ज्योती ढाणके यांची “अंकनाद” या प्रणालीच्या मार्गदर्शक (मेंटर) पदी निवड
पावकी, निमकी, पाऊणकी पाढेंचा अचूकतासाठीचे महत्व
पुणे- अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) मान्यता दिलेल्या MAAP EPIC COMMUNICATION PVT. LTD. या कंपनीतर्फे “अंकनाद” या वैशिष्ट्यपूर्ण प्रणाली ची निर्मिती केली आहे. अंकनाद म्हणजे गणित आणि जोडीला संगीतही अंकनाद मध्ये पाढे आणि कोष्टके यांना सुश्राव्य संगीताची जोड दिल्याने, पाठांतर न राहाता त्याबरोबर आकलन शक्तीही वाढते. पावकी, निमकी, पाऊणकी अशी कोष्टके याद्वारे सहजपणे आत्मसात केली जातात. यामुळे लहान-मोठ्या आकडेमोडी तसेच इतर गणिते सोडविणे सहज सोपे होते. कॅल्क्युलेटरचा वापर न करता वेगाने व अचूक गणित / हिशोब करणे हे सहज साध्य होते. अंकनाद हे केवळ अभ्यासाचे ॲप नाही तर ते स्मरणशक्ती वाढविण्यासाठी मदत करणारे, मेंदूची क्रियाशीलता वाढवणारे एक उत्तम टॉनिक आहे. पुणे महानगरपालिकेच्या 242 शाळांमध्ये तसेच राज्यातील 36 जिल्ह्यातील 714 शाळांमध्ये यशस्वी चाचणी या अॅपची झाली आहे. “अंकनाद” प्रणालीचे कल्पनाकार व प्रणेते श्री मंदार नामजोशी असून सौ. निर्मिती नामजोशी यांनी हे ॲप बहु भाषेत नेण्याच्या प्रक्रियेला गती दिली तसेच श्री पराग गाडगीळ यांचे ही बहुमोल योगदान या ॲपच्या निर्मिती मध्ये आहे.
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय लवळे तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथे कार्यरत असणाऱ्या विज्ञान विभागातील सहाय्यक प्राध्यापिका सौ. ज्योती ढाणके यांची अंकनाद या अॅपचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या “गणितालय” उपक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्री आर. एन. पाटील यांनी मार्गदर्शन आणि अभिनंदन केले आहे.
आपल्या दैनंदिन जीवनात गणिताला अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र आज नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी ज्या ठिकाणी जास्त स्पर्धा आहे, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना गाळण लागावी म्हणून गणिताचा वापर करतात. यामुळे गणिताची भीती वाढते आहे. यासाठी आपली शिक्षण व्यवस्था अधिक भक्कम व्हावी, विज्ञानातील विविध शाखा गणिताच्या आधारावर विकसित होत असतात. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्री आर. एन. पाटील यांनी व्यक्त केले.
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अपूर्ण अंकांचे पाढें जर पाठ असतील तर ह्या विद्यार्थ्यांना गणित अधिक वेगाने आणि अचूक सोडवता येतील व म्हणजेच कॅल्क्युलेटर चा वापरायची सुद्धा गरज पडणार नाही असे श्री मंदार नामजोशी म्हणाले.
शाळेत बालवाडी पासूनच अंकनाद चे संस्कार मुलांवर झाले पाहिजेत. जेणेकरून हे सर्व पाढे आत्मसात झाले तर गणित हा विषयावर पुढे जाऊन सर्वच शैक्षणिक आघाड्यांवर छान प्रभुत्व मिळवता येईल. असे कम्युनिकेशन एंड एडमिनिस्ट्रेशन चे प्रमुख श्री समीर बापट म्हणाले.







