प्रफुल्ल गुडधे यांनी वास्तवाचे भान ठेवत वल्गना करणे टाळावे;
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
माझे वडील विनोद गुडधे पाटील हे नागपुरातील भाजपचे पहिले आमदार होते. नंतर त्यांना भाजपचा खरा चेहरा समजला. त्यांनी या शहरात सुरू केलेले भाजपचे दुकान आता मी बंद करीन, असा दावा काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी आपल्या पदग्रहण समारंभात बोलताना केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात विविध चर्चा होत आहेत.
प्रफुल्ल गुडधे यांचे वडील विनोद गुडधे पाटील हे नागपुरातील भारतीय जनता पक्षाचे पहिले आमदार होते हे वास्तव नाकारता येत नाही. मात्र त्याचवेळी भाजपचे दुकान त्यांनी सुरू केले हा दावा मात्र काहीसा हास्यास्पद वाटतो. विनोद गुडधे यांना भाजपमध्ये आणले आणि त्यांना आमदारपदापर्यंत पोहोचण्यासाठी बळ दिले ते स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस आणि स्वर्गीय सुमतीबाई सुकळीकर यांनी. ताई सुकळीकर तर विनोद गुडथे यांना अगदी मुलाप्रमाणेच वागवायच्या. “माझा विनोद” म्हणूनच त्या गुडधेंचा उल्लेख करायच्या.
विनोद गुडधे पाटील हे मूळचे जयताळा परिसरातील शेतकरी म्हणून ओळखले जात होते. जुन्या जनसंघाच्या काळात गंगाधरराव फडणवीस हे नागपूर लगतच्या ग्रामीण भागात शिरून असे बहुजन समाजातील नवीन कार्यकर्ते शोधून त्यांनाही जनसंघाशी आणि संघाशी जोडत होते. त्यावेळी शेतीत काम करणारे तरुण विनोद गुडघे पाटील त्यांच्या संपर्कात आले. गंगाधररावांनी विनोद गुडधे यांना संघाच्या आणि जनसंघाच्या संपर्कात आणले. असे म्हणतात की जयताळा परिसरातून १९७५ मध्ये विनोद गुडधे यांना महानगरपालिकेची उमेदवारी मिळाली त्यावेळी विनोद गुडधे हे आपल्या शेतात काम करत होते.
गंगाधरराव स्कूटरने त्याच्या शेतात पोहोचले आणि तिथून घेऊन जात त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करायला लावला होता. गंगाधररावांसोबत ताई सुकळीकरांनी देखील विनोद गुडधेंवर अपार प्रेम केले होते. त्यांच्या पहिल्या निवडणुकीत ताईंनी त्यांच्यासाठी ठिकठिकाणी प्रचार सभा देखील घेतल्या होत्या असे म्हणतात. त्यामुळेच आधी विनोद गुडधे नगरसेवक झाले. मग पश्चिम नागपूर मतदार संघातून भाजपाचा उमेदवार विजयी होत नव्हता, म्हणून १९९० च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली.
त्यावेळी खरे तर भाजपचे संजय जोशी यांचे नाव चर्चेत होते. मात्र ताई सुकळीकरांच्या आग्रहामुळे गुडधेंना उमेदवारी मिळाली आणि त्यावेळी विनोद गुडधे विजयी झाले. त्यावेळी नागपुरातील भाजपचे ते पहिले आमदार म्हणून ओळखले गेले. नंतर मग १९९५ मध्ये इतर मतदारसंघांमधूनही काही उमेदवार विजयी झाले होते.
१९९० आणि १९९५ असे दोन वेळा विनोद गुडधे भाजपकडून पश्चिम नागपूर मतदार संघातून आमदार म्हणून विजयी झाले होते. १९९७ मध्ये त्यांना राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
त्या काळात नागपूर भाजपमध्ये नितीन गडकरींचे वर्चस्व हळूहळू वाढत होते. तिथेच विनोद गुडधेंचे आणि नितीन गडकरींचे खटकले. १९९९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकदमच झाल्या. त्यावेळी नागपूर लोकसभा क्षेत्रातून विनोद गुडधेंना उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरुद्ध विलास मुत्तेमवार हे काँग्रेसचे उमेदवार होते. या निवडणुकीत विनोद गुडधे पराभूत झाले. त्याच वेळी पश्चिम नागपूर मतदार संघातून तरुण नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे आमदार म्हणून विजयी झाले होते.
दरम्यानच्या काळात नितीन गडकरी आणि विनोद गुडधे पाटील यांचे संबंध खूपच ताणले. परिणामी मे २००० मध्ये गुडधेंनी भाजप सोडली आणि ते काँग्रेसवासी झाले. त्यानंतर २००४ मध्ये ते चक्क देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातच निवडणूक लढवायला तयार झाले होते. मात्र भाजपमधल्याच काही जुन्या जाणत्या मंडळींनी त्यांना कानपिचक्या दिल्यामुळे ते माघारी फिरले.
२००२ च्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीत विनोद गुडधेंनी जयताळा परिसरातून आपला मुलगा प्रफुल्ल गुडधे याला निवडणुकीत उतरवले. त्यावेळी जयताळा परिसरात विनोद गुडधे मुलाच्या प्रचाराला गेल्यावर तिथले नागरिक त्यांना भाजप का सोडली म्हणून प्रश्न करत असत. त्यांना उत्तर देणे कठीण होत असे. शेवटी तुम्ही माझ्या प्रचाराला येऊ नका असे प्रफुल्ल गुडधेंना आपल्या वडिलांना ठणकवून सांगावे लागले होते. मला आठवते, त्यावेळी दैनिक तरुण भारत मध्ये “पोटच्या मुलाच्या प्रचारालाही जाऊ न शकणारा अभागी बाप” या शीर्षकाखाली बातमी आली होती.
तिथूनच हळूहळू प्रफुल्ल गुडधे काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय होऊ लागले. वाढत वाढत ते नागपूर महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेतेही झाले होते. माझ्या आठवणीनुसार २००९ मध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दक्षिण पश्चिम नागपूर लोकसभा विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती, आणि त्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. या त्यांच्या वाटचालीत भाजप बद्दलचा राग त्यांच्या मनात प्रचंड दाटलेला होता.
गेली बारा वर्षे विकास ठाकरे हे शहर काँग्रेसचे अध्यक्ष होते. या काळात शहरात काँग्रेसची दुरावस्था दिवसेंदिवस वाढतच होती. त्यामुळे यावेळी पक्षश्रेष्ठींनी विकास ठाकरेंना बदलवण्याचे ठरवले. विकास ठाकरे यांना बदलवण्यामागे त्यांचे देवेंद्र फडणवीस यांचेशी असलेले मित्रत्वाचे संबंध हे देखील कारणीभूत ठरले होते. २०१९ पासूनच विकास ठाकरे हे भाजपमध्ये जाणार आणि त्यांना मंत्रिपद मिळणार असे बोलले जात होते. मात्र तसे जरी घडले नाही तरी फडणवीसांचे त्यांचे संबंध लपून राहिलेले नाहीत. त्यामुळेच त्यांना बदलवले जाणार हे नक्की झाले होते. त्यांच्या जागी आता प्रफुल्ल गुडधे हे तुलनेने तरुण व्यक्तिमत्व अध्यक्षपदी आले आहे.
प्रफुल्ल गुडधे हे तरुण आहेत आणि आक्रमक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पक्षाला ते चांगले दिवस आणतील यात शंका नाही. मात्र त्याचवेळी भाजपचे दुकान बंद करण्याची जबाबदारी माझी आणि मी ते बंद करीन हा त्यांचा दावा आजच्या स्थितीत तरी तद्दन फालतू वाटतो. कदाचित त्यांनी हा दावा २०१० पूर्वी केला असता तर लोकांनी त्यावर विश्वास ठेवला असता. मात्र आज भाजपची शक्ती नागपुरातच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रात वाढलेली आहे.
नागपुरात आज देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी असे दोन खंदे भक्कम नेते भाजप जवळ आहेत. त्याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरातच आहे. संघाचे पाठबळ या दोन्ही नेत्यांच्या बाजूने आहे. विनोद गुडधे १९९० मध्ये सर्वप्रथम निवडून आले होते, तेव्हाही संघाचे पाठबळ त्यांच्याही पाठीशी होतेच. त्यामुळे संघाचे पाठबळ जोवर भाजपच्या पाठीशी आहे, तोवर प्रफुल्ल गुडधेंना भाजपचे दुकान नागपुरातून बंद करणे अशक्यप्रय ठरणार आहे. ठीक आहे थोडीफार ताकद ते काँग्रेसला देतील, पण भाजपला पूर्णतः नागपुरातून निस्तनाबूत करणे आज तरी त्यांना अशक्यप्राय ठरणार आहे.
अर्थात लोकशाहीत वल्गना करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तसाच तो प्रफुल्ल गुडधे यांनाही आहे. त्यामुळे त्यांना वल्गना करण्यापासून आपण कोणीच थांबवू शकत नाही. मात्र त्यांनी वास्तवाचे भान ठेवावे इतका सल्ला तर आपण जरूर देऊ शकतोच ना..
अर्थात हे माझे मत झाले……
तुमचेही स्पष्ट आणि परखड मत तुम्ही मांडू शकताच…





