अंतर्नाद…
मनोहर जोशींना पद्म पुरस्कार
उद्धव ठाकरेंना सणसणीत चपराक
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
मुंबई: काल रात्री केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांची यादी बघत असताना त्यात मनोहर जोशींचे नाव दिसले. आणि हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार असल्याचे देखील वाचले. थोडी चौकशी केली असता हे मनोहर जोशी म्हणजे आपले दिवंगत शिवसेना नेते, माजी मुख्यमंत्री, माजी विरोधी पक्षनेते, माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर गजानन जोशी हेच असल्याचे निश्चित झाले.
खरे तर जोशी सरांना हा पुरस्कार खूप आधीच मिळायला हवा होता. मात्र त्यांच्या शेवटच्या दिवसात शिवसेना पक्षातच त्यांना अपमानित केले गेले आणि त्यामुळे ते व्यथीत होऊन राजकीय जीवनापासून काहीसे निवृत्त झाले होते. त्यांना म्हणून तर मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देऊन केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव तर केला आहेच, पण त्यांचा अपमान करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे यांना पंतप्रधान मोदींनी सणसणीत कानाखालीही वाजवली आहे.
मनोहर गजानन जोशी हे शिवसेनेचे एका काळातले पहिल्या फळीतले नेते होते. कोकणात जन्मलेले आणि तिथेच अत्यंत गरिबीत बालपण गेलेले मनोहर जोशी पुढे शिक्षणासाठी आपल्या बहिणीकडे मुंबईत आले. कोकणात शिक्षण घेताना त्यांनी माधुकरी मागून दिवस काढले होते. मुंबईत शिक्षण घेता घेताच मुंबई महापालिकेत नोकरी देखील केली. नंतर स्वतःचे कोचिंग क्लास काढलेत.
त्या काळात मुंबईत मराठी माणसाला नोकऱ्यांमध्ये वाव नव्हता. त्यावेळी मराठी माणसाला जर व्यावसायिक प्रशिक्षण दिले तर तो नोकरीत जाऊ शकेल असे बघून मनोहर जोशींनी त्यांच्या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये छोटे छोटे औद्योगिक अभ्यासक्रम सुरू केले. त्यातून अनेक मराठी तरुणांना रोजगारक्षम बनवले. याच काळात त्यांचा शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंध आला. याच संपर्कातून ते शिवसेनेत आले आणि बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू शिवसैनिक बनले.
ते मुंबईचे महापौर बनले. नंतर आधी विधान परिषदेत आणि नंतर विधानसभेत सदस्य म्हणून गेले. काही काळ ते विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देखील होते. १९९५ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार आले, तेव्हा पहिल्यांदाच ते महाराष्ट्रातील गैर काँग्रेसी मुख्यमंत्री बनले. त्यांना मुख्यमंत्री म्हणून जवळजवळ साडेतीन वर्ष काम करण्याची संधी मिळाली.
या काळात त्यांनी अनेक नवे प्रकल्प राबवले. महाराष्ट्रात एक रुपयात झुणका भाकर देण्याचा प्रयोग त्यांनी सर्वप्रथम यशस्वी केला. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची उभारणी त्यांच्याच काळात झाली. कृष्णा खोरे सिंचन विकास मंडळ स्थापन करून कृष्णा खोऱ्याचे पाणी अडवण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला. त्याच धर्तीवर मराठवाडा सिंचन विकास मंडळ आणि विदर्भ सिंचन विकास मंडळ हे देखील त्यांनी स्थापन केले आणि तिथलेही दीर्घकाळ प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावले होते. एक प्रयोगशील मुख्यमंत्री म्हणून ते चांगलेच गाजले होते.
१९९९ मध्ये ते दादर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. लगेचच केंद्रातील अटल बिहारी वाजपेयी सरकार मध्ये ते अवजड उद्योग मंत्री बनले. तिथेही आपल्या प्रयोगाशील व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर त्यांनी केंद्रात आपले स्थान निर्माण केले. परिणामी २००२ मध्ये तत्कालीन लोकसभा सभापती बालयोगी यांचे अपघातात निधन झाले असता रिक्त जागेवर ते लोकसभेचे सभापती म्हणून निवडून गेले होते. २००४ मध्ये ते पराभूत झाले. नंतर २००६ मध्ये ते राज्यसभेत सदस्य म्हणून सहा वर्ष कार्यरत राहिले होते.
माझा जोशी सरांचा परिचय तसा १९७७-७८ मध्ये झाला होता. त्यावेळी दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून मी कार्यरत होतो. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात गेलो की सरांची हमखास भेट व्हायची. मात्र त्यांचा खरा परिचय झाला तो ते राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावरच. त्यावेळी मी विधिमंडळ अधिवेशन कव्हर करण्यासाठी जात असे. त्या काळात त्यांचा माझा संबंध आला आणि पुढे त्याचे घनिष्ठ संबंधात रूपांतर झाले.
२००२ पासून मी रामटेकच्या गडावरून हे नियतकालिक सुरू केले होते. २००२च्या दिवाळी अंकासाठी आम्ही मनोहर जोशींची मुलाखत घेतली होती. माझे मुंबईचे पत्रकार मित्र नारायण हरळीकर यांनी ती मुलाखत घेतली आणि आम्ही ती सविस्तर मुलाखत नांदवी ते नवी दिल्ली या शीर्षकाखाली प्रकाशित केली होती. ती मुलाखत बरीच गाजली. त्यानंतर नागपूरला आले असता मी जोशी सरांना भेटून तो अंकही दिला होता. जोशी सर चांगलेच सुखावले होते.
दरवर्षी मी प्रकाशित करीत असलेल्या दिवाळी अंकासाठी मी विदर्भाबाहेरच्या एका मान्यवर व्यक्तीला अतिथी संपादक म्हणून निमंत्रित करीत असे. २००६ च्या दिवाळी अंकासाठी मनोहर जोशींनी अतिथी संपादक व्हावे म्हणून मी मुंबईत भेटून त्यांना विनंती केली. त्यांनी तात्काळ होकार दिला आणि संपूर्ण अंकासाठी योग्य ते सहकार्यही केले. त्या दिवाळी अंकाला अलिबागच्या रामशेठ ठाकूर प्रतिष्ठानचा पुरस्कारही मिळाला होता. हे कळल्यावर सरांना खूप आनंद झाला होता. या दिवाळी अंकाचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच माझ्या मातोश्रींचे निधन झाले होते. हे कळताच सरांचा लगेच फोन आला आणि दिवाळी अंकाची काळजी करू नका असा दिलासाही त्यांनी दिला होता. एकूणच एक दिलदार व्यक्तिमत्व असा मला त्यांचा अनुभव आला होता.
मनोहर जोशी राज्यसभा सदस्य असताना देखील दिल्लीत गेल्यावर मी आवर्जून त्यांना भेटत असे. त्यांच्याशी विविध विषयांवर गप्पा मारणे ही आनंद देणारी बाब ठरत होती.
राज्यसभेची मुदत संपल्यावर सर शिवसेनेच्या कामातच सक्रिय झाले होते. याच दरम्यान बाळासाहेबांचे निधन झाले. नंतर उद्धव ठाकरेंचे राज्य सुरू झाले. या काळात मनोहर जोशी शिवसेनेच्या पहिल्या फळीतून काहीसे दूर फेकले गेले. त्यातच शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील एका मेळाव्यात त्यांना अपमानित करून व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आले. तेव्हापासून ते चांगलेच दुखावले होते. तिथूनच हळूहळू त्यांनी सक्रिय राजकारणातून काहीशी निवृत्त घेतली होती.
२०१९ मध्ये नागपूरला सन्मित्र सभेतर्फे त्यांचे अवघे पाऊणशे वयमान या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. हे व्याख्यान आयोजित करण्यात माझा प्रमुख सहभाग होता. त्या दिवशी सकाळी सर विमानातून उतरल्यापासून दिवसभर मी त्यांच्यासोबतच होतो. त्यांच्या दुपारच्या विश्रांतीनंतर संध्याकाळी त्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी मी हॉटेलवर गेलो. सोबत माझी पत्नी. सौ अनुरूपा आणि नागपूरच्या प्रसिद्ध संगीतकार डॉक्टर तनुजा नाफडे यादेखील होत्या. आमच्याशी सरांनी छान गप्पा मारल्या आणि सोबत फोटो फोटोही काढले. तिथून कार्यक्रम स्थळी जायला निघाल्यावर सर कारमध्ये निघाले होते. मला म्हणाले अविनाशजी तुम्ही चालता ना. तेव्हा मी उत्तर दिले सर मी स्कूटरने येतो. तर सर लगेच म्हणाले मग मीही तुमच्या स्कूटर वर चलू का? आज लोकसभेचा अध्यक्ष राहिलेला माणूस इतका साधा असू शकतो हे बघून मी त्यावेळी चांगलाच सुखावलो होतो. ही त्यांची माझी शेवटली भेट ठरली .त्यानंतर वर्षभरातच कोरोना आला. दोन वर्ष त्यातच गेली. दरम्यानच्या काळात सरांशी कधीमधी फोनवर बोलणे व्हायचे. मधल्या काळात त्यांना विस्मरणाचा त्रास सुरू झाला असे कानावर आले होते. तरीही त्यांच्या वाढदिवसाला मी फोन करायचो आणि त्यांच्याशी बोलायचो. मात्र प्रत्यक्ष भेटीचा योग नव्हता. आणि गेल्या वर्षी २३ फेब्रुवारी २०२४ला सकाळी सर गेल्याचीच बातमी आली.
मनोहर जोशी हे एक आगळे वेगळे जिंदादिली व्यक्तिमत्व होते. त्यांची कदर स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केली. त्याचप्रमाणे जोशी सरांनीही शिवसेना वाढवण्यासाठी तनमन-धनाने प्रयत्न केले होते. मात्र बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांनी त्यांची कदर केली नाही. त्यांचा उपयोग तर करून घेतला नाहीच, पण त्यांना अपमानित करून बाजूला लोटले. वस्तूतः शिवसेनेनेच त्यांना सन्मानित करून त्यांना पद्म पुरस्कार द्यावा यासाठी पंतप्रधानांकडे शिफारस करायला हवी होती मात्र शिवसेनेने ते कधीच केले नाही.
तरीही पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी त्यांची कदर करून मनोहर जोशी सरांना मरणोत्तर का होईना पण पद्म पुरस्कार दिला आहे. त्याबद्दल केंद्र सरकारही अभिनंदनास पात्र आहे. माझ्या मते ही सध्या शिल्लक असलेल्या शिवसेनेला आणि त्यांच्या नेतृत्वाला केंद्र सरकारने दिलेली सणसणीत चपराक आहे.तुम्ही एका हिऱ्याला दूर लोटले आणि त्याचा अपमान केला. मात्र आम्ही त्याची कदर केली आहे हे केंद्र सरकारने दाखवून दिले आहे.