कलेक्टर साहेब मुडदे पडायची वाट बघताय का ?
दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधार
गेल्या काही दिवसात वाळू चोरांच्याकडून मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहेत. आटपाडी, तासगाव या ठिकाणी तर तहसिलदारासारख्या अधिका-यांच्यावरच हात उचलण्याचे प्रकार घडले होते. परवा काही वाळू तस्करांनी कडेगाव तालुक्यातील एका मासिकाचे व युट्युब चँनेलचे पत्रकार सुरज जगताप या पत्रकाराच्या घरी जावून मारहाण केली आहे. काही वाळूचोर त्याला उचलून नेवून मारण्याची धमकी देत आहेत. गेल्या काही वर्षात वाळू तस्कर बेफाम झाले आहेत. त्यांना कशाचाच आणि कुणाचाच धाक राहिला नाही. आमचे कोण काय वाकडे करतो ? या मानसिकतेत काहीजण आहेत. पत्रकार सुरज जगतापला मारहाण करणारे वाळू चोर त्याला म्हणत होते, माझ्यासोबत मंत्री आहे, तु माझी काय वाकडी करणार आहेस ? सुरज जगतापला मारहाण करणारे सदरचे वाळू चोर मंत्री विश्वजीत कदम यांचे कार्यकर्ते असल्याचे समजते. या तस्करांच्या मागे राजकीय ताकद आहेच पण अधिकारीही त्यांना सामिल आहेत. त्यामुळे हे बेफाम झाले आहेत. त्यामुळे त्यांना कुणाचाच धाक राहिलेला नाही. हे असेच चालू राहिले तर सांगली जिल्ह्यात वाळू चोरीला विरोध करणा-या अधिका-यांचे, त्याची बातमी देणा-या पत्रकारांचे मुडदे पडल्याशिवाय राहणार नाहीत. सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी या लोकांच्यावर कारवाई का करत नाहीत ? त्यांना चाप का लावत नाहीत ? पत्रकारांचे व अधिका-यांचे मुडदे पडण्याची ते वाट पाहतायत की काय ? असा प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय राहत नाही. पत्रकार सुरज जगतापला आलेल्या धमकीचे कॉल ऐकल्यावर या प्रवृत्ती त्या थराला जावू शकतात याची जाणिव होते.
या प्रकरणीत वाळू तस्करांना कडेगावचे तहसिलदार सामिल असल्याचा संशय आहे. पत्रकार सुरज जगताप याने कडेगावच्या तहसिलदार व प्रांताना वाळूचोरी संदर्भात मेसेज केला होता. त्यांना मेसेज केल्यानंतर अवघ्या पंधरा-वीस मिनिटात वाळू चोर गाडी घेवून सुरज जगतापच्या घरी आले. घरी येवून त्याला मारहाण केली. त्याच्या मुस्काडीत मारले. त्यानंतर त्याला पळवून मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. “तु आमच्या नादाला लागू नको नाहीतर तुझे खरे नाही. तुला उचलून नेवून मारणार !” असल्याची दमबाजी करत आहेत. विशेष म्हणजे या बाबत पोलिस गुन्हा नोंदवून घ्यायला तयार नाहीत. विट्याच्या डिवाएसपी साहिबा, “आधी मेडीकल प्रमाणपत्र आणा मग गुन्हा नोंद करून घेतो !” असे सांगतायत. ही सगळी परस्थिती पाहिल्यावर हा महाराष्ट्र आहे की बिहार ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. पत्रकार सुरज जगताप याचे संपुर्ण कुटूंब दहशतीखाली जगत आहे. वाळू चोरांच्या दहशतीखाली वावरत आहेत. जर तहसिलदार, प्रांत यांच्या भूमिका वाळू चोरांना पुरक असतील, तेच वाळू तस्करांना टिप देत असतील तर अवघड आहे. वेळीच जाग आली नाही तर भविष्यात ही झुंड लोकांचे मुडदे पाडेल. विरोध करणारांचे, तक्रार करणारांचे व बातमी देणा-या पत्रकारांचे खून करेल.
प्रशासन पत्रकारांचे खून पडल्यावर जागे होणार आहे काय ? सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यात लक्ष घालणार आहेत का ? तस्करीच्या पैशावर मातलेल्या, कुणालाही धमकी देणा-या व मारहाण करणा-या तस्करांना चाप लावणार आहेत का ? एखाद दुस-या पत्रकारांचा मुडदा पडल्यावरच ते सतर्क होणार आहेत का ? या पुर्वीचे जिल्हाधिकारी काळम पाटील यांनी कडेगाव तालुक्यातल्या वाळू तस्करांना चांगलाच चाप लावला होता. त्यांच्यावर कडक कारवाई केली होती.
चौधरी साहेब या प्रकरणाबाबत काय भूमिका घेणार आहेत ? घर का भेदी लंका डाहे । या उक्तीप्रमाणे तहसिलदारांसारखे अधिकारीच जर वाळूचोरांच्या पंटरचे काम करत असतील तर अवघड आहे. तहसिलदारांना वाळूचोरीचा मेसेज जातो काय, त्यानंतर अवघ्या पंधरा-वीस मिनिटात वाऴू चोर घरी येवून मारहाण करतात काय ? या प्रकराचा अर्थ काय समजायचा ? पत्रकार सुरज जगताप यांच्या तक्रारीची टिप कडेगावच्या तहसिलदारांनी किंवा प्रांतानीच दिल्याचा पत्रकारांना संशय आहे. पत्रकार सुरज जगताप यांना मारहाण करणा-या वाळू चोरांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई व्हायला हवी.
त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवेतच पण या प्रकरणाची तस्करांना टिप देणा-या पंटर अधिका-यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. कडेगाव तालुक्यात प्रशासनात बराच सावळागोंधळ आहे. काही अधिकारी कराडपर्यंत स्वत:च्या गाडीने जातात. तिथून ते वाळू तस्करांच्या अलिशान गाडीतून पुण्या-मुंबईचा प्रवास करत असल्याची चर्चा आहे. अधिका-यांना वाळूची मलई जोरात खायला मिळते आहे त्यामुळेच ते पंटरचे काम करू लागले आहेत. या वाळू चोरांना व त्यांनी पाठीशी घालणा-या महसुलातल्या अधिका-यांना पाठीशी घालणा-या लोकांच्यावर जिल्हाधिकारी कारवाई करणार का ?






