उन्हाळा कांदा झाला आता वर्षाचा
बाजारभावातील चढ-उतार यामुळे कालावधी वाढला
लाल कांदा लागवडी होत आहे उशिरा
त-हाडी…साधारणपणे उन्हाळ कांदा लागवडीचा कालावधी १५नोव्हेंबरपासून सुरू होतो ,१५ नोव्हेंबर ते१५ डिसेंबर या कालावधीत लागवड केलेला कांदा उत्पादनात तसेच थंडीच्या कालावधीत येत असल्याने कांद्याला चांगले उत्पादन मिळते, परंतु गारपीट, परतीचा पाऊस, नैसर्गिक वातावरणातील बदलामुळे कांदा लागवडीचा कालावधी वाढून तो आता जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत जात असल्याने, पर्यायाने लागवड केलेला कांदा उशिराने येत असल्याने , कांदा साठवणूक ही उशिरा केल्याने कांदा अधिक काळ टिकतो, त्यामुळे मागील काही वर्षात शेतकरी दसऱ्यापर्यंत कांदा विक्री करत होते पण बाजारभावातील चढ-उतारामुळे कधी भाव कमी तर कधी भाव जास्त यामुळे शेतकऱ्यांना ही द्विधा मनस्थिती निर्माण होती, पर्यायाने शेतकरी ही भाववाढीच्या आशेने साठवलेला कांदा अधिक काळ टिकत असल्याने डिसेंबर महिना उंबरठ्यावर आला असला तरी अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा चाळीत साठवून ठेवलेला आहे म्हणजेच १५ नोव्हेंबरला लागवड केलेल्या कांद्याला आता एक वर्षे पूर्ण होऊनही शेतकऱ्यांच्या चाळीत कांदा भाववाढीच्या आशेने गुदमरत असून सहजिकच येणाऱ्या काही दिवसात बारा ते चौदा महिने कांदा साठवणूक करण्याची क्षमता शेतकऱ्यांकडे असल्याने बाराही महिने कांदा शहराला पुरविले जात आहे.
कांदा साठवणूक करतेवेळी जंतुनाशक पावडर ,गंधक यांचा वापर करून कांदा अधिक काळ टिकत असल्याने शेतकरी विविध प्रयोग वापरून कांदा अधिक काळ टिकविण्यासाठी प्रयत्न करतात.
वजन घटले, मोड वाढले
दिवसेंदिवस उन्हाळ कांद्याचा कालावधी वाढत चालल्याने कांद्याचे वजन घटत असून मोड येण्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे.
लाल कांदा उशिरा येत असल्यामुळे उन्हाळ कांद्याची उशिरा विक्री
गेली अनेक दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे व परतीचा पाऊस उशिरा पडत असल्यामुळे लाल कांदा लागवडी उशिरा होत आहे सहजिकच बाजारात लाल कांदा येण्यास उशीर होत असल्यामुळे उन्हाळ कांदा शेतकरी जास्त दिवस ठेवत आहे.
जुलै ऑगस्ट महिन्यातील कांदा लागवडी उशिरा
दहा-बारा वर्षांपूर्वी शेतकरी जुलै-ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात लाल कांदा लागवडी करत होते पण परतीच्या पावसात मोठ्या प्रमाणात कांदा सडला जात होता म्हणून दिवसेंदिवस शेतकरी लाल कांदा लागवडीत उशिरा करत आहे.







