*स्पष्ट आणि परखड…**नाना पटोलेंचे रिकामटेकडे उद्योग* ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.अमेरिकन सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे असा दावा काँग्रेसचे नेते आणि प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी टीव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीवर बोलताना केला आहे.
त्यांच्या या विधानामुळे सहाजिकच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.अमेरिकन सरकारने खरोखरी असा निर्णय घेतला असेल तर आतापर्यंत सर्व वृत्तवाहिन्यांवर तो प्रसारित व्हायला हवा होता. इतकेच काय पण देशातील सर्व प्रमुख दैनिकांमध्ये ती हेडलाईन असायला हवी होती. मात्र टीव्ही नाईन वर नाना पटोले यांनी सांगितले याव्यतिरिक्त कुठेही बातमी आलेली नाही. हे बघता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाना पटोले यांना खाजगीत फोन करून ही माहिती दिली की काय अशी शंका येण्यास वाव निश्चित आहे. दुसरे असे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अमेरिकेला किंवा त्यांच्या सरकारला आज तरी काही उपद्रव असल्याचे कोणाच्याच कानावर नाही.
त्यामुळे अमेरिकन सरकार उगाचच ही नसती उठा ठेव कशाला करेल हा देखील प्रश्न येतो. तरीही भारत आपला मित्र देश आहे, त्यामुळे भारतात काही उपद्रव होऊ नये या उदात्त हेतूने डोनाल्ड ट्रम्प यांनी असा संघाला दहशतवादी घोषित करण्याचा निर्णय घेतला असेल तर सांगता येत नाही, पण आज ट्रम्प यांचे मित्र असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच संघाचे स्वयंसेवक आहेत. मग ट्रम्प मोदींशी सुद्धा पंगा घेणार का हा देखील प्रश्न उपस्थित होतो.नाना पटोले हे महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसचे प्रॉडक्ट म्हणूनच ओळखले जातात. नाही म्हणायला डिसेंबर २००८ ते मे २०१८ या काळात ते ऑन डेप्युटेशन काँग्रेस मधून भाजपमध्ये आले होते खरे, पण आपण नरेंद्र मोदींशी भांडून भाजप सोडली असा दावा नानांनी केला होता.
आता नरेंद्र मोदींना नाना पटोले यांच्याशी भांडायला केव्हा वेळ मिळाला हा देखील एक संशोधनाचाच विषय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतात डाव्या संघटना आणि काँग्रेस यांचा कायम विरोध राहिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हिंदुत्ववादी भूमिका आणि डाव्यांची हिंदुत्व विरोधी भूमिका ही त्याला कारणीभूत ठरली आहे, तर काँग्रेसमध्ये नेहरूंच्या काळापासून त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच आपला या देशातील एकमेव प्रतिस्पर्धी वाटत आला आहे. त्यामुळेच काँग्रेसने आतापर्यंत तीनदा संघावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस संघाला संपवू शकली नाही. इतकेच काय पण प्रत्येक बंदीनंतर संघ अधिक जोमाने वाढलेलाच दिसून आला आहे. तीनदा बंदी घालून देखील संघाने आपली १०० वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे आणि आज समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पोहोचून त्यांनी त्या त्या क्षेत्राशी संबंधित संघटना उभ्या केल्या आहेत, आणि त्या संघटना यशस्वीरित्या कामकाज करीत आहेत. त्याचवेळी १४० वर्ष जुना काँग्रेस पक्ष मात्र आज आचके देताना दिसतो आहे हे वास्तव देखील नाकारता येत नाही.काँग्रेसला संघाबाबत असलेला दुसरा पोटशुळ असा की संघाचेच अपत्य असलेला भारतीय जनता पक्ष हा सुरुवातीपासून काँग्रेसचा प्रमुख स्पर्धक राहिला आणि आज हळूहळू करत भाजपने काँग्रेसला सत्तेबाहेर फेकले आणि आज देशातील अर्ध्याअधिक राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे. तर काँग्रेस चार-पाच राज्यांमध्ये फक्त सत्तेत राहिलेली आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जिथे जागा सापडेल, तिथे ज्या कडावर वळला त्या कडावर वार करायचे हेच काँग्रेसचे धोरण राहिले आहे.
मात्र अनेकदा त्यांचे हे वार अत्यंत फालतू आणि पोरकट असतात हे दिसून आले आहे. त्यातही हा पोरकटपणा खालपासून वरपर्यंत सर्वच जण करत आहेत. अगदी राहुल गांधींपासून तर गडचिरोलीच्या जंगलातल्या एखाद्या क्षुल्लक काँग्रेस कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकच जण संघावर तोंडसुख घेण्यात धन्यता मानतो. मग भलेही सामान्य माणूस त्यावर विश्वास ठेवो अथवा न ठेवो, त्यांना त्याचे काहीही सोयर सुतक नसते. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशातील ३६ बँकांमध्ये खाते आहे असा दावा गाना पटोले यांनी केला आहे.
आता संघटना जर चालवायची तर बँकेत खाती असायलाच हवीत. कारण कोणत्याही संघटनेला त्यांचा पारदर्शी कारभार लोकांसमोर ठेवायचा असेल तर दरवर्षी जमाखर्चाचा ताळेबंद मांडावा लागतो. सनदी लेखापालाकडून त्यांना हरितसर ऑडिट करून घ्यावे लागते. आणि ते सरकार दरबारी सादर करावे लागते. त्यासाठी सर्व व्यवहार बँकेमार्फत केलेले जास्त चांगले असतात. माझ्या माहितीप्रमाणे या सर्व प्रक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पार पाडत असतो. संघाचे प्रत्येक गावात कार्यालय आहे. प्रत्येक गावात स्वयंसेवक संघाला गुरुदक्षिणेच्या रूपात समर्पण राशी देत असतात. मग ती कोणत्यातरी बँक खात्यात जमा करावी लागणारच ना. त्यासाठी प्रत्येक गावात संघाची बँकेमध्ये खाती आहेत. तिथले अधिकारी ती खाती ऑपरेट करत असतात. त्याचा रीतसर हिशोब ते संघाला सादरही करत असतात. त्यामुळे संघाची किती बँकांमध्ये खाती आहेत,
ही नसती उठा ठेव नाना तुम्हाला करण्याची काय गरज हा प्रश्न जर कोणी विचारला तर तुम्ही रागावू नका. आता संघाच्या ३६ बँकांमधील खात्यांमध्ये पैसा कुठून येतो हा प्रश्न नाना पटोलेंनी विचारला आहे. त्याचे उत्तर संघाने आपल्या सनदी लेखापालाला दिलेले आहे, इतकेच काय पण आयकर खात्याने जेव्हा जेव्हा विचारणा केली तेव्हा देखील संघाने उत्तर दिलेले आहे. माझ्या आठवणीनुसार १९७१ मध्ये संघाला मिळणारी गुरुदक्षिणा हे उत्पन्न समजून त्यावर आयकर लावण्यात यावा असे प्रयत्न सरकारकडून झाले होते. मात्र संघाने सरकार दरबारी दाद मागितली आणि संघाला त्यातून योग्य ती सूट देखील मिळालेली आहे, ही माझी माहिती आहे. अर्थात मी संघाचा कोणताही अधिकारी किंवा प्रवक्ता नाही. फक्त संघाचा एक अभ्यासक आहे. त्यामुळे नानांनी आयकर विभागाकडून किंवा संघाच्या सनदी लेखपालाकडून ही चौकशी करून घ्यावी आणि मगच आरोप करावे.
आता संघाच्या आर्थिक व्यवहाराबाबत नाना प्रश्न उपस्थित करतात. मात्र नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काय झाले या प्रश्नावर ते कधीच उत्तर देणार नाहीत. याच प्रश्नावर त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून ते दोघेही जामीनावर बाहेर फिरत आहेत, याची नाना आठवण विसरले असतील, तर त्यांना मला आठवण करून द्यावीशी वाटते. नॅशनल हेरॉल्ड हे फक्त एक प्रकरण आहे. अशी अनेक प्रकरणे काँग्रेसच्या संदर्भात आणि अनेक काँग्रेस नेत्यांच्या संदर्भात घडलेली आहेत. त्याचे खुलासे अजूनही देशातील जनतेला करण्यात आलेले नाहीत. व्यापक जनहित लक्षात घेऊन आणि नाना हे जनसामान्यांचे कैवारी असल्यामुळे त्यांनी हे खुलासे जनसामान्यांना कसे केले जातील याचा प्रयत्न निश्चित करावा. त्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत.काँग्रेसमध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यावर पक्षाने नानांना काहीच दिले नाही, म्हणून त्यांनी धानाला भाव दिला नाही हे निमित्त करत आधी आमदारकीचा राजीनामा दिला आणि मग काँग्रेस सोडली. नंतर भाजपमध्ये आल्यावर आधी आमदार आणि मग खासदार झाले, मात्र मी नरेंद्र मोदींशी भांडून बाहेर पडलो असे सांगत त्यांनी पुन्हा खासदारकीचा राजीनामा दिला आणि परत स्वगृही आले.
इथे काही त्यांना पुन्हा खासदारकी मिळाली नाही. पुन्हा आमदार बनवले आणि औटघटकेचे विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांना खुर्ची दिली होती, नंतर तीही सोडावी लागली. त्यातही आधी प्रदेशाध्यक्ष तरी होते आता तिथूनही त्यांची सुट्टी झाली आहे. त्यामुळेच काही कामधंदा राहिला नाही. म्हणूनच असे बिनबुडाचे दावे आणि बिनबुडाचे आरोप नाना करत असतात. आता वेळ जात नसल्यामुळे त्यांना काहीतरी करावे लागते त्यामुळे असे रिकामटेकडे उद्योग ते करतात. मात्र लोक नानांवर काडीचाही विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळेच २०२४ मध्ये नानांना विधानसभेत निसटता विजय मिळाला होता याची आठवण देखील नानांना करून द्यावीशी वाटते. त्यामुळे आता नानांनी शांतपणे राजकारण संन्यास घ्यावा आणि नवेगाव बांधच्या जंगलात जाऊन पक्षी निरीक्षण करावे असा माझा त्यांना आपुलकीचा सल्ला आहे. अर्थात तो मानायचा की नाही हा निर्णय त्यांचाच राहणार आहे.. तोवर तरी त्यांचा हा अव्यापारेषु व्यापार सुरूच राहणार आहे हे चित्र आज तरी दिसते आहे.







