शिक्षकांतील ‘गुरु’
आपल्याकडे गुरु पौर्णिमा वेगळी व शिक्षक दिन वेगळा साजरा होतो. कारण गुरु तो जो आपल्याला जीवनाबद्दल, स्व बद्दल ज्ञान प्राप्त करून देतो. एखाद्याला गुरु म्हणण्याआधी पारख करावी, आणि पारख झाल्यावर संपूर्ण विश्वास ठेवावा.
जसे पाषाण झालेल्या अहिल्येला श्रीराम, तसे माणसाच्या आयुष्यात गुरु असतात.
पाषाण झालेली अहिल्या म्हणजे सर्व मनुष्य, जे जगतात पाषाण असल्यासारखे, जगाच्या, सृष्टीच्या, एकूण सर्व असण्याच्या, स्व, मी, आयुष्य, मोक्ष, मुक्ती, यांबद्दल, जीवनातल्या ध्येयाबद्दल ज्ञान नसणारे, या विश्वाचे स्वरूप समजून न घेणारे, केवळ उपभोग घेणारे आणि म्हणून पाषाणाप्रमाणे असणारे. श्रीराम यांच्यामुळे अहिल्येचा उद्धार झाला, तसे गुरुमुळे ज्ञान प्राप्त होऊन मनुष्याचा उद्धार होतो.
अहिल्या, तिची गोष्ट फार प्रतिकात्मक आहे, फार मोलाची आहे. तिचे पाषाण होणे, श्रीराम याच्यामुळे पुन्हा पूर्वरूप मिळणे, सारेच प्रतीक, मनुष्याच्या जगण्याचे, कधीतरी, कोणीतरी श्रीराम होण्याचे.
पाषाणरूपातून मुक्त होण्यासाठी श्रीरामासारखे कितीतरी असतात , पाहिजे ती जाणीव, दृष्टी. हे समजणे मनुष्याला साधणारे, म्हणून मनुष्य जन्म मिळाल्याबद्दल कृतज्ञता हवी व या मनुष्य जन्मात एकादा शिक्षक रुपी गुरु मिळतो का याचा शोध घ्यावा.
कारण शालेय शिक्षक हा काही फक्त त्याच्या विषयापुरता तज्ञ नसतो. तो फक्त “क्वांटम फिजिक्स” किंवा “मध्ययुगीन इतिहास” इतकंच शिकवत नाही तर त्यापेक्षा जास्त काहीतरी करतो. शिक्षक विद्यार्थ्यांबरोबर सहप्रवासी होतो; विद्यार्थ्यांच्या अंतरंगाला स्पर्श करतो; त्याला / तिला आपल्यातलं वेगळेपण ओळखायला आणि तो / ती काय करु शकेल याच्या शक्यता आजमवता याव्यात यासाठी मदत करतो. नेमून दिलेला पाठ्यक्रम विद्यार्थ्यांनी रटाळपणे रटावा हे काम पार पाडणारं शिक्षक म्हणजे एक यंत्र निश्चितच नव्हे, किंवा विद्यार्थ्यांवर पाळत ठेवणं, त्यांना शिस्त लावणं, त्यांची क्रमवारी ठरवणं आणि परीक्षेतल्या गुणांच्या निकषावर त्यांची उतरंड लावणं हेही शिक्षकाचं काम नव्हे.
त्याऐवजी, शिक्षक हा सृजनशीलता जाणणारा आणि जोपासणारा, योग्य तो प्रतिसाद देणारा असतो. आपल्याकडून शिकणार््याय विद्यार्थ्यामध्ये वेगळेपणाची, आपण एकमेव आहोत ही भावना जागवणं; आपण इतर कोणासारखं तरी बनायची गरज नाही हा विश्वास त्याच्या मनात रुजवणं; त्यानं उमलत जाण्याची तजवीज करणं, यशापयशाच्या कृत्रिम संकल्पनांच्या जोखडातून त्याला बाहेर आणणं – हे करण्यासाठी “या हृदयीचे त्या हृदयी” असं नातं तयार करणं, हे काम शिक्षक करतो.
शिक्षकानं अजून एक महत्वाचं काम करायला हवं. ते म्हणजे, शिकवणं आणि प्रवचन देणं याला मर्यादा असतात हे जाणणं; शिकवणार््यााच्या डोक्यात पुस्तकी ज्ञान खच्चून भरणं हे काम शिक्षकानं करु नये. त्याऐवजी, विद्यार्थ्याची निरीक्षणशक्ती, विचारशक्ती, विचारांमधून उत्तरं शोधण्याची शक्ती, सौंदर्यदृष्टी जोपासणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अफाट विश्वाचा अनुभव घेण्याची उत्सुकता जागी करणं हे शिक्षकाचं पहिलं कर्तव्य आहे. वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर, विद्यार्थ्यांमध्ये हे सगळं एकदा रुजलं तर तो पदव्या आणि पदविका यांच्याबाहेर पडून आयुष्यभर शिकत रहातो.
शिक्षकानं सौहार्दपूर्ण शिकवण्यातून आणि विद्यार्थ्यानं शारीरिक, बौध्दिक, मानसिक आणि जगायला आवश्यक असणार््या गोष्टींचा विकास जोपासत रहाण्यातूनच मुक्त शिक्षणाकडे आपण वाटचाल करु शकतो…! गिजुभाई बधेका,गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची उदाहरणं विद्यार्थ्यांबरोबर सहप्रवास करुन त्यांना जाणून घेणारे शिक्षक म्हणून नेहमीच आपल्यासमोर आहेत.
अर्थात आजच्या शालेय रचनेत कितीही आटापिटा केला शिकवायचा तरीही अभ्यासक्रमातला काही भाग न शिकवता तसाच राहून जातो. शिकतोय काळकामवेगाची गुणोत्तरं, पण आयुष्यात त्याचा ताळमेळ कसा बसवायचा,ते राहूनच जातं शिकवायचं, पर्यायानी शिकायचं! शब्दांचे अर्थ शिकवतात मात्र त्यांचे अनर्थ कसे होऊ शकतात , ते टाळायचे कसे – नाहीच जात शिकवल्या. तर्काचं शास्त्र असतं मात्र कुतर्क किंवा तर्काच्या पलीकडचं हळुवार काही असतं, हे का सांगायचं टाळून जातात शिक्षक कोण जाणे.
नियम आणि कायदे असतात, मात्र शिकायचे आणि पाळायचे वायदे मात्र सांगतंच नाहीत शिक्षक. असं अभ्यासक्रमाच्या बाहेरचं शिक्षण आपल्या आपण विद्यार्थ्यांनी शिकायचं !त्याचं ना सर्टिफिकेट ना पदवी.अशा मनाच्या शिक्षणाचे केंद्र– आपलं घर, आपला भोवताल,त्यातून राजहंसाप्रमाणे शिकलो तर ठीक नाही तर….पढतमुर्ख,शिक्षित अडाणी निर्माण होणार किंवा अशिक्षित ही अशांवर हावी होत बाजी मारून नेणार.असे अभ्यासक्रमातले न शिकवलेले कितीतरी विषय आपलं जीवन समृद्धीकडे नेतात,मात्र तेथे पाहिजे चोखंदळ विद्यार्थी, ज्याला काय शिकायचंय हे स्पष्ट झालंय अर्जूनासारखं.नेमका लक्ष्यवेध करता येण्यासाठी एकाग्र होऊन निवडक तपशिलांकडे लक्ष केंद्रित करता यायला हवं.
या अनुषंगाने विं दा करंदीकर यांच्या ओळी आठवतात
कोण जगाचा पहिला शिक्षक
शिकवी नरा जो आत्मनिरीक्षण?
बुध्द न, येशु न, व्यासमुनी नच;
ओबडधोबड पहिला दर्पण!
तमाम शिक्षकवृदाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
राजवर्धन जाधव







