सिद्धार्थ शिक्षण संस्था ऑक्सिजन पार्क उपक्रम राबविणार: डॉ.कैलास सनमडीकर
माणगंगा न्यूज जत:-
जत तालुक्यातील सनमडी येथील सिद्धार्थ शिक्षण संस्था व उमाजीराव मेडिकल फौंडेशनमधील प्रत्येक संचालक,शिक्षकांपासून कर्मचारी यांच्या वाढदिनी झाडे लावून संस्थेच्या परिसरात ऑक्सिजन पार्क राबविणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना भेटून सत्कार करता येत नसल्याने शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी संस्थेच्या चार शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.अशाच धर्तीवर हार-तुरे, केक यांना फाटा देऊन संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर यांनी सोडला आहे.
एक झाड, गुलाब पुष्प व पेढा देऊन संस्थेमार्फत सत्कार करण्यात येणार आहे. दिलेले झाड हे त्या कर्मचाऱ्यांने संस्थेच्या शाळांच्या आवारात लावून त्यानेच त्या झाडाची जपणूक करावयाची आहे. असे संस्थेत २००ते २५० कर्मचारी आहेत. प्रत्येकाच्या वाढदिवसाला एक झाड लावले तर पाच-सहा वर्षात दीड-दोन हजार झाडे लावली जाणार आहेत. त्यामुळे निसर्ग संवर्धनाचे काम होणार आहे. हा अनोखा उपक्रम असल्याने पर्यावरणास फायदा होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजन पार्क होणार आहे.
माजी आमदार सनमडीकर यांच्या वाढदिवसानंतर तिसऱ्या दिवशीच एका शिक्षकाचा वाढदिवस झाड देऊन साजरा करण्यात आला. अशाच प्रकारे संस्थेतील सर्वच लोकांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑक्सिजन पार्कही राबविला जाणार असल्याचे डॉ. कैलास सनमडीकर यांनी सांगितले.