बामखेडा महाविद्यालयाच्या एन. एस. एस. शिबिरात एक मूठ धान्य संकलन योजनेची कार्यवाही
बामखेडा येथील ग्राम विकास संस्थेच्या कला महाविद्यालयाच्या वतीने मौजे तऱ्हाडी त.त., तालुका शिरपूर येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न होत आहे. त्यात अनेक उल्लेखनीय कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे. या विविध कार्यक्रमांतर्गत ‘एक मूठ धान्य संकलन’ योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.शिबिरातील विद्यार्थी – विद्यार्थीनींनी गावातील घरोघरी जाऊन गहू, तांदूळ, बाजरी या स्वरूपातील धान्य संकलित केले. सदर धान्य वनवासी कल्याण आश्रमाला दिले जाणार आहे.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी वनवासी आर्थिक दुर्बल पालकांच्या मुलींच्या शिक्षणासाठी निवासी वनवासी कल्याणाश्रम धुळे येथे 1985 पासून कार्यरत आहे. वनवासी संस्कृतीचे पालन करून त्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणारी उल्लेखनीय संस्था आहे. हे कल्याणाश्रम शासनाचे कोणतेही अनुदान न घेता समाजातील दात्रुत्व भावनेने प्राप्त होणाऱ्या धान्य,गणवेश,रोख रक्कम,इत्यादी स्वरूपातील दानाच्या माध्यमातून चालविले जाते.राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तऱ्हाडी या गावातील ग्रामस्थांकडून धान्य गोळा करून ते गावाच्या नावे वनवासी आश्रमाला दान करावे या उदात्त भावनेने सदर उपक्रमाची योजना केलेली आहे. याव्यतिरिक्त सदर शिबिरामध्ये विद्यार्थी घरोघर जाऊन कोविड लसीकरण संदर्भातील सर्वेक्षण करून सदर अहवाल आरोग्य सेविका श्रीमती बडगुजर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
त्यामुळे गावातील शंभर टक्के लसीकरणास मदत होणार आहे. महाविद्यालयाच्या एनएसएस मार्फत राबविल्या जाणाऱ्या या उल्लेखनीय उपक्रमांमध्ये गावातील नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाने केलेल्या उपक्रमा बद्दल सर्वांचे ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष श्री पी.बी. पटेल, उपाध्यक्ष डॉ.के.एच. चौधरी, सचिव श्री.बी.व्ही. चौधरी, गावातील सरपंच सौ.जयश्रीताई सुनिल धनगर व पोलीस पाटील श्री प्रताप झिंगा गिरासे यांनी विशेष कौतुक केले आहे







