सांगली जिल्ह्यातील कम्युनिस्टांचा सच्चा शिलेदार
कॉ.शिवाजीराव दौंडे———लेखक-कॉ.मारुती शिरतोडे
*लेखक-कॉ.मारुती शिरतोडे
सांगली जिल्ह्यातील कुंडल म्हणजे क्रांती करणाऱ्यांचं गाव असं सर्वसाधारणपणे गावची ओळख आहे.
त्याला कारणही तसंच.अहो, स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात या गावातील शेकडो क्रांतिकारकांनी आपल्यावरील ब्रिटिशांच्या गुलामगिरीचं जोखड फेकून देण्यासाठी जीवाचं रानं केलं होतं, कित्येक जण तुरुंगात गेले होते, कित्येकांनी हालअपेष्टा सहन केल्या होत्या. मग स्वातंत्र्यलढ्याच्या पहिल्या पर्वातील काम करणारा आणि १८५७ च्या बंडात सातारला तोफेच्या तोंडी गेलेला हुतात्मा नाना रामोशी पासून १९४२च्या चले जाव चळवळीत सातारच्या प्रती सरकार च्या राजधानी असणाऱ्या कुंडलमधील तुफान सेनेचे सरसेनापती क्रांती अग्रणी जी डी बापू लाड ,कॅप्टन आकाराम पवार,रामचंद्र (भाऊ) लाड ,कॅप्टन शाम लाड ,नाथाजी लाड ,गणूबाई कोष्टी अशा कितीतरी क्रांतीवीरांचा यामध्ये समावेश होतो.अशा रीतीने दिसेल अन्याय जिथं , पेटून उठून आम्ही ही वृत्ती अंगी असणारी माणसंच समाज बदलू शकतात हे दाखवून देणारी माणसं या गावाने पाहिली आहेत. स्वातंत्र्यानंतर या गावातून कार्ल मार्क्स, लेनिन यांचा जग बदलाचा विचार घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षासारख्या क्रांतिकारी विचारसरणीच्या पक्षात राहून कित्येक वर्षे बापू सारख्या महान नेतृत्वाने जनतेचे लढे कसे लढावेत याचा वस्तुपाठ या गावाला घालून दिला आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून स्वातंत्र्योत्तर कालखंडातील पन्नास वर्षाहून अधिक काळ सांगली जिल्ह्यातील काही मोजकीच गाव लालबावट्याची गाव म्हणून प्रसिद्ध होती.त्यात कुंडल, कवठे एकंद,बांबवडे, आरवडे, हणमंतवडीये ,वाळवा अशा गावांचा आपल्याला उल्लेख करावा लागतो. अशा मानव मुक्तीसाठी लढू पाहणाऱ्या माणसांची परंपरा असणाऱ्या कुंडल मध्ये जग बदलाचा क्रांतिकारी विचार पेरत जाणारा लाल बावटा खांद्यावर घेतलेला आणि तो आयुष्यभर खाली न ठेवलेला एक सच्चा कॉम्रेड आम्ही पहिला तो म्हणजे कॉम्रेड शिवाजीराव दौंडे(आण्णा ).
कुंडलचे आमचे डाव्या चळवळीतील ज्येष्ठ सहकारी कॉम्रेड शिवाजीराव दौंडे यांना आम्ही ‘आण्णा ‘म्हणत असू.गरिबीत जन्माला आलेलं हे पोरगं अगदी विद्यार्थिदशेपासून राजकारण,समाजकारण यामध्ये सक्रिय राहिलेलं कुंडल गावानं पाहिलेलं आहे.कामगार चळवळीत स्वतःला झोकून देत राहणारा हा कित्येक वर्षे गिरणी कामगार म्हणून काम करत करत आहे रे आणि नाही रे वर्गातील दरी कमी करण्यासाठी लाल बावट्याची पताका खांद्यावर घेऊन कष्टकरी,कामगार शेतकऱ्यांच्या प्रश्नावरची रस्त्यावरील लढाई करीत राहीला. कुंडल मध्ये सुरुवातीपासूनच क्रांतीअग्रणी जी.डी.बापूं चा एक विश्वासू आणि लढाऊ साथीदार म्हणून त्यांना संपूर्ण गाव ओळखत होतं आणि संपूर्ण गाव ‘आण्णा’ या आदरार्थी नावानेच हाक मारत होतं. तसा अण्णांशी माझा संबंध हा मी जेव्हा इयत्ता आठवी ला क्रांतिसिंह नाना पाटील बोर्डिंगला राहायला गेलो तेव्हापासूनच आला.आम्ही पोरं बोर्डिंग मध्ये राहयचो आणि प्रतिनिधी हायस्कूलमध्ये शिकायला जायचो.तेव्हा बोर्डिंगमध्ये जी डी बापू कायम बसलेले असायचे.
मुलांच्या वरती मायेने प्रेम करणारं बापू सारखं व्यक्तिमत्व सतत बोर्डिंग च्या प्रवेशद्वाराजवळील पूर्व बाजूच्या खोलीत बसलेलं असायचं आणि समोर नेहमी दहा-पंधरा लोकांचा गराडा पडलेला असायचा. आम्ही पोरं शाळेला जाताना आणि परत संध्याकाळी बोर्डिंगमध्ये आलो तरी हेच चित्र दिसायचं. लोकांच्या प्रश्नावर प्रबोधन करून लोकांना एक विचारांची निश्चित दिशा देण्यासाठी आयुष्यभर धडपडणारं व्यक्तिमत्व जी डी बापू लाड यांनी उभ्या महाराष्ट्राला लढण्याची प्रेरणा दिली.अशा या व्यक्तिमत्त्वावर मनापासून प्रेम करणाऱ्या अनेक माणसांच्या मध्ये मला एक माणूस नेहमी उठून दिसायचा .ते म्हणजे दौंडे अण्णा. कारण अण्णांचा आवाज मोठा खणखणीत असायचा,पांढराशुभ्र शर्ट व घोळदार लेंगा घालून हा बलदंड शरीराचा माणूस बापूंच्या कडे बोर्डिंग मध्ये येऊन चर्चा करत बसलेला आम्हाला नेहमी दिसायचा.आण्णा बोर्डिंगमध्ये आले की आम्हाला विचारायचे” पोरांनो, जेवण केलं का ?जेवण चांगल आहे का ?असं जाता-येता न विसरता विचारायचे.आम्हाला आण्णांचं कौतुक वाटायचं. यातूनच अण्णांची ओळख झाली. पुढे मी जी.डी.बापू सोबत वेगवेगळ्या आंदोलनात, कार्यक्रमात सहभागी होऊ लागलो तेव्हा अण्णा आमच्यासोबत असायचेच. त्यामुळे अण्णांना वाटायचं की मारुती, हा नक्की काहीतरी करुन दाखवेल.तसे ते जी.डी बापूंना आमच्यासमोर बोलूनही दाखवत असत.
असं माणसांची चांगली पारख असणारा हा माणूस खरंच एक अत्यंत अभ्यासू कार्यकर्ता, कष्टाळू कार्यकर्ता आणि जनतेच्या प्रश्नावरील कोणत्याही लढ्यात मनापासून सहभागी होणारा खराखुरा कॉम्रेड होता हे मी माझ्या विद्यार्थिदशेपासून पाहिलेला आहे.तसा अण्णांचा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय.त्यांचा दिवस पहाटेपासून सुरू व्हायचा. पहाटे उठून वृत्तपत्रांचे गठ्ठे वेगवेगळे करून सायकल वरून तर कधी पायी पेपर वाटत गाव भर आण्णा फिरायचे तसेच पूर्वी आसपासची गावही अण्णांनी पेपर वाटण्यासाठी पहाटंपासून पालथी घातली आहेत. हे करता करता अण्णांनी घराकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही.आण्णाच्या खांद्याला खांदा लावून त्यांची पत्नी कुसुमताई सर्व कामात साथ देत राहीली. अण्णांनी आपली मुलं खूप शिकवली.अण्णांचा एक मुलगा धनंजय हा माझा हायस्कूलमधील वर्गमित्र. आम्ही एकाच वर्गात शिकत होतो .तेव्हापासून आज अखेर मी पाहतोय की धनु हा सुद्धा अण्णांच्या पावलावर पाऊल टाकून वृत्तपत्र व्यवसायात खंबीरपणे उभा राहिला,
रमला आणि आजही धनु वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय किर्लोस्कर वाडी येथे करताना दिसतो. अण्णांचा व्यवसाय आदर्शपणे चालवण्याचं काम धनंजयनं केलयं. दुसरा मुलगा रयत शिक्षण संस्थेत आपल्या शिवधडीशी असणाऱ्या रामानंदनगर महाविद्यालयात प्राध्यापक आहे. एक कंडक्टर आहे.दुर्देवाने काही वर्षापूर्वी एका मुलाचे निधन झाले आहे.असं हे सगळं कुटुंब म्हणजे एका विशिष्ट विचारांच्या सोबतीनं दररोजच्या दैनंदिन जीवनात आनंदाचे रंग भरणारं कुंडल मधील आगळेवेगळे कुटुंब समजलं जातं.अण्णांना कधीही आम्ही निवांतपणे बसावं या अर्थानें बसलेले बघितले नाही.
कारण अण्णांचा कुंडल एसटी स्टँड वरील वृत्तपत्र व्यवसायाचा धंदा झाला की घरात येऊन सुद्धा आण्णा घराच्यासमोर वृत्तपत्र विक्रीला ठेवत असत आणि किराणा दुकानही चालवत असत. शिवाय इथेच बसून वाचन ,लेखन करत असत.पेपर मधून आलेल्या अनेक बातम्यांचा कात्रणांचा संग्रह करीत असत. अण्णा स्वतः पत्रकार ही होते. अण्णांच्या असंख्य बातम्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या आहेत.
त्या बातम्यांच्या कात्रणावर अनेक दिशादर्शक पुस्तक होऊ शकतील.इतकं लिखाण आयुष्यभर अण्णांनी केलेलं आहे. ते ही कष्टकरी कामगार शेतकऱ्यांचे, तळागाळातील जनतेचे राहणीमान कसे सुधारावे यासाठी अण्णांनी लिहलेय.जनतेच्या मागण्यावर शासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून आवाज उठवला आहे. त्यावर लेखन केलेले प्रसिद्ध झालेले आहे आणि कुंडल गावापासून दिल्लीच्या संसद भवनापर्यंत अनेक वेळा जनतेच्या लढ्यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष ,अखिल भारतीय किसान सभा ,ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस(आयटक) या माध्यमातून अण्णा व अण्णांची पत्नी सहभागी झालेले आहेत.
क्रांतिसिंह नाना पाटील, भाई एन डी पाटील ,कॉम्रेड गोविंद पानसरे कॉ.नामदेव गावडे अशा डाव्या चळवळीतील अनेक दिग्गज प्रभावळी सोबत अण्णांचा खूप सलोखा होता.आण्णा सारखा लढाऊ कार्यकर्ता, अभ्यासू कार्यकर्ता सर्वांनाच आवडायचा. अशा रीतीने परिवर्तनाच्या लढ्यात लालबावटा खांद्यावर घेऊन स्वतःला जनतेच्या लढ्यात गाडून घेतलेला सांगली जिल्ह्यातील कम्युनिस्टांचा खराखुरा आयडॉल म्हणजे कॉ.शिवाजीराव दौंडे( अण्णा).आण्णांना माझी आठवण आली की मला नेहमी फोन करायचे, म्हणायचे’ मारुती कुंडलला ये ,मी एक पत्रक लिहलयं ते बरोबर आहे का वाचून बघ, आपल्याला ते छापायचे आहे. अमुक अमुक ठिकाणी कार्यक्रम आहे तू यायला पाहिजे”असे अनेक वेळा अण्णांचे मला फोन येत असत. अण्णा थेट मुख्यमंत्र्यांना, पंतप्रधानांना पत्र पाठवायचे.त्यांनी लिहिलेले पत्र वाचायला मला फोन करून बोलवायचे. मग मी कुंडलला जाणारं,अण्णांची भेट घेणारं, पत्र वाचणारं मग आण्णा ते पत्र फायनल करणार. इतकी किमंत माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आण्णा किमंत द्यायचे.
अण्णाची पत्नी कुसुम ताई या तर महिलांच्या प्रश्नावर नेहमी आक्रमक असायच्या. कुंडल मध्ये सुमन दौंडे, कुसूम दौंडे,सुमन गायकवाड यांचे चळवळीतील सक्रिय योगदान संपूर्ण कुंडल गाव कधीच विसरणार नाही इतकं या तिघींनी जीडी बापूंच्या मार्गदर्शनाखाली या गावात आणि आसपास महिलांना संघटित करण्यात,महिलांचे प्रबोधन करण्यात आणि त्यांना लढ्यात उतरवण्यात फार मोठी मदत केलेली आहे.अशा या कुसुमताई सुद्धा पतीच्या बरोबर प्रत्येक कामात खांद्याला खांदा लावून सहभागी व्हायच्या.अण्णांचा त्या एकही शब्द मोडत नसत हे आम्ही नेहमी पाहत आलोय.
असं हे दौंडे दांपत्य म्हणजे लढणार आणि समाज बदलू पाहणारं कुंडलमधील एक आदर्श दाम्पत्य. अण्णांनी वीसवर्षापूर्वी सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक सुद्धा लढवलेली होती.ती ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विळा कणीस या चिन्हावर.आम्ही सर्वजण अण्णांच्या प्रचारात होतो. अण्णांच्या प्रचार सभांना कॉम्रेड गोविंद पानसरे,नामदेव गावडे, कॉ.भालचंद्र कांगो सारखी मोठी मंडळी मतदार संघात आली होती. आमच्या दृष्टीने अण्णा खरेखुरे कॉम्रेड असले तरी गावातल्या प्रत्येक माणसाने कधी पक्षाची फुटपट्टी म्हणून आण्णांकडं कधी पाहिलंच नाही.
तर एक चांगला माणूस,इमानदार माणूस, माणसं जोडणारा माणूस आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारा आपला माणूस या दृष्टीनेच पाहिलेय.पण हे सर्व घडण्यासाठी सुद्धा त्या व्यक्तीकडे एक विचारांची बैठक पक्की असावी लागते ती अण्णा कडे होती म्हणूनच आण्णा सच्चे कॉम्रेड होते असा आम्हाला वाटतं. अण्णांनी जसा अनेक लढ्यात सहभाग घेतला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलनात सहभाग घेतला तसंच आण्णा एकदा अंदमान निकोबार बेटावर विमानाने जाऊन आले.
तेथे त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. तिथल्या कामगारांचे जीवनमान पाहिलं आणि त्याच्यावर एक मोठा दीर्घ लेख वृत्तपत्रातून प्रसिद्ध केला. अनेक वर्षे हे कॉम्रेड शिवाजीराव दौंडे कम्युनिस्ट पक्षाच्या सांगली जिल्हा कौन्सिलवर पदाधिकारी होते.किसान सभा,आयटक मध्ये जिल्हा कौंसीलवर पदाधिकारी म्हणून जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
गेल्या काही वर्षात अण्णांचा पाय सुजला होता. त्यानंतर ऑपरेशन झालं.परंतू आण्णा कधी गप्प बसले नाहीत.कॉ.डॉ.श्रीकांत जाधव यांना सोबत घेऊन अनेक कार्यक्रमाला अण्णांनी वॉकर घेऊन हजेरी लावलेली आहे. परंतु गेल्या वर्षी कोरोना सारखी महामारी संपूर्ण जगावर आली. अनेक माणसं आपल्या माणसांना सोडून गेली.तसेच आण्णा सुद्धा आपल्याला सोडून गेले. अण्णांचे अखेरचे दर्शनही घेता आले नाही. पण आण्णांनी आम्हाला दिलेला मंत्र आम्ही कधीच विसरणार नाही तो म्हणजे रडत बसू नका, लढत राहा.
अण्णा म्हणायचे,आपण रडणारी माणसं नसून लढणारी माणस आहोत हे लक्षात ठेवा. या एका वाक्यातच आम्हाला मार्क्स लेनिनच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याच महान तत्वज्ञान अण्णांनी आम्हाला दिलं. तेव्हा मी एक अण्णांचा वैचारिक वारसदार म्हणून नक्कीच आण्णाचा मंत्र लक्षात ठेवीन. अण्णांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अण्णांच्या स्मृतीस मी क्रांतिकारी विनम्र अभिवादन करुनलाल सलाम करतो.
कॉम्रेड मारुती बळवंत शिरतोडे
वाझर, ता.खानापूर जि. सांगली







