१७ ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन
त-हाडी
आंतरराष्ट्रीय दारिद्र्य किंवा गरिबी निर्मूलन दिन: १७ ऑक्टोबर
१७ ऑक्टोबरला जगभरात ‘आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिन’ (International Day for The Eradication of Poverty) आयोजित केला जातो.
२०१९ सालाची संकल्पना – ‘अॅक्टिंग टुगेदर टू एमपॉवर चिल्ड्रेन, देअर फॅमिलीज अँड कम्यूनिटीज टू एंड पॉवर्टी’
उद्देश्य – जगभरातील समुदायांमध्ये गरीबी हटविण्यासाठी केल्या जाणार्या प्रयत्नांच्या बाबतीत जागरूकता वाढवणे.
२० नोव्हेंबर १९८९ रोजी ‘बाल हक्क विषयक करारनामा’ (UNCRC) स्वीकारला गेला. यावर्षी त्याला ३० वर्ष पूर्ण झालीत. या कराराने वंश, धर्म किंवा क्षमता लक्षात न घेता प्रत्येक बालकाचे नागरी, राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क ठरवून दिले आहेत.
महत्त्व – दारिद्र्य हा मनुष्यासाठी लाभलेला एक अभिशाप आहे. दारिद्र्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, जसे की शिक्षण न घेणे, खालच्या स्तराचे जीवनमान, उपासमार आणि सामाजिक अवहेलना आदी. वाढत्या मागणीमुळे आणि महागाईने ही समस्या अधिकाधिक वाढत चाललेली आहे. या समस्येला हाताळण्यासाठी आणि एक सामाजिक वातावरण तयार करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून या दिवसाचे आयोजन केले जाते.
भारत सरकारचे प्रयत्न
केंद्र शासनाने एप्रिल १९९९ पासून दारिद्र्य निर्मूलनासाठी ‘स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना’ सुरू केली. या योजनेमधील कमतरता दूर करण्यासाठी आणि नवीन धोरण निश्चित करण्यासाठी प्रा. आर. राधाकृष्ण समितीची स्थापना केली गेली. या समितीच्या शिफारशीवरून १८ जुलै २०११ रोजी ‘राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM)’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. NRLM अभियानात गरिबांच्या बचत गटांच्या माध्यमातून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
पार्श्वभूमी
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने (UNGA) २२ डिसेंबर १९९२ रोजी दरवर्षी १७ ऑक्टोबरला ‘आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिन’ आयोजित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. या दिवशी दारिद्र्य निर्मूलनासाठी विविध राष्ट्रांकडून केले जाणारे प्रयत्न, विविध विकास कार्ये व योजना यांच्यासंबंधी माहिती जाहीर केली जाते.
अत्यंत गरीबी, हिंसा आणि उपासमारीचे बळी पडलेल्यांच्या सन्मानार्थ १९४८ साली १७ ऑक्टोबर रोजी पॅरिसमध्ये एक लक्षाहून अधिक लोक एकत्र आले होते, जेथे ‘मानवाधिकार सार्वत्रिक घोषणापत्र (Universal Declaration of Human Rights)’ यावर स्वाक्षर्या करण्यात झाल्या. या दिवसाला चिन्हांकित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने या तारखेची निवड केलेली आहे







