झरेत होणार HSC च्या पहिल्या बॅचच्या विध्यार्थांचा मेळावा…
ग्रामीण भागाच्या उत्कर्षासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून बॅरिस्टर टी. के .शेंडगे साहेब यांनी 1960 ला झरे सारख्या दुर्गम आणि दुष्काळी भागात जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या रुपाने शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली .
अथक आणि अविश्रांत प्रयत्नातून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आणि विद्यालयाचे माजी प्राचार्य माननीय चोपडे सर यांनी विद्यालय नावारुपाला आणले. शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ करण्याबरोबरच समाजातील अज्ञान आणि अनास्था दूर करण्यासाठी अहिल्या पॅटर्न ची निर्मिती केली आणि त्यामध्ये उत्कृष्ट यश संपादन केले. परिसरातील उच्च शिक्षणाची गरज ओळखून 1991 साली 11वी कला वर्गाच्या रूपाने उच्चशिक्षणाची सुरुवात केली. परिसरातील शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या पहिल्या बॅचला प्रवेश घेतला व ज्युनियर कॉलेज ची पहिल्या बॅच ची सुरुवात झाली.
सन मार्च-93 सालची बारावीची ही पहिलीच बॅच होती. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनी आप -आपल्या मार्गाने नोकरी-व्यवसायासाठी किंवा उपजीविका भागवण्यासाठी गेले.
आज पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेले हे सर्वजण आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करतात ,तर काही जणांचे अपार कष्टांचे दिवस अजूनही संपलेले नाहीत. या माजी विद्यार्थ्यांना एकत्रित हितगुज करता यावी सुख – दुःखाचे प्रसंग शेयर करता यावेत यासाठी मेळाव्याचे आयोजन जवाहरलाल नेहरू विद्यालय झरे येथे करण्यात येणार आहे.
शिक्षण संपल्यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या मार्गाने जातात त्यानंतर अनेकांना संकटांना तोंड द्यावे लागते. अनेक जण संकटातून बाहेर येतात तर काहीजण संकटात अडकतात अशा सर्व विद्यार्थ्यांना मन मोकळे करण्यासाठी आपले जुने मित्र सवंगडी भेटू शकत नाहीत त्यामुळे या मेळाव्याचे आयोजन केले आहे.
आपापल्या संसारांमध्ये गुरुपटलेले आहेत आणि पन्नाशीतल्या विद्यार्थ्यांचा मेळावा होण्याचीही तालुक्यातील पहिलीच वेळ असेल…
या मेळाव्याच्या आयोजनाबद्दल जवाहरलाल नेहरू विद्यालया चे प्राचार्य अशोक पडळकर सर यांनी कौतुक केले आहे.
येणाऱ्या काही दिवसातच या मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. तरी सर्व माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे ,असे आव्हान विद्यमान प्राचार्य ए .एस. पडळकर सर व पर्यवेक्षक एस एस कनप सर यांनी केले आहे.







