३० जून – जागतिक लघुग्रह दिवस
त-हाडी
आज ३० जून ! जागतिक लघुग्रह दिवस (World Asteroid Day) !
अस्टेरॉइड म्हणजे लघु ग्रह. त्यांना प्लॅनेटॉइड असे ही म्हटले जाते. सूर्यमाला तयार होताना ज्यांच्यापासून मोठे ग्रह तयार होऊ शकले नाहीत, असे उर्वरित राहिलेले असंख्य छोटे मोठे दगडधोंडे (पाषाण), अशनी, एका ठराविक कक्षेतून सूर्याच्या भोवती फेरी मारत असतात. यातील काहींच्या कक्षा या पृथ्वीकक्षेला छेदून जातात. केवळ एकमेकांना छेदणाऱ्या कक्षा असल्याने त्यांची टक्कर होत नाही; तर त्यासाठी पृथ्वी कक्षेला छेदनाऱ्या छेदबिंदूपाशी एकाच वेळी पृथ्वी व अशनी, लघुग्रह, वा धूमकेतू यावा लागतो.
पृथ्वीला टक्कर देऊ शकतील असे सुमारे दहा लक्ष लघु ग्रह अवकाशात फिरत आहेत. यापैकी खूपच कमी म्हणजे अगदी काही टक्केच लघुग्रह शास्त्रज्ञांनी आजपर्यंत शोधले आहेत. प्रत्येक लघुग्रह हा आकाराने वेगवेगळा असतो. ज्ञात असलेला सर्वात मोठा लघु ग्रह ‘सेरेस’ हा आहे जो ९४० किमी (५८३ मैल) इतका मोठा आहे. सर्वात लहान लघुग्रह ‘२०१५ टी सी २५’ हा असून तो फक्त ६ फूट लांब आहे जो पृथ्वी जवळून ऑक्टोबर २०१५ ला गेला होता.
बरेच लघु ग्रह अनियमित आकाराचे असून काही मोठे फक्त थोडे गोलाकार असतात. तर काही लघु ग्रहांवर मोठे खड्डे अथवा विवरे असतात, जसे की वेस्टा या लघु ग्रहावर २८५ मैल एवढे मोठे व्यासाचे क्रेटर आहे.१५० हून अधिक लघु ग्रहांना एक किवा दोन चंद्र देखील आहे. बायनरी म्हणजे जोडी ने एकमेकां भोवती फिरणारे लघु ग्रह देखील अस्तित्वात आहेत.
सामान्यपणे लघु ग्रहावरील सर्वसाधारण तापमान हे -१०० डिग्री फेरेनहाईटस एवढे म्हणजे -७३ अंश सेल्सिअस एवढे असते. त्यांच्या पृष्ठभागावर धुळीचे आच्छादन असते. कोट्यवधी वर्षांपासून त्यांची स्थिती आहे तशीच असल्याने त्यांच्या अभ्यासातून सौर मालेच्या उत्पत्ती विषयी खुप महत्वपूर्ण माहिती मिळेल अशी अभ्यासकांना आशा आहे.
लघु ग्रह अथवा अशनी हे सौर मालेत तीन ठिकाणी आढळतात. प्रामुख्याने मंगळ आणि गुरू ग्रह यामधील भागात सर्वात जास्त संख्येने लघु ग्रह आहेत. यालाच लघु ग्रह पट्टा अथवा अस्टेरॉइड बेल्ट असे संबोधले जाते. येथे १०० किमी व्यास असलेले २०० पेक्षा जास्त लघु ग्रह आहेत. तसेच १.१ मिलियन हे ५ किमी पेक्षा जास्त व्यास असलेले व १.९ मिलियन लघु ग्रह १ किमी पेक्षा जास्त व्यास असलेले आहेत. त्याशिवाय लाखों च्या संख्येने छोटे छोटे अशनी आहेत.
“जागतिक लघुग्रह दीन” साजरा करण्या मागचा उद्देश हा आहे की पृथ्वीतलावरील बहुसंख्य जनता पृथ्वीवर काय घडतय यातच गुरफटलेली असते. अवकाशातील लघुग्रह वा अशनी या घटका पासुन पृथ्वीला किती मोठा धोका संभवतो याविषयी ते अनभिज्ञ असतात. त्यामुळेच या विषया संबंधी पृथ्वी वासियांना जागृत करण्यासाठी, लघुग्रहां चे सोलर सिस्टीम मधील काय स्थान आहे ते ओळखण्यासाठी व त्यापासून होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी काय करता येईल याचे मार्गदर्शन करण्यासाठी जागतिक लघुग्रह दीन साजरा करण्यात येतो.
यामागे पृथ्वीला व पृथ्वीवरील सजीवांना धोकादायक ठरणाऱ्या अंतराळातील दगडधोंडे, खडक, अशनी, लघुग्रह, धूमकेतू यांबाबत सावध करण्याचा केवळ हेतू आहे. ३० जुन १९०८ सालात पृथ्वी वरील सायबेरिया प्रांतात तुंगुश्का खोऱ्यात अशनी आदळल्यामुळे सुमारे २००० एकरचा परिसर अक्षरशः भस्मसात झाला. तुंगुश्का खोऱ्याचा हा परिसर दुर्गम आणि दलदलीचा असल्याने, तेव्हा मोठ्या प्रमाणावर होऊ शकलेली जीवितहानी टळली. ही टक्कर जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकलेल्या अणुबॉम्ब पेक्षा एक हजार पटीने अधिक शक्तिशाली होती. तुंगुष्का अशनी ही पृथ्वीच्या नजीकच्या काळात अवकाशातून आलेली सर्वात मोठी नैसर्गिक वस्तू होय. या तूंगुष्का घटनेच्या स्मरणार्थ ३० जून हा दिवस “जागतिक लघुग्रह (अशनी) दिन” म्हणून पाळण्याचे ठरले.
सुमारे चारशे पन्नास कोटी वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीचा जन्म झाला. तर साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मेक्सिकोच्या युकातन भागात कोसळलेल्या महाकाय अशनीमुळे निर्माण झालेला प्रलयंकारी महास्फोट हा त्यावेळी पृथ्वीवरील डायनॉसोरच्या नाशास कारणीभूत ठरल्याचे अभ्यासकांचे मत आहे. ही वेळ मानवावर ही येऊ नये यासाठी आपल्याला आताच अनेक उपाय योजना करून ठेवाव्या लागतील हे नक्की. या बाबत प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ निल डिग्रिज टायसन यांचे विचार इथे मांडणे आवश्यक ठरते. ते म्हणतात: लघुग्रह अथवा अशनी पृथ्वी कडे येत असताना त्यांचा मार्ग बदलण्याची आपली (मानवाची) क्षमता असतानाही जर आपण त्याची तयारी केली नाही आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या टकरी मुळे डायनोसोरस सारखा आपलाही विनाश झाला तर या अनंत विश्वातील एलियन साठी ती मोठी हास्यास्पद बाब ठरेल आणि मी त्याचा एक भाग बनू इच्छित नाही. हे विधान मजेशीर असले तरीही त्यामागचा गर्भितार्थ फार मोठा आहे.
यावर्षी प्रथमच कोरोना महामारी मुळे हा दिवस डिजिटल स्वरूपात साजरा केला जाणार आहे. याचे थेट प्रसारण लकझेंबर्ग शहरातून केले जाणार आहे. यादरम्यान या क्षेत्रातील विविध तज्ज्ञ सौर मालेच्या निर्मितीमध्ये लघु ग्रहांचे योगदान तसेच लघु ग्रह शोधण्या साठी, त्यांना ट्रॅक करण्यासाठी तसेच आलेल्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी वापरण्यात येणारे नवनवीन तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करतील.
भारतात ही यादिवशी विविध कार्यक्रम साजरे केले जातात. नाशिक येथील स्पेस सायन्स विषयी मोलाचे कार्य करत असलेली संस्था कल्पना युथ फाऊंडेशन तर्फे या दिवशी मनोरंजक अशा मोफत क्विझ चे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती. सहभागी होण्यासाठी लिंक खालील प्रमाणे: