उन्हाळ्यात दुपारी फिरतो आम्ही दारोदारीकडक उन्हात शिक्षकांकडून जनगणनेचे काम; शिरपूर तालुक्यात कुटुंब गण नाही सुरू
त-हाडी- कडक उन्हाचा पारा सोसत शिक्षकांना आता जनगणनेचे काम करावे लागत आहे. भर उन्हात शिक्षकांना नेमून दिलेल्या वार्डात प्रत्यक्ष इमारत गणना व कुटुंब गणनेला सुरुवात झाली आहे. प्रत्येक शिक्षकांकडे २०० ते २५० इमारतीचे गणनेचे काम असून हि जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र प्रशासनाने कुठलेही किट किंवा संसाधने न देता शिक्षकांना कागदावर काम करतांना दिसत असून जनगणनेसाठी माहिती संकलित करण्यास अडचणी येत आहे. शिक्षकांना उन्हासोबत जनगणनेचे चटके सोसावे लागत आहेत.राज्यात सध्या सुरू असलेल्या जनगणना कामासाठी शिक्षकांना भर उन्हात रस्त्यावर उतरविण्यात आले आहेत. गळ्यात बॅग, डोक्यावर टोपी घालून ४२ अंश तापमानात हे प्राथमिक, तसेच माध्यमिक विभागाचे शिक्षक घरोघरी जाऊन माहिती संकलित करत आहेत.
शिरपूर तालुक्यात जनगणना कामासाठी गेलेल्या काही दिवसात शिक्षकांना उष्माघाताचा त्रास जाणवल्याचे देखील सांगण्यात येत आहे. अशा समोर न आलेल्या अनेक घटना असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ‘आणखी किती शिक्षक आजारी पडण्याची वाट पाहत आहात?’ असा संतप्त सवाल करत, ही जनगणना जुलैमध्ये करावी, अशी मागणी काही शिक्षक संघटनांकडून होत आहे.शिरपूर तालुक्यात जनगणनेसाठी सुमारे ९६ पर्यवेक्षक आणि प्रगणक म्हणून ५७४ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मे महिन्यात वाढत्या तापमानात शिक्षकांना सकाळपासून दुपारपर्यंत पायपीट करावी लागत आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, सावलीची किंवा वैद्यकीय सुरक्षिततेची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसतानाही शिक्षक काम करत आहेत. शिक्षणाचे काम सांभाळत राष्ट्रीय जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या शिक्षकांना अशा पद्धतीने उन्हात होरपळायला लावणे अमानवी असल्याची टीका होत आहे.
प्रतिक्रिया उन्हाची तीव्रता संपल्यानंतर गणना व्हावी”जनगणना हे महत्त्वाचे राष्ट्रीय काम असले तरी कोणतेही राष्ट्रीय काम करण्यास शिक्षक नकार देत नाहीत. मात्र ते करताना अनेक शिक्षक आजारी पडत आहेत. तरीही सुरक्षितता शिक्षकाला मिळत नाही, जनगणना ही उन्हाची तीव्रता संपल्यानंतर जुलैमध्ये करण्यात यावी.”— , प्रविण शिंदे पर्यवेक्षक
प्रतिक्रिया वेळापत्रकात बदल करावा”जनगणना राष्ट्रीय कर्तव्य आहे. याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. मात्र या वर्षीचे विक्रमी तापमान पाहता भर उन्हात हे काम करणे शिक्षकांच्या जीवावर बेतत आहे.”— प्रतिभा देवेंद्र कंरके, पर्यवेक्षक
प्रतिक्रिया ४२ डिग्री तापमानात काम करावे लागते”जनगणना हे राष्ट्रीय कार्य असल्याने आमचे शिक्षक ते इमानाने इतबारे करत आहेत. खरे तर पाच वर्षांपासून रेंगाळलेले हे काम आता ४२ डिग्री तापमानात राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडण्याचा अट्टाहास प्रशासन आम्हा शिक्षकांवर का करतेय, हे न समजणारे आहे. यासाठी सोयीची वेळही निवडता आली असती.”— डॉ प्रा दिलवसिंग गिरासे, प्रगणक
प्रतिक्रिया शिक्षकांचा किती अंत पाहणार”शिक्षकांना भर उन्हात जनगणनेसाठी दारोदार जावे लागत आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता, शिक्षकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने आवश्यक ती दखल घेतलेली नाही. शिक्षकांचा आणखी किती अंत पाहणार?”— संतोष आडगाये प्रगणक




