बोराडीचे दोन व उमर्दाचे एक बोगस डॉक्टरांवर कारवाई सांगवी पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल…
दोघांना अटक, एक फरार…

बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील विजय धुडकु बडगुजर व भगवान कांतीलाल बडगुजर तसेच उमर्दा येथील मंगल हिरा या तीनही बोगस डॉक्टरांवर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधी नियमानुसार सांगली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील दोन बोगस डॉक्टरांना अटक करून रात्री सोडण्यात आले तर एक बोगस डॉक्टर कारवाईदरम्यान फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस डॉक्टर व बंगाली डॉक्टर यांचे वास्तव्य असल्याचे अनेकदा उघडकीस आले असल्यावर देखील त्यांच्यावर कार्यवाही होत नाही म्हणून अनेक स्थानिक ग्रामस्थांसह आदिवासी सरपंच संघटनांनी एल्गार पुकारून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले होते .त्या अनुषंगाने अतिरिक्त धुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली बोगस डॉक्टरांना पकडण्यासाठी भरारी पथक तयार करण्यात आले आहे.
यात काल तीन वाजेच्या सुमारास बोराडी येथील पानसेमल रस्त्यावरील भगवान कांतीलाल बडगुजर यांच्या क्लिनिकवर भरारी पथकाने धाड टाकली त्यावेळेस तेथून काही औषध गोळ्या व काही साहित्य पथकाने हस्तगत केले व येथील बोगस डॉक्टर भगवान बडगुजर हे फरार होण्यात यशस्वी झाले होते. तर दुसऱ्या गुन्ह्यात सांगवी रस्त्यावरील विजय धुडकु बडगुजर यांच्या क्लिनिक वर मोठ्याप्रमाणावर गोळ्या औषधीचा साठा हस्तगत करण्यात आला व त्याच ठिकाणी त्यांना अटक देखील करण्यात आली होती.
उमर्दा येथील मंगल हिरा या बंगाली डॉक्टरस भरारी पथकाने रंगेहात पकडून त्यांच्याकडेही वैद्यकीय व्यवसायातील साहित्य मिळून आले. या तिन्ही डॉक्टरांविरुद्ध सांगवी पोलिस स्टेशनात स्वतंत्रपणे तिघांवर गुन्हा रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .यात बोराडी येथील विजय धुडकु बडगुजर (सी.आर.नंबर ७ नुसार) व भगवान कांतीलाल बडगुजर (सी.आर.नंबर ८ नुसार) यांच्याविरुद्ध बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भरत पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच उमर्दा येथील मंगल हिरा (सी.आर.नंबर ९ नुसार) यांच्यावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र एस बागुल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील तिन्ही बोगस डॉक्टरांवर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३,३३-a,३४, ३६, सह फ्रूट अँड ड्रक्स कायदा कलम १८-a,१८-ai,१८-vi,१८-c सह महाराष्ट्र औषध व कायदा कलम १९४०, व १९४५,चे एस.सी.एच.के. व २२ सी.सी.ए.प्रमाणे तिन्ही बोगस डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोराडी येथील दोन्ही बोगस डॉक्टराच्या तपासणी अधिकारी म्हणून सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भिकाजी पाटील तर उमर्दा येथील एका बोगस डॉक्टराचा तपास सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार करीत आहे.
सजगारपाडा, कोडीद, बोराडी,उमर्दा आदी गावामध्ये बोगस डॉक्टर आपले क्लिनिक चालवत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार वरील गावातील बोगस डॉक्टर यांच्या क्लिनिक धाड टाकली असता बोराडी येथे दोन, उमर्दा येथे एक, सजगारपाडा येथील डॉक्टर क्लिनिक बंद करून पसार झाला होता. तर कोडीद येथील बोगस डॉक्टर असताना देखील त्यांनी त्याच्या चाणाक्ष बुद्धीने पथकाला कारवाई करता आली नाही.
बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी नियुक्त केलेल्या पथकात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम वानखेडे , जिल्हा आयुक्त अधिकारी डॉ. संजय मोरे ,शिरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र एस बागुल ,बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भरत पावरा ,खर्दे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील, आरोग्य सहाय्यक एस. आर. वानखेडे ,अविनाश बडगुजर, बोराडी येथील औषध निर्माण अधिकारी श्याम एस पावरा, आदींनी पथकांतील सदस्यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई केली.








