सरपंचांनी ग्राम विकासाची कास धरावी
प्रा.दिनकर गुल्हाने : सरपंच प्रशिक्षणाने पेरला आत्मविश्वास !
पुसद,
………….
” ग्रामपंचायतच्या यंदाच्या निवडणुकीत उच्चशिक्षित तरुणाईला सरपंच पदाची संधी मिळाली.आरक्षणाने महिलांना गाव कारभारासाठी प्रोत्साहन मिळाले.मात्र, खुर्चीत बसल्यानंतर अनुभव व ज्ञानाअभावी सरपंच पदाचे ओझे वाटू लागले.परंतु ‘यशदा’च्या माध्यमातून सरपंच प्रशिक्षणाने मनात आत्मविश्वास डोकावला व ग्राम विकासासाठी ऊर्जा मिळाली “.
पुसद, महागाव, आर्णी तालुक्यातील नवनिर्वाचित प्रशिक्षित सरपंच यांच्या ह्या प्रतिक्रिया आहेत.’यशदा’ पुणेच्या माध्यमातून
पंचायत राज प्रशिक्षण केंद्र अंतर्गत बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात चार दिवशीय निवासी प्रशिक्षण पार पडले.या प्रशिक्षणातून ग्रामपंचायत संविधानिक कारभार कसा करावा, याबद्दल पुरेपूर ज्ञान मिळाले असून विकास कामांसाठी मनात प्रचंड आत्मविश्वास जागविला असल्याचे प्रामाणिक मत प्रशिक्षणार्थी सरपंच अविनाश डाखोळे, अमोल चिकणे, सुधा कांबळे, सुनिता राठोड यांनी समारोप कार्यक्रमात व्यक्त केले.
या कार्यक्रमात सरपंचांनाना प्रशिक्षण प्रशस्तीपत्र प्रा. दिनकर गुल्हाने यांच्या हस्ते देण्यात आले. ‘ प्रशिक्षणातून ज्ञान ऊर्जा घेऊन सरपंचांनी ग्राम विकासाची कास धरावी’,अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य प्रा.वर्षा निकम होत्या.’अभ्यासपूर्ण व जबाबदारीचे भान ठेवून सरपंचांनी पारदर्शी कारभार करावा व ग्राम विकासासाठी पूर्ण वेळ द्यावा’,असे आवाहन त्यांनी केले.यावेळी राज्य प्रवीण प्रशिक्षक अर्चना जतकर, पंचायत राज प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य अश्विन आडे, सत्र समन्वयक लीना तुरकर यांची उपस्थिती होती.
या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन पुसद येथील सहाय्यक जिल्हाधिकारी साजन कुमार यांच्या हस्ते ‘यशदा’ चे डॉ. रामप्रसाद पोले यांच्या उपस्थितीत पार पडले.त्यानंतर प्रत्येक सत्रातून तज्ज्ञ मार्गदर्शकांनी ग्रामपंचायत कारभार विषयक धडे दिले.पंजाब चव्हाण यांनी मासिक सभा, ग्रामसभा, पंचायत पंचांग याबद्दल माहिती दिली.निवृत्त लेखाधिकारी सुभाष बोडखे यांनी सरपंचपदाचे आर्थिक दायित्व, लेखा संहिता, सामाजिक लेखा परिक्षण याबद्दल मार्गदर्शन केले.’ एक पाऊल पुढे, दोन पाऊल मागे’ या खेळातून .राज्य प्रवीण प्रशिक्षक अर्चना जतकर यांनी वंचित घटकाबाबत सरपंचाचा दृष्टीकोन कसा असावा, याचे सुंदर विवेचन केले.प्रा. कैलास राऊत यांनी व्यक्तिमत्व विकास व लोकसहभागातून ग्रामविकास याबद्दल माहिती दिली.शरद वानखेडे यांनी सरपंचांचे अधिकार, कर्तव्य, जबाबदारी व अधिनियम याबाबत धडे दिले
.ग्रामगीतेच्या विवेचनातून प्रा. अर्चना हरिमकर यांनी ग्राम विकासासाठी सूचना दिल्या.’साप शिडी’ या खेळातून प्रवीण प्रशिक्षक सुदाम पवार यांनी सरपंचांनी काय करावे, काय करू नये याबद्दल जाणीव जागृती केली.वंदना ढवळे यांनी जलसाक्षरता, जलसंधारण, घनकचरा व्यवस्थापन यासंदर्भात तर कैलाश राऊत यांनी
सरपंचपदाच्या यशस्वी वाटचालीच्या काही टिप्स सांगितल्या.डॉ. माधवी गुल्हाने यांनी ‘पर्यावरण संरक्षणातून ग्रामविकास’ या संकल्पनेचे जागरण केले.गटकार्य व गट सादरीकरण लीना तुरकर यांनी केले.
‘आमचा गाव, आमचा विकास’, १५ वा वित्त आयोग, मनरेगा याबद्दल तुळशीराम चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.शाश्वत शेती विकासाबद्दल डॉ. सुभाष शर्मा यांनी अनुभव कथन केले.अमोल मिराशे यांनी खरेदी प्रक्रिया, ई-टेंडरिंग, जेम ई-ग्राम ई ग्राम स्वराज्य याबद्दल उपयुक्त माहिती दिली. डॉ. सारिका नाईक यांनी कोविडमुक्त गावाच्या उपाययोजना सांगितल्या.ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक, उत्पन्नाच्या बाबी, ग्रामपंचायत दप्तर याबद्दल विस्ताराधिकारी संतोष डाखोरे यांनी माहिती दिली.डॉ.भालचंद्र देशमुख यांनी सरपंचांना संवादकौशल्य शिकविले.वर्षा निकम यांनी मानव विकास व निर्देशांक, आदर्श गाव संकल्पना याबद्दल अनुभवावर आधारित प्रबोधन केले.
एकूणच प्रशिक्षणातून नवनिर्वाचित सरपंच यांचा आत्मविश्वास वाढीस लागला.







