*आठवणींच्या हिंदोळ्यावर..**स्नेहबंध बेगम परविन सुलतानांसोबतचे…*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.चार-पाच दिवसांपूर्वीच एका व्हाट्सअप समूहात भारतीय शास्त्रीय संगीताच्या ख्यातनाम गायिका बेगम परवीन सुलताना यांचा वाढदिवस असल्याचे वाचण्यात आले.
त्याच एक-दोन दिवसात युट्युब वर बघताना बेगम परवीन सुलताना यांनी गायलेले एक दोन व्हिडिओ देखील बघण्यात आले. बेगम परविन सुलताना यांचा एका काळात माझा खूप चांगला संबंध आला होता. त्या निमित्ताने त्यांच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या.१९८८-८९ च्या दरम्यान दूरदर्शनसाठी कार्यक्रम निर्मिती प्रकल्प हाती घेतला होता. त्यावेळी दूरदर्शनला विविध कार्यक्रम खाजगी स्तरावर पुरवावे अशी सरकारची योजना होती. त्यात मी देखील सक्रिय झालो होतो.
मग काही समाविचारी मित्रांना सोबत घेऊन विविध योजना आखणे सुरू केले होते. त्यात एका दिवशी चर्चा करताना संगीतावर आधारित असे कथानक घेऊन एखादी दूरदर्शन मालिका तयार करावी असा विचार डोक्यात आला. त्यावेळी या प्रकल्पात माझी सहकारी असलेल्या रमा नामक एका मैत्रिणीने बेगम परविन सुलताना आणि त्यांचे पती उस्ताद दिलशाद खान यांचे माझे चांगले संबंध आहेत असे सांगितले. मग आम्ही लगेचच या दांपत्याला एक पत्र पाठवले आणि त्यात आमच्या डोक्यातील विचार मांडला.हे पत्र पाठवल्यावर महिनाभर काही उत्तर येते का याची आम्ही वाट पाहिली. उत्तर आले नाही,
तेव्हा तो प्रस्ताव आम्ही बाजूला ठेवला होता. मात्र सुमारे तीन महिन्यांनी अचानक उस्ताद दिलशाद खान यांचे पत्र आले आणि त्या प्रकल्पात सहभाग घेण्यास ते उत्सुक असल्याचे त्यांनी कळवले होते.हे पत्र येताच आमच्या पुन्हा आशा पल्लवीत झाल्या. दोनच दिवसात बेगम परवीन सुलताना यांचाच फोन आला. थोडेच दिवसात सप्तकच्या कार्यक्रमासाठी त्या नागपुरात येणार होत्या. त्यावेळी जमल्यास आपण एकत्र बसून चर्चा करू या असे त्यांनी सुचवले होते. त्यानुसार आमचे नियोजन सुरू झाले.ठरल्याप्रमाणे त्या नागपुरात पोहोचल्या. त्या दिवशी दुपारी मी आणि रमा त्यांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर देखील गेलो होतो. त्याच दिवशी संध्याकाळी धनवटे रंगमंदिरात त्यांचा कार्यक्रम होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता त्यांना सर्व संबंधितांसह एकत्र भेटायचे असे ठरवून आम्ही निघालो.
ठरल्यानुसार दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता रामदास पेठेत सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि आमचे एक सहकारी डॉ. विनय वाईकर यांच्या घरी आम्ही सर्वांनी एकत्र जमायचे ठरवले. त्यावेळी मग मी, डॉ वाईकर आमचे रंगमंच विषयात मार्गदर्शक असलेले किशोर कुलकर्णी, दिलीप वाईकर, आकाशवाणीतील निवृत्त संगीत दिग्दर्शक वसंत अंधारे, परविनजी आणि रमा असे सर्व एकत्र बसलो. सुमारे दोन तास ही प्रस्तावित मालिका कशा प्रकारे केली जावी यावर आमची साधक-बाधक चर्चा झाली, आणि पुढे कसे कसे करायचे ते ठरवावे आणि परवीनजीना वेळोवेळी कळवावे असेही ठरवले.
त्या दिवशी रात्री मग परविन सुलतानांना विमानतळावर सोडायला देखील आम्ही गेलो होतो. योगायोगाने विमान बरेच लेट होते मग तिथेच व्हीआय पी रूम मध्ये बसून आमच्या गप्पाही रंगल्या. त्यावेळी माझे लग्न व्हायचे होते. परविन सुलतानांना “पुढल्या खेपेला तुम्ही घरी या” अशी मी विनंती केली. तेव्हा चेष्टेत त्या “तुझं लग्न झालं की तुझ्या घरी येईल” असेही म्हणाल्या होत्या. त्या प्रकल्पावर मग आमची बऱ्यापैकी चर्चा झाली आणि या चर्चेचे कसे कथानक असावे, त्यात कोणकोणत्या कलावंतांना सहभागी करून घ्यावे, याचा एक कच्चा आराखडा ठरला. त्यानंतर जानेवारी १९८० मध्ये मी मुंबईला गेलो असताना फोन करून परविन सुलताना यांच्या खार परिसरातील निवासस्थानी देखील गेलो होतो. तिथे त्या दिवशी परवीन सुलतानाजी दिलशाद खान आणि मी अशी आमची सविस्तर चर्चा देखील झाली. निघताना त्यांच्याच घरी सुग्रास भोजनाचा आस्वाद देखील मी घेतला तेव्हा संगीतज्ञ असलेल्या परवीनजी या तितक्याच सुगरण देखील आहेत हे लक्षात आले होते.
योगायोगाने थोड्याच दिवसात माझे लग्न ठरले, आणि ते पार देखील पडले. लग्नाची निमंत्रण पत्रिका परविन सुलताना आणि दिलशाद खान यांना आवर्जून पाठवली होती. त्यांचेही शुभेच्छांचे पत्र लगेच मला आले होते. पुढे आणखी दोन महिन्यांनी दूरदर्शनला पाठवण्यासाठी आम्ही रीतसर प्रस्ताव तयार केला. २६ भागांची मालिका करण्याचे आम्ही ठरवले होते. त्यासाठी स्वरमुग्धा या नावाने डॉ. विनय वाईकर यांनी कथानक देखील तयार केले होते. ते देखील परविन सुलताना यांच्याकडे पाठवले होते. त्यात त्यांनी आणि दिलशादजींनी स्वरमुग्धा या नावाने नवीन राग बांधण्याची ही तयारी दर्शवली होती. शिवाय देशातील उस्ताद झाकीर हुसेन, उस्ताद अमजदअली खान, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासह अनेक मान्यवर संगीत गायक आणि वादकांनी या मालिकेसाठी सहभाग देण्याची तयारी दर्शवली होती. तो प्रस्ताव त्यावेळी दूरदर्शन महानिर्देशालय नवी दिल्ली यांच्याकडे पाठवला देखील होता. प्रस्तावावर विचार सुरू आहे असेही आम्हाला त्यावेळी कळवण्यात आले होते.
याच दरम्यान दूरदर्शनवर वेगवेगळ्या शास्त्रीय संगीत अभ्यासकांवर अशी एक मालिका सुरू झाली होती. त्यात एका भागात परवीन सुलताना यांच्यावरच चित्रण करण्यात आले होते. हा भाग ज्या दिवशी प्रसारित झाला तो बघून लगेच त्यांचे माझे फोनवर देखील बोलणे झाले होते. १९९१ च्या जानेवारी महिन्यात म्हणजेच या घटनेनंतर सात-आठ महिन्यांनी मी काही कामाने सपने सपत्नीक मुंबईला गेलो होतो. तिथे गेल्यावर मी परवीन सुलताना यांना फोन केला. आम्ही दोघेही मुंबईत आलो आहोत असे कळल्यावर त्यांनी आग्रहाने त्यांच्या घरी निमंत्रण देखील दिले. त्यानुसार ठरल्यावेळी आम्ही दोघेही त्यांच्या घरी पोहोचलो होतो. त्या दिवशी परवीनजी आणि दिलशादजी दोघेही एखाद्या जुन्या नवविवाहित मित्राशी ज्या पद्धतीने फिरक्या घ्याव्या तशाच आमच्या फिरक्या घेत होते. त्या दिवशी त्यांनी नाश्त्यात फक्त गोड पदार्थच ठेवले होते. मला फारसे गोड आवडत नाही हे त्यांच्या लक्षात होते. लगेचच परविनजींनी खुलासा केला “आमच्या मध्ये जेव्हा असे नवे जोडपे किंवा संबंधातील एखादी नवीन लग्न झालेली स्त्री पहिल्यांदा घरी भेटायला येते, तेव्हा आम्ही तिथे स्वागत फक्त गोड पदार्थ देऊनच करत असतो. त्या दिवशी कोणतीही नमकीन डिश नसते.
त्यामुळे आज भाभीजी पहिल्यांदाच आमच्या घरी येत आहेत, तेव्हा त्यांचे स्वागत म्हणून फक्त गोडाचे पदार्थ दिले” हे त्यांनी सांगितल्यावर आम्ही त्या गोड मिठाईचाच आस्वाद घेतला होता. नंतरच्या काही महिन्यात केंद्र सरकारची धोरणे बदलली आणि परिणामी माझा तो प्रकल्प देखील बारगळला. त्यामुळे मी बराच अडचणीत आलो होतो. पुढली दोन-तीन वर्ष प्रचंड संघर्ष करतच घालवावी लागली होती. परिणामी स्वरमुग्धा ही प्रस्तावित मालिका आणि त्याच्या मार्गदर्शक परवीन सुलताना हे नाव काहीसे विस्मृतीत गेले होते. १९९३ मध्ये माझी केंद्रीय मंत्री आणि माझे एक सुहृद वसंतराव साठे इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स या केंद्र सरकारच्या संस्थेचे अध्यक्ष झाले. तेव्हा भारतीय शास्त्रीय संगीत परदेशात पोहोचवण्यासाठी ही मालिका उपयोगी पडू शकेल म्हणून त्यांना हा प्रस्ताव पुन्हा एकदा मी दिला होता. मात्र या संस्थेकडे पुरेसे आर्थिक पाठबळ नाही असे सांगून तो प्रकल्प नाकारला गेला. याच दरम्यान नागपुरात एका कार्यक्रमासाठी बेगम परविन सुलताना आणि उस्ताद दिलशाद खान हे दोघेही नागपुरात आल्याचे कळले. तेव्हा माहिती घेऊन मी त्यांना हॉटेल सेंटर पॉईंट मध्ये भेटायला देखील गेलो होतो.
सुमारे अर्धा तास आमची भेट झाली त्यावेळी त्यांनी सर्वांचीच चौकशी केली. नंतर त्यांनाही कार्यक्रमाला जायचे होते आणि मलाही दुसऱ्या कामासाठी जायचे होते. म्हणून ती भेट आम्ही उभयपक्षी आटोपती घेतली होती.ती बेगम परविन सुलताना आणि उस्ताद दिलशाद खान या दांपत्याची माझी झालेली शेवटली भेट होती. त्यानंतर गेल्या जवळजवळ ३३ वर्षापासून आमची भेट होऊ शकलेली नाही. मात्र तरीही त्या उभयतांच्या आठवणी माझ्या मनात आजही ताज्या आहेत. अशा आहे पुन्हा कधीतरी असाच भेटीचा योग येईल आणि जुन्या आठवणींना पुन्हा एकदा नव्याने उजाळा मिळेल आणि पुन्हा एकदा जुनेच स्नेहबंध नव्याने प्रस्थापित होतील.





