कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये अण्णाभाऊ साठे जयंती व्याख्यान कार्यक्रम संपन्न…
वैश्विक मूल्यांची मांडणी करणारे लेखक:- अण्णाभाऊ साठे
— डॉ. रामदास नाईकनवरे
आटपाडी:- प्रतिभावंत व परिवर्तनवादी लेखक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे वैश्विक मानवतावादी मूल्यांचे चित्रण करणारे लेखक होते. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, लावणी, शाहिरी, वगनाट्य, प्रवास वर्णन, यामधून अण्णाभाऊ साठे यांनी उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित, असणाऱ्या माणसांना जिवंतपणाचा चेहरा दिला. गावकुसाबाहेरील समाजाचे व भटकंती करणाऱ्या भटक्या विमुक्त समाज जीवनाचे वास्तववादी चित्रण आपल्या साहित्यामधून त्यांनी केले. या साहित्यामधून त्यांनी एकही व्यक्तिरेखा परिस्थितीला अथवा समाज व्यवस्थेला शरण न जाणारी उभा केली. वास्तव परिस्थितीशी संघर्ष करून जीवनावर विजय मिळवणारी संघर्षमय व्यक्तिचित्रणे त्यांनी आपल्या साहित्यातून जिवंत केली. अण्णाभाऊ साठे हे परिवर्तनवादी विचारसरणीचे लेखक होते. पारंपरिक साहित्यिक मूल्यांना नकार देऊन त्यांनी अनेक बदल साहित्याच्या आकृतीबंधा मध्ये घडवून आणून साहित्य विश्वाला एक नवा धडा दिला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे.
शहरीच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनाद्वारे लोकांचे सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न आपल्या साहित्यातून केला. त्यामुळे त्यांच्या अनेक कलाकृती या श्रेष्ठ दर्जाच्या ठरलेल्या असतानाही साहित्य विश्वामध्ये व शासन स्तरावर त्यांना दुर्लक्षित केले जाते. प्रादेशिक भागाच्या, राज्याच्या, व देशाच्या सीमा ओलांडून जागतिक पातळीवर श्रेष्ठ दर्जाच्या कलाकृती देणाऱ्या परिवर्तनवादी लेखकांच्या मध्ये अण्णाभाऊ साठे हे एक महत्त्वाचे लेखक आहेत. पारंपरिक मूल्यवस्थेवर आधारित असणाऱ्या प्रस्थापित मराठी साहित्याच्या समोर नव्या वांड्मय सौंदर्यशास्त्राचं आवाहन अण्णाभाऊ साठे यांनी उभा केलं. प्रस्थापित साहित्य विश्व त्यांनी बदलण्याचा प्रयत्न आपल्या लेखणीतून केला. मार्क्सवास व समाजवाद यांचा समन्वय साधन त्यांनी आपले साहित्य लेखन केले. आणि जीवनाच्या उत्तरार्धामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी आंबेडकरी विचारांशी निष्ठा ठेवून साहित्य निर्मिती केली.
*जग बदल घालूनी घाव.... सांगून गेले मला भीमराव* हा अखेरचा संदेश त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला दिला. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि प्रखर वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांच्या आधारे आपले साहित्य निर्मिती करणारे ते परिवर्तनवादी चळवळीतील श्रेष्ठ दर्जाचे लेखक होते. त्यांची अनेक वगनाट्य, लावण्या, कथा, कादंबऱ्या या आजही जगाच्या पाठीवर आजारांवर झालेल्या आहेत. अशा प्रकारचे विचार कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, डॉ. रामदास नाईक नवरे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून मांडले. शेवटी, *माझी मैना गावावर राहिली... माझ्या जीवाची होतीया कायली...* ही अण्णाभाऊची प्रसिद्ध लावणी विद्यार्थ्यांच्या समोर त्यांनी सादर केली.
या व्याख्यान कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. संतोष सावंत यांनी अण्णा भाऊंच्या अनेक साहित्यकृती कलाकृतीवर प्रकाश टाकला. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी पारंपारिक विषमतावादी साहित्यिक मूल्यांना नकार देऊन आधुनिक विचारांचा जागर त्यांनी आपल्या साहित्यातून केला. असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणातून केले.
या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मराठी विभागाचे विभाग प्रमुख, प्रा. बालाजी वाघमोडे आणि श्रीराम ज्युनिअर कॉलेजचे प्रा. आप्पा हात्तेकर हे होते. याप्रसंगी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. सारिका घाडगे यांनी केले. प्रास्ताविक इंग्रजी विभागाचे प्रा. शिवदास टिंगरे तर आभार प्रा. अनिता निकम यांनी मानले.
या कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊंच्या व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. संतोष सावंत यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी प्रा. धनाजी गायकवाड, प्रा. सुजित सपाटे, प्रा. माधुरी मोरे, श्री. विश्वेश्वर खंदारे, श्री. मारुती हेगडे ,श्री. गोविंद चव्हाण, इत्यादी उपस्थित होते.