम सरी अधूनमधून कोसळत असून सूर्यदर्शन होत नसल्यामुळे पिकात तणांचा शिरकाव होत असताना आंतरमशागत होत नसल्यामुळे तणनाशकाचा महागडा प्रयोग शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
सोबतच किडीसाठी पोषक वातावरण यामुळे तयार होत असून सर्वच पिकांवर वेगवेगळ्या रोगाचे आक्रमण होत असल्यामुळे त्यातूनही शेतकऱ्यांचा खर्च वाढत चालला आहे.सद्यस्थितीत अशा होत असलेल्या पावसामुळे पिकांच्या परिस्थितीवर विपरीत परिणाम जाणवत असून उन पडत नसल्याने अनेक पिके पिवळी पडत आहे.एकप्रकारे हा पाऊस शेतकऱ्यांसाठी ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर नेणारा ठरत असून हे असेच सुरू राहिल्यास शेतकऱ्यांना खूप मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.
चौकट ;
“खरीपाबाबतच्या उत्पन्नावरच शंका.”
सततच्या या रिमझिममुळे फुलपात्यांची गळ सुरुवातीला होत असल्यामुळे उत्पन्नाबाबत शंका येऊ लागली आहे.अगोदर रब्बीसाठी बागायती असलेल्या शेतात पाण्याचा वाफसा होत नसल्यामुळे निंदणी करणे अशक्यप्राय आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना ह्या पिकांची वखरणी करणे हा पर्याय उरत आहे.आतापर्यंत पावसाळा चांगला वाटत असतांना दररोज पडणारा हा पाऊस आता शेतकऱ्यांचे मनोबल खचविणारा व मजुरांना पण हात चोळायला लावणारा सद्यातरी ठरत आहे.
प्रतिक्रिया ;
“पाऊस चांगला पडत नाही व खुलवाट पण देत नाही,त्यामुळे पिके खराब होत आहे.सद्या या ढगाळ वातावरणामुळे मका व कपाशीवर वेगवेगळ्या किडींचे आक्रमण होत आहे.नुसता खर्च वाढत आहे.हे असेच सुरू राहिले तर उत्पन्नात मोठी घट येणार असून हा आता पडत असलेला पाऊस ओल्या दुष्काळाची नांदी तर ठरणार नाही ना..अशा शंका आता शेतकऱ्यांत उत्पन्न होऊ लागल्या आहेत.”
भुषण माधव सोनार,शेतकरी, त-हाडी (फोटो सह).