सांगली जिल्ह्यातील खराखुरा सच्चा कम्युनिस्ट कार्यकर्ता कॉ.नासर शेख यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमीत्त क्रांतीकारी विनम्र अभिवादन*
जग बदलाचा खराखुरा विचार हा कम्युनिस्ट विचार आहे. ज्याने कम्युनिस्ट विचार स्वीकारला, ज्याने कम्युनिस्ट विचार जोपासला. तो आयुष्यात कधीही आपल्या तत्वांशी तडजोड करणार नाही हे समीकरण ठरलेले असते. असाच एक आयुष्यभर कम्युनिस्ट विचार जोपासणारा आणि अखेरपर्यंत खांद्यावर घेतलेला कम्युनिस्टांचा लाल बावटा खाली न ठेवणारा सांगली जिल्ह्यातील खराखुरा कम्युनिस्ट कार्यकर्ता मी पाहिला होता. तो होता कॉ.नासर नबीलाल शेख.माधवनगर तालुका मिरज जिल्हा सांगली येथील कायमचा रहिवाशी असणारा..आजपासून अकरा वर्षांपूर्वी 18 डिसेंबर 2010 रोजी हा ज्येष्ठ कम्युनिस्ट कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला. कॉम्रेड नासर भैय्याच्या स्मृतीस क्रांतिकारी अभिवादनासह लाल सलाम….🙏…
तो काळ होता 1988 चा म्हणजे सुमारे बत्तीस वर्षापूर्वीचा. मी दहावीला प्रतिनिधी हायस्कूल कुंडल येथे शिकणारा व
्क्रांतिसिंह नाना पाटील विद्यार्थी वस्तीगृह कुंडल येथे राहणारा विद्यार्थी होतो. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी चळवळी जोरात काम करीत होत्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सातत्याने कुठे ना कुठे आंदोलन प्रबोधन चाललेले असायचे. आपल्या सांगली जिल्ह्यात सुद्धा काही विद्यार्थी संघटना कार्यरत होत्या. त्यामध्ये ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन या संघटनेचे काम खूप मोठे होते आणि या संघटनेचा विद्यार्थी नेता होता कॉ.शाहीन नबीलाल शेख. हा शाहीन शेख आपला चळवळीतील मित्र कॉम्रेड श्रीकांत कांबळे यांना घेऊन संघटना बांधणीसाठी जिल्हाभर फिरत असायचा.विद्यार्थ्यांची आंदोलने संघटीत करीत असायचा. क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांच्याकडे बोर्डिंगमध्ये अनेक वेळा शाहीन आणि श्रीकांत यायचे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोर्डिंग मध्ये मीटिंग घ्यायचे. गाणी व्हायची या सगळ्यांमुळे मलाही विद्यार्थी संघटनेत काम करण्याची आवड निर्माण झाली
.मग मी सुद्धा शाहीन, श्रीकांत सोबत संघटनेच्या कामानिमीत फिरू लागलो. जिल्हाभर फिरतानाचा माझा पहिला संबंध शाहीन शेख यांच्या माधवनगर तालुका मिरज येथील घराशी आला.शाहीनचे घर म्हणजे केवळ चार भिंतीत नातेसंबंध जपणारे आत्मकेंद्रित कुटुंब नव्हते.तर कम्युनिस्ट विचार डोक्यात घेऊन समाजात काम करणारे,डाव्याचळवळींत झोकून दिलेले अन घरातील सगळीच माणसं समाज परिवर्तनाच्या भावनेने भारावलेले कुटुंब होते.या घरात तिन सख्खे भाऊ,आई,दोन वहिनी, एक दोन छोटी मुले एवढी माणसे होती.
तिन भावांपैकी शाहीन विद्यार्थी चळवळीत काम करायचा,दुसरा भाऊ कॉम्रेड नासर शेख कम्युनिस्ट पक्षाचे काम करायचा,तिसरा भाऊ कॉम्रेड आयुब शेख वीज कामगार संघटनेत झोकून द्यायचा.तर घरातील महिला भारतीय महिला फेडरेशन मध्ये काम करायच्या.हे घर व सगळं कुटुंब जेव्हा मी एका विचारसरणीने भारावलेलं पाहिलं तेव्हा मला कम्युनिस्ट विचार समजून घेण्याची अधिक ओढ निर्माण झाली.माधवनगर च्या राजगुरूनगर झोपडपट्टीत एका साध्या घरात राहणार हे कुटुंब म्हणजे कार्यकर्त्यांच आश्रयस्थान होतं. अतिशय प्रेमळ माणसं असणारं, घरी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची आदराने चौकशी करणारं,खाऊ घातल्या शिवाय पाठवून न देणारं आणि मित्रांनो संघटना करा तरच आपला विकास आहे असं मनावर ठसवणारं हे आगळवेगळं कार्यकर्त्यांच घर होतं. याच घरातील तीन सख्ख्या भावापैकी कॉ.नासर नबीलाल शेख हे मला अतिशय भावलेलं व्यक्तिमत्व होतं.लोकांना आपलंसं करण्यात, भाषण करण्यात ,सुंदर अक्षर काढण्यात,संघटना बांधण्यात शाहीन नासर आणि आयुब हे तिघेही भाऊ जरी पटाईत असले तरीही नासर नबीलाल शेख हा भाऊ मात्र अतिशय हुशार आणि कम्युनिस्ट विचार चोवीस तास डोक्यात घेऊन काम करणारा सच्चा कम्युनिस्ट होता. आम्ही सर्वजण त्याला ‘भैय्या’म्हणत असू. ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन चे काम करताना अनेकवेळा शाहीन बरोबर माधवनगर ला घरी येणे जाणे व्हायचे.
शाहीन श्रीकांत आणि नासर भैया यांचेही वाझरला आमच्या घरी येणे जाणे असायचे. त्यामुळेच दोन्ही घरांचे एक सलोख्याचे घट्ट नाते निर्माण झाले होते. पुरोगामी चळवळी कोणत्या?आपण नेमके कोणते काम करावे? तेच का करावे? समाजात वावरताना आपली जबाबदारी काय? सध्याची राजकीय सामाजिक स्थिती काय? या सगळ्यांविषयी नेहमीच मला नासर भैय्या आणि शाहीन सांगत असायचे.त्यामुळेच खरतर मी डाव्या विचाराचा पाईक बनलो.पुरोगामी चळवळीत सहभागी होण्याची प्रेरणा जी.डी.बापू व हे दोन भाऊ यांच्या मुळे मिळाली हे मी कधीच विसरू शकत नाही.कॉम्रेड नासर भैय्यानी मला पहिल्यांदा खरा कम्युनिस्ट कसे बनावे हे लिओ शाओ ची यांचे गाजलेले पुस्तक वाचायला दिले. ते मी वाचून काढले. जेव्हा मी ते पुस्तक परत द्यायला भैय्याकडे गेलो तेव्हा भैया मला म्हणाला होता की मारुती, कम्युनिस्ट कार्यकर्ता हा डी क्लास तयार व्हायला पाहिजे.तरच तो पक्षाचे काम नेटाने करू शकतो. पुढे जेव्हा 1992 साली मला नोकरी लागली आणि योगायोगाने सांगलीतच माझी नियुक्ती झाली त्यामुळे नासर शेख, शाहीन शेख यांचा संपर्क अधीकच वाढला. सांगलीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे,ए.आय.एस.एफ.चे कार्यालय वेलणकर मंगल कार्यालयासमोर 598 खणभाग सांगली या ठिकाणी होते.
तेथे आम्ही नेहमी एकत्र यायचो. चर्चा करायचो.वेग वेगळ्या आंदोलना संदर्भात बोलणे व्हायचे.बैठका व्हायच्या. जी.डी बापूंच्या सोबत काम करणारा डाव्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून मला सगळे जण ओळखायचे आणि मी ही त्या वेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सांगली जिल्हा कौन्सिल वर पदाधिकारी होतो.त्याअगोदर एआय एस एफ या विद्यार्थी संघटनेचा जिल्हाध्यक्ष होतो.त्यामुळे या ॲाफीसवर अनेक बैठकांना हजर राहायचो. कॉम्रेड जी डी बापू लाड, कॉम्रेड मारुती मोतुगडे, कॉम्रेड आकाराम पवार,कॉ. पि.के कोळी,कॉ.नासर भैय्या, कॉम्रेड शाहीन, कॉम्रेड रॉड्रिक्स,कॉम्रेड दिलीप सव्वाशे, कॉम्रेड हंबीरराव धनवडे,कॉ.रा.तु.पाटील,कॉ.साहेबराव शिंदे,कॉ.रावसाहेब शिंदे अशा सगळ्यांच्या सोबत जेव्हा बैठक चालायची तेव्हा कम्युनिस्ट पक्षाची बैठक विषयानुसार चालवण्याची जबाबदारी कॉ. नासर भैय्या वर असायची.पक्षाचे जिल्हासचिव जरी कॉ.मारुती मोतुगडे असले तरी कार्यालयीन सचिव म्हणून नासर भैय्या काम करायचे. आम्हा कार्यकर्त्यांना जेव्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीचे पत्र यायचे तेव्हा ते कॉम्रेड नासर यांच्या सुंदर हस्ताक्षरात लिहलेले असायचे.शाहीनचे अक्षरही मोत्यासारखे वळणदार असायचे.
पत्रातील अक्षर बघूनच आम्ही तरूण कार्यकर्ते नासर शेख आणि शाहीन शेख यांच्या मोहात पाडायचो. अतिशय सुंदर आणि सुवाच्य हस्ताक्षरात लिहिलेल्या पत्रात मार्गदर्शन पर चार ओळी ठरलेल्या असायच्या. घरातल्या सर्वाना नमस्कार तर असायचाच पण घरातील आई,वडील,वडीलधारी मंडळी यांच्याकडेअधिक लक्ष द्या असा कार्यकर्त्यांना अनाहूत सल्ला पत्रातून दिलेला असायचा. आम्हाला त्यांच्या या सगळ्या कार्याचा खरंच हेवा वाटायचा. कमुनिस्ट पक्षाने दिलेला प्रत्येक आदेश शिरोधार्य मानून तळागाळात जाऊन काम करणारा नासर भैया हा खरा कम्युनिस्ट कार्यकर्ता वाटायचा. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्शिल ने घेतलेल्या निर्णयाचे पत्र जर सांगली जिल्हा कौन्सिल ला आले तर तेच पत्र झेरॉक्स काढून पाठीमागे आपला मजकूर लिहिणारा आणि ते प्रत्येक कार्यकर्त्यांना पाठवून देणारा नासर भैय्या सारखा कार्यकर्ता हा थेट राज्य स्तरावरील पक्षाचे निर्णय तळातल्या कार्यकर्त्यापर्यत पोचवणारा व पक्षाबद्दल आत्मीयता वाढवणारा खराखुरा कम्युनिस्ट होता. भैय्या पुढे आयटकचे सुद्धा काम करु लागला. आयटक म्हणजे ॲाल इंडिया ट्रेड युनियन कॉग्रेस.भारतातील सर्वात मोठी कामगार संघटना. आयटक मध्ये काम करताना भैय्याच्या कामाची पद्धत बघून संघटनेने मला दरमहा थोडेफार मानधन सुरू केले आहे असे नासर भैय्याने मला त्यावेळी कॉम्रेड सुकुमार दामले यांचे आलेले पत्र वाचून दाखवून सांगितले होते. त्यावेळी कॉम्रेड मारुती मोतुगडे हे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे काम करायचे.
मोतुगडेना कोणत्याही कामात नासर भैया सतत मदत करायचा. लेबर कोर्टात जाऊन संघटनेचा प्रतिनिधी म्हणून अनेक केसेस चालवायचा. सर्वसामान्य जनता, श्रमिक, कष्टकरी, कामगार यांच्याबद्दल नितांत आदर असणारा व साधेपणाने गुजराण करणारा एक आदर्श कॉम्रेड म्हणून आम्ही नासर भैय्याकडे पाहत होतो. नासर भैय्याने कधीही आपल्या गरजा अतिरीक्त वाढवू दिल्या नाहीत.उलट मला मार्क्स चा अतिरीक्त वरकड मुल्याचा सिद्धांत समजून सांगायचा. माधवनगर सांगली आणि सगळा परिसर सायकल वरून पालथा घालणारा,दररोज चळवळीतील लोकांच्या बरोबर राहून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष देणारा, बैठका चर्चा मेळावे संघटित करणारा,पक्ष चालविण्याचे योग्य नियोजन करणारा, लेबर कोर्टातील कामं करणारा,कोणत्याही आंदोलनात पुढे पुढे असणारा,बेंबीच्या देठापासून मोर्चात घोषणांची आरोळी देणारा एक खराखुरा सच्चा कम्युनिस्ट कार्यकर्ता नासर भैय्या सारखा कार्यकर्ताआज आम्हाला सांगली जिल्ह्यात कुठेही दिसत नाही.आम्ही एखाद्या मोर्चाला,आंदोलनाला सांगली ला जात असू तेव्हा सर्वात मोठ्या आवाजात जोरजोराने घोषणा देऊन सगळा परिसर दणाणून सोडणारा भैय्याचा आवाज ऐकला,क्रांतीकारी गाणी म्हणताना भैय्या पाहिला की आमच्या अंगावर शहारे यायचे. आणि अशा चळवळीतला आपला सहभाग अधिक वाढवायला पाहिजे अशी प्रबळ इच्छा प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हायची. नासर भैय्याची, शाहीनची मला पोष्टाने आलेली अनेक पत्रे मी आजही जपून ठेवलेली आहेत. कारण मला घडवण्यामध्ये जसा माझ्या शिक्षकांचा,माझ्या आई-वडिलांचा, माझ्या ताईचा,जीजीचा मोठा वाटा आहे अगदी तसाच कॉम्रेड नासर शेख,शाहीन शेख यांचाही वाटा आहे हे मी कधीच विसरु शकणार नाही. असा हा खराखुरा कम्युनिस्ट कॉम्रेड नासर शेख 18 डिसेंबर 2010 रोजी काळाच्या पडद्याआड झाला. 2010 ला सांगलीत विद्रोही साहित्य संमेलन झाले होते. या साहित्य संमेलनात नासर भैय्या ची झालेली भेट ही माझी शेवटची भेट ठरली. या साहित्य संमेलनामध्ये आम्ही भावे नाट्यमंदीरला एकत्र बसलो.खूप बोललो. याच विद्रोही साहित्य संमेलनात भैय्याने मला पक्षाची काही पुस्तके विकत दिली.
मी ही ती घेतली.भैय्याचा मला फोन आला की आवर्जून घरातल्यांची चौकशी करणार,मारुतराव,आपल्याला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काम वाढवावे लागेल त्यासाठी विद्यार्थी युवक आघाडी भक्कम करावी लागेल.तुम्ही विद्यार्थी युवक आघाडीचे डिपार्टमैंट प्रमुख आहात.जरा अधिक लक्ष द्या.असे नेहमी फोनवरून सांगणार. कायम डावा विचार डोक्यात घेऊन फिरणारा, जनसेवेचा वसा घेतलेला हा सच्चा कॉम्रेड जेव्हा आमच्यातून निघून गेला तेव्हा माझ्यासह सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला.
नासर भैया पक्षाचे काम करत करत इलेक्ट्रिकची कामे करायचा. ईलेक्ट्रीकची कामे करण्यात हातखंडा असलेला अतिशय चांगला कुशल मजूर म्हणून भैय्या नावाजलेला होता. मला आठवते19 95 साली भैय्या आमच्या घरी येऊन दोन दिवस पूर्णवेळ राहून आमच्या घरातील लाईट फिटिंग ची कामे पूर्ण करून गेला होता.भैय्याने केलेले लाईट फिटिंग अजूनही मजबूत आहे. ते आम्ही अद्याप बदललेले नाही. वाझर येथे अनेक वेळा विविध प्रश्नावरील बैठकांना सभांना कार्यक्रमांना 1990 ते 2000 पर्यंत सतत दहा वर्षे हजर राहिलेला आहे.लोकांना मार्गदर्शन केलेले आहे. शाहीन शेख आणि नासर शेख ही नावं आजही आमच्या वाझर सारख्या छोट्याशा गावात अनेकांच्या तोंडी आहेत.असे हे सांगली जिल्ह्यातील खरेखुरे कॉम्रेड असणारे कुटुंब आणि या कुटुंबातील सच्चा कम्युनिस्ट नासर शेख (भैय्या) यांना माझा अकराव्या स्मृतिदिनानिमीत्त क्रांतिकारी अभिवादनासह लाल सलाम. इतक्या वर्षानंतर कम्युनिस्ट कार्यकर्त्याची आठवण करताना एवढेच वाटते की कम्युनिस्ट नेतृत्वाने पक्षवाढीसाठी अधिक प्रमाणात लक्ष देणं आणि जन संघटनांच्या सर्व नेतृत्वाला पक्ष वाढीकडे लक्ष देण्यासाठी सूचित करणं आता काळाची गरज आहे. येणारा काळ हा अत्यंत भयानक असू शकतो.देशात कमालीची आर्थिक विषमता निर्माण झालेली आहे.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात म्हणजे 25 नोव्हेंबर 1949 रोजी दिलेला इशारा अन आज देशातील गोंधळाची स्थिती पाहता भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाने अधिक सजगपणे भुमिका घेणे व पक्षवाढीवर अधिक लक्ष देणे मला महत्वाचे वाटते. कॉम्रेड नासर शेख सारख्या सच्च्या कम्युनिस्ट कार्यकर्त्याच्या स्मृती दिना दिवशी पक्षाकडून एवढीच अपेक्षा ….







