माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड•
सर्वसामान्य, शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या निर्भीड नेतृत्वाची निवड• प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान• काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करून अन्यायाविरोधातील लढा तीव्र करणार : महेश करचे
दहिवडी प्रतिनिधी (प्रतिनिधी) : जयराम शिंदे शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि महिलांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे माण-खटावमधील अभ्यासू, निर्भीड आणि सामाजिक भान असलेले युवा नेतृत्व महेश मारुती करचे यांची माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या हस्ते पुणे येथे आयोजित कार्यक्रमात महेश करचे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या नियुक्तीमुळे माण-खटाव तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.महेश करचे यांनी नुकत्याच झालेल्या कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी शेतकऱ्यांच्या वीज व पाणी प्रश्नांपासून ते कामगारांचे हक्क, विद्यार्थ्यांच्या समस्या तसेच महिलांवरील अन्यायाविरोधात सातत्याने आंदोलने करून जनतेचा आवाज बुलंद केला आहे.
त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सागर सावंत, महाराष्ट्र प्रदेश सचिव पंकज पोळ, डॉ. प्रसाद ओंबासे, बाळराजे विरकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.महेश करचे यांच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार तसेच माजी जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






