घ्या समजून राजे हो..
महाकुंभमेळा.. अपप्रचार हाणून पाडायलाच हवा..
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
मुंबई: सध्या भारतात प्रयाग्रज येथे महाकुंभमेळा सुरू असून हा मेळा एकूण ४५ दिवस चालणार आहे. या मेळाव्यासाठी देशभरातून ४० कोटी हिंदू बांधव प्रयागराजला जाणार असून ते पवित्र गंगेत स्नान करणार आहेत. आज कोणत्याही धर्माचे इतके लोक एकावेळी एकत्र येणे हे एक मोठेच आश्चर्य समजले जाते. त्यामुळे या महा कुंभमेळ्याची संपूर्ण जगभरात मोठी चर्चा सुरू आहे.
आपल्या देशात हिंदूंची श्रद्धास्थाने आणि त्यांच्या प्रथा परंपरा यांच्यावर टीका करणे हे पुरोगामीत्वाचे लक्षण मानले जाते. ही परंपरा इंग्रजांच्या काळापासून सुरू झाली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर जवळजवळ ६० वर्ष देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसची देखील हीच मानसिकता होती. त्याचवेळी देशात जोरावर असलेल्या डाव्या मंडळींनीही हीच परंपरा पुढे चालू ठेवली. आजही तीच परंपरा पुढे चालू आहे. त्यामुळेच या महाकुंभमेळ्यावरही वेगवेगळ्या प्रकारे टीका केली जात असून त्याबद्दल वेगवेगळे भ्रम देखील पसरवले जात आहेत.
देशात होणाऱ्या या महा कुंभमेळ्यांना पौराणिक परंपरा आहेत, इतिहास आहे. तरीही खोटेनाटे कथनक रचून सांगण्यात भूषण मानणारे असे काही पुरोगामी अभ्यासक आजही सक्रिय आहेत. त्यातलेच नाशिकचे एक पत्रकार निरंजन टकले यांचा एक व्हिडिओ माझ्या एका सश्रद्ध मित्राने माझ्याकडे पाठवला, आणि या संदर्भात अभ्यास करून तुम्ही उत्तर द्या असे मला सुचवले.
मित्राने पाठविलेल्या या व्हिडिओत पुरोगामी पत्रकार निरंजन टकले यांचा दावा आहे की भारतात चार ठिकाणी होणारे कुंभमेळे हे बादशहा अकबराने सुरू केले आहेत. या संदर्भातील इतिहास शोधण्यासाठी टकलेंनी चिनी आणि फ्रेंच प्रवासी यांनी भारतात वास्तव्य केल्यावर लिहिलेल्या पुस्तकांचे वाचन केले. त्यानंतर त्यांनी बादशहा अकबराची १४ फर्माने वाचली आणि पुढला इतिहासही वाचला. त्यांच्यामते अकबर हा सहिष्णू मोगल राजा होता. त्याने भारतावर राज्य करत असताना ज्याप्रमाणे हजमध्ये लाखो मुस्लिम जमतात त्याप्रमाणे हिंदू समाजही एकत्र जमावा या हेतूने त्याच्या साम्राज्यातील सर्व येड्या साधू महंतांना बोलावले आणि असा हिंदूंना एकत्र आणण्यासाठी काही उपक्रम करता येईल का? या यावर मत विचारले. तेव्हा अमृतमंथनाचे वेळी अमृताचे चार थेंब जिथे सांडले तिथे असे मिळावे घ्या असे या येड्या महंतांनी सुचवले. त्यानुसार अलाहाबाद आजचे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, आणि नाशिक येथे दर १२ वर्षांनी हे कुंभमेळे व्हावे असे अकबराने निश्चित केले. या कुंभमेळ्यांसाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद करण्यासाठी या प्रत्येक ठिकाणी अडीच हजार एकर जमीन अकबराने वेगळी मूक्रर केली, आणि या जमिनीच्या १२ वर्षाच्या महसुलातून या मेळाव्यांचा खर्च व्हावा असे फर्मान काढले. यातील पहिल्या प्रयागराजच्या कुंभमेळ्यातील स्नानासाठी स्वतः अकबर बादशहा पोहोचला होता. त्यामुळे या स्नानाला शाही स्नान असे नाव पडले असा दावा निरंजन टकले करतात.
देशात महाकुंभमेळा होतो, तो वेगवेगळ्या ठिकाणी होतो, आणि तिथे करोडो लोक जमतात, आणि श्रद्धेने स्नान करतात, इतकीच मला याबाबत माहिती होती. त्यामुळे काही अभ्यासकांशी मी चर्चा करून या संदर्भात उत्तर देण्याचा हा प्रयत्न करतो आहे.
इथे मला वाचकांचे एका बाबीकडे लक्ष वेधायचे आहे, की इतिहास लिहिला, तो फ्रेंच आणि चिनी इतिहासकारांनीच, या समजूतीतून त्यांनी आपली शोध पत्रकारिता केली आहे. त्या ऐवजी त्यांनी आपली पुराणे वाचली असती तर त्यात या कुंभमेळ्यांचा उल्लेख निश्चित सापडला असता. हजारो वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या भागवत पुराण, स्कंध पुराण, कुर्मपुराण, अग्नि पुराण या सर्वांमध्ये या कुंभमेळ्यांचा उल्लेख असून त्याची माहितीही दिली आहे. वेदांमध्येही या कुंभमेळ्यांचा उल्लेख आहे. मात्र या भागवत पुराण, वेद यांचा अभ्यास करणे हे या पुरोगामी मंडळींच्या दृष्टीने मागासलेपणाचे लक्षण ठरते. त्यामुळे टकलेंनी हा अभ्यास केला नसावा हे नक्की. त्यांनी आपल्या भाषणात या महंतांना “येडे” असा उपहासात्मक उल्लेख केला आहे. तो मलाही मान्य आहे. आपल्या या भरत भूमीतील हे सर्वच संत, महंत, साधू, संन्याशी हे खरोखरी येडेच होते. मात्र त्यांना वेड लागले होते ते परमेश्वर भक्तीचे, आणि त्यातून त्यांना समाजसुधारणेचा ध्यास लागला होता. आपल्या संत महंतांनी आपल्या कृतीतून समाजाला जे काही चांगले दिले आहे, त्याची दखल घेतली गेलेलीच आहे. मात्र पुरोगामी मंडळींना ते कधीच पटणार नाही.
टकले चिनी प्रवाशांनी लिहिलेल्या इतिहासाचा उल्लेख करतात. एका चिनी प्रवाशाने लिहिलेल्या इतिहासानुसार भारतात तो सहाव्या (६२९) शतकात आला असताना राजा हर्षवर्धनाच्या राजसभेत त्याने या नदीकाठी होणाऱ्या मेळ्यांची माहिती घेतली होती. त्यात या चार कुंभमेळ्यांचा उल्लेख केलेला आहे. हे बघता सुमारे १३०० ते १४०० वर्षांपूर्वी देखील हे मेळावे होत होते. अकबराचा कालखंड हा जेमतेम ३०० ते ४०० वर्ष जुना असावा. बी.सी. रॉय नावाचे थोर भारतीय इतिहास संशोधक होऊन गेले. त्यांनी लिहिलेल्या इतिहासात या मेळाव्यांचा १० हजार वर्षे जुना इतिहास असल्याचा दावा केला आहे.
हिंदू म्हणजेच सनातन धर्माच्या धर्मग्रंथांमध्ये दिलेल्या नोंदी आणि आपल्या प्रथा परंपरांनुसार चालत आलेल्या लोककथा यानुसार ज्या ज्यावेळी देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले आणि त्यातून अमृत काढले, ते अमृत घेऊन देव निघाले त्यावेळी दानव ते अमृत आपल्याला मिळावे म्हणून संघर्ष करत त्यांच्या मागे निघाले. या झटापटीत त्या अमृतकुंभातील ४ थेंब पृथ्वीवर ज्या ठिकाणी सांडले.ती तीर्थक्षेत्रे म्हणून ओळखली जाऊ लागली. ती चार स्थाने म्हणजे नाशिक उज्जैन हरिद्वार आणि प्रयागराज ही होत. या ४ ठिकाणी दर १२ वर्षांनी कुंभमेळे आयोजित करण्याची परंपरा वेदकाळापासूनच सुरू झाली. दर १२ वर्षांनी हे मेळे व्हावे आणि हे आयोजन करतांना सूर्य गुरु आणि चंद्र हे विशिष्ट राशीमध्ये यावेत हे देखील निश्चित केले गेले होते. त्यानुसारच या ४ ठिकाणी हे मेळे होत असतात. नाशिक येथे दर १२ वर्षांनी गुरु जेव्हा सिंह राशीत येतो, म्हणजेच सिंहस्थ काळात होत असतो. त्याचनुसार या इतर तीन स्थानांमध्येही विशिष्ट ग्रह स्थिती आल्यावरच या मेळाव्यांचे आयोजन केले जाते. ती ग्रहस्थिती साधारणपणे दर वर्षांनी येते. अर्थात काही ठिकाणी अर्धकुंभमेळा, कुंभमेळा असे मेळावेही आयोजित केले जातात. याबाबतच्या सविस्तर नोंदी जाणकारांकडून उपलब्ध होऊ शकतात. २०२५ च्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यास विशेष महत्त्व यासाठी प्राप्त झाले आहे की समुद्रमंथनाच्या वेळी जी ग्रहस्थिती होती, तीच यावेळीही आलेली आहे. जाणकारांच्या मते अशी ग्रहस्थिती दर १४४ वर्षांनी येते. त्यामुळे या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या सर्व मेळाव्यांना सुमारे १२ दिवस ते ४५ दिवस असा कालावधी असतो. हे मेळावे ज्या ज्या ठिकाणी होतात तिथल्या नदीत पवित्र स्नान करण्याची या मेळाव्यात परंपरा असते. ही परंपरा लक्षात घेत मानवी स्वभावानुसार पहिल्याच दिवशी सर्वच हिंदू तिथे स्नान करण्यासाठी धावतील आणि गोंधळ होईल हे लक्षात घेत पहिल्या दिवशी फक्त धर्मगुरू, संत, महंत आणि मान्यवरांनीच स्नान करावे असे आदेश तत्कालीन हिंदू राजांनी दिले होते. त्यामुळे पहिल्या दिवशीच्या स्नानाला शाही स्नान म्हणून ओळखले गेले अशी माहिती जाणकारांकडून मिळाली आहे.
जाणकारांच्या मते ही पुरोगामी मंडळी परदेशी प्रवाशांच्या आणि इतिहासकारांच्या इतिहासाचे दाखले देत सनातन परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न करत असतात. परदेशी इतिहासकार इतिहास मांडताना वंशावळी आणि सनावळी यांचा आधार घेत इतिहासाची मांडणी करतात. त्यामुळे त्यांचाही गोंधळ होतो आणि या पुरोगामी मंडळींचाही गोंधळ होतो. भारतीय इतिहासकार कोणत्याही घटना, प्रथा, परंपरा यांना अभ्यासताना या घटना का घडल्या आणि कशा घडल्या, परंपरा कशामुळे चालू झाल्या, याचाच विचार करतात. वंशावळी आणि सनावळींच्या मागे जात नाहीत. त्यामुळे प्रथा परंपरांचा योग्य तो आदर राखला जातो. सनावळी आणि वंशावळींच्या मागे गेल्यामुळे हा सन्मान राखला जात नाही असेही जाणकार म्हणतात. हे कुंभमेळे आद्य शंकराचार्यांनी सुरू केले असाही दावा काही लोक करतात. मात्र अभ्यासकांच्या मते आद्य शंकराचार्यांच्या आधीच्या काळापासूनच हे मेळावे चालत आलेले आहेत. मात्र मधल्या काळात या मेळाव्यांवरील लोकांचे लक्ष कमी झाले होते. त्यामुळे या मेळाव्यांना पुनरुज्जीवीत करण्याचे काम आद्य शंकराचार्यांनी केले हे वास्तव आहे.
महाकुंभमेळ्यामुळे टकलेंसारख्या कधित विद्वानांनी वरील विधाने केली आहेत. त्या महा कुंभमेळ्याविषयी खुलासा करण्याचा मी प्रयत्न केला आहे. मात्र सनातन परंपरा किंवा एकूणच हिंदू परंपरा भारतीय इतिहासातील शूरवीर, धर्मपरायण राजे यांच्या बद्दल चुकीचा इतिहास मांडून त्यांचे चारित्र्यहनन कसे करायचे ही पुरोगामी मंडळींची फॅशन झाली आहे. करोडो हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू रामचंद्राने समुद्रात पाषाण टाकून जो रामसेतू बांधला, तो रामसेतू अस्तित्वातच नाही असा दावा केला जातो. अयोध्येत राम मंदिर नव्हतेच असेही अनेक विद्वान छातीठोकपणे सांगतात. नुकताच असाही जावई शोध लावण्यात आला आहे की अयोध्येत राम मंदिर होण्याआधी त्या ठिकाणी बौद्ध विहार होता. नंतर हिंदू शासकांनी तो ताब्यात घेऊन तिथे राम मंदिर बांधले. म्हणजे राम मंदिर की बाबरी मशीद की बौद्ध विहार हा वाद निर्माण करायचा आणि मग मजा बघायची हेच पुरोगामी मंडळींचे धोरण दिसते. आज महाराष्ट्रात जर खरे दैवत असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज हे आहे. मात्र देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी आपल्या एका पुस्तकात छत्रपतींचा एक दरोडेखोर असा उल्लेख केला होता असे सांगण्यात येते. असेच अनेक चुकीचे इतिहास इंग्रजांनी लिहिले आणि या सर्व पुरोगामी मंडळींनी त्याची पाठराखण केली. हिंदू मुस्लिमांमध्ये भांडणे लावण्यासाठी हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या मुस्लिम राज्यांना थोर राजे असे दाखवले गेले. आजही क्रूरकर्मा औरंगजेब, अकबर, शहाजहान, या सर्वांच्या नावे राजधानीत मार्ग आहेत. काँग्रेसच्या दीर्घकालीन राजवटीत ते बदलण्याचा कधीच प्रयत्न झाला नाही हे विशेष.
अर्थात या कथित पुरोगामी विद्वानांच्या अपप्रचारांनंतरही सश्रद्ध हिंदू भुलले नाहीत हे विशेष. आयोध्येत राम मंदिर नव्हतेच असे “दावे के साथ” सांगितले जाऊनही करोडो हिंदूंनी अयोध्येत जाऊन कारसेवा केली होती. त्यानंतर राम मंदिर उभारणीची वेळ आली, त्यावेळी करोडो हिंदूंनी काही हजार कोटींचे दान देऊ केले आणि त्यातून राम मंदिर उभे राहिले. त्याच प्रकारे आज टकलेंसारख्या विद्वानांनी काहीही सांगितले तरी प्रयागराजला करोडो हिंदू पोहोचत आहेत. पहिल्याच दिवशी तिथे १कोटी भाविकांनी शाही स्नान केल्याची माहिती मिळाली. दररोज करोडो हिंदू तिथे पोहोचत आहेत. त्यासाठी कोणत्याही जाहिरातीची गरज नाही. एका अभ्यासकाने दिलेल्या माहितीनुसार पंडित मदन मोहन मालवीय यांच्या काळात झालेल्या एका कुंभमेळ्याला स्वतः पं. मालवीयजी पोहोचले होते. त्यावेळी तिथे आलेल्या एका पत्रकाराने तिथे जमलेली प्रचंड गर्दी पाहिली आणि त्याने प्रश्न विचारला, की यासाठी तुम्ही जाहिरात कशी करता? त्यावेळी मालवियजींनी उत्तर दिले की आम्हाला कोणतीही जाहिरात करावी लागत नाही. आमच्या हिंदू पंचांगात यावर्षी या ठिकाणी कुंभमेळा आहे अशी फक्त दोन ओळींची नोंद असते. ती पाहून सश्रद्ध हिंदू बांधव इथे येऊन पोहोचतात. इथे जाती-धर्माचा भेद नसतो. सर्व हिंदू एकत्र येऊन हे स्नान तर करतातच, त्याचबरोबर इथे धार्मिक आदानप्रदानही होते. मला वाटते अशा मेळाव्याच्या पुरोगामी विरोधकांना पंडितजींनी दिलेले हे उत्तर पुरेसे ठरावे.
मला मिळालेल्या माहितीनुसार मी अशा मेळाव्यांच्या बाबत होणाऱ्या अपप्रचाराचा उत्तर देण्याचा हा प्रयत्न केला आहे. माझा हा प्रयत्न कितपत उचित आहे हे वाचक आणि अभ्यासकांनीच ठरवायचे आहे. मात्र अशा अपप्रचाराचे खंडन व्हायलाच हवे हे नक्की.
वाचकहो पटतेय का तुम्हाला हे?
त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो…