पुण्यात ‘सकाळ सहकार महापरिषदेचे’ आयोजन !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
पुणे: सकाळ माध्यम समूहाच्या वतीने पुण्यात ‘सकाळ सहकार महापरिषदेचे’ आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आदरणीय शरद पवार साहेब हे उपस्थित राहून सहकार क्षेत्रावर आलेल्या संकटावर संवाद साधला.
या वेळी बोलताना साहेबांनी बिनधास्त चर्चा केली.नागरी सहकारी बँका आणि जिल्हा बँका हा एक महत्त्वाचा विषय आहे. याचे कारण सामान्य लोकांना ज्यावेळी आर्थिक सहाय्याची गरज भासते तेव्हा त्यांच्याकडे सहानुभूतीने बघून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांच्या माध्यमांतून होते. त्यामुळे हा रोल अतिशय महत्त्वाचा आहे.
मी केंद्रीय कृषिमंत्री असताना नागरी सहकारी आणि जिल्हा सहकारी बँकांना वरदान ठरणारी ९७ वी घटनादुरुस्ती केली. ही घटनादुरुस्ती करण्यापूर्वी सर्व सहकारी बँकांची मते जाणून घेतली होती. कायद्यातील तरतुदी सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी आणि उद्दिष्टे साध्य करणारी असावीत याबद्दल कोणाचे दुमत नाही. मात्र, आता रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेमुळे भविष्यात सहकारी बँकांचे अस्तित्व कायम राहील का, याबाबत सहकारी बँक क्षेत्रातील प्रतिनिधी चिंतेत आहेत.
सहकारी संस्थेच्या प्रशासकीय बाबींवर नियंत्रण ठेवण्यामागे नागरी सहकारी बँकांचे क्षेत्र हळुहळू संकुचित करणे, हाच रिझर्व्ह बँकेचा उद्देश दिसून येत आहे. ठेवीदारांच्या हितासाठी रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना व्यापारी बँकांप्रमाणे व्यवसायाचे अनेक मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या बँकांना आर्थिक शिस्त लावण्यासाठी नियम लावण्यास कोणाची हरकत नाही. परंतु सहकारी बँकांचे अस्तित्व अबाधित ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक ठिकाणी रिझर्व्ह बँकेला न घाबरता प्रखर विरोध केला पाहिजे.
केंद्रात माझ्याकडे कृषी खाते असताना त्यासोबत सहकार खातेही होते. आता सहकार खाते स्वतंत्र करण्यात आले. त्याबद्दल माझी तक्रार नाही. पण काही माध्यमांनी सहकारमंत्री अमित शाह यांचा सहकाराबद्दल दृष्टिकोन वेगळा राहील, अशी चर्चा सुरू केली. परंतु शाह हे सहकाराच्या क्षेत्राची जाण असलेले मंत्री आहेत. अहमदाबाद सहकारी बँकेचे संचालक असताना शाह यांच्याशी माझा संबंध आला. त्यांचा दृष्टिकोन सहकारी बँकेच्या हितासाठी अनुकूल राहील असा विश्वास आहे. राज्यातील सहकारी क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे. केंद्र सरकारशी आपण सुसंवाद घडवून त्यातून निश्चितच चांगला मार्ग निघेल.



