७६ वर्षांच्या मातेने तोडली परंपरा ! कपाळाला लावले कुंकू,पायात घातली जोडवी !
माणगंगा न्यूज
नाशिक
अनिष्ट रुढींना मूठमाती देण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाने प्रेरीत होऊन कुप्रथांना पायदळी तुडवीत नाशिक येथील ७६ वर्षीय सुगंधाबाई त्र्यंबकराव चांदगुडे यांनी पतीच्या निधनानंतर तब्बल तेरा वर्षांनी कपाळावर लाल टिकली लावली,पायात जोडवे घातले व परंपरेच्या जोखडातून मुक्त झाल्या.याकामी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत जात पंचायत विरोधी चळवळ उभा करणारे त्यांचेे पुुुुत्र कृष्णा चांदगुडे यांनी यासाठी विधायक दृष्टिकोन ठेवून प्रबोधित केले.
चांदगुडे कुटुंब मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील रहिवासी आहेत.सध्या ते नाशिकच्या इंदिरानगर या भागात राहतात.सुगंधाबाई यांचे पती शेतकरी होते.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमध्ये जात पंचायत विरोधी चळवळ उभा करणारे नव्या विचारांचे प्रवर्तक कृष्णा चांदगुडे यांचे ते आई-वडील आहेत.
तेरा वर्षापूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकरी असलेले त्र्यंबकराव चांदगुडे यांचे निधन झाले.त्यानंतर सुगंधाबाई चांदगुडे यांनी पती निधनानंतर समाजात चालत आलेल्या रुढी-प्रथेप्रमाणे जोडवी घातली नाहीत, टिकली लावली नाही, मंगळसूत्र घातले नाही.मुलगा मात्र पुरोगामी चळवळीत असल्यामुळे त्यांनी वडिलांचे श्राद्धकर्म करण्याऐवजी सामाजिक उपक्रम राबवले होते.
महाराष्ट्र कितीही पुरोगामी असला तरी अनेक कुटुंबांमध्ये विधवा अनिष्ट प्रथा ही कायम आहेच.कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याबाबतचा ठराव संमत केल्यानंतर त्यालाच अनुसरून राज्य शासनाने १७ मे रोजी एक परिपत्रक काढले आहेे.
राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विधवा अनिष्ट प्रथा बंद करणे संदर्भात ठराव करावा असे निर्देश यामध्ये देण्यात आलेले आहेेत. या बाबीची माहिती समजताच पुरोगामी विचाराचे पाईक असलेले कृष्णा चांदगुडे यांनी आपल्या विधवा आईला याबाबतची सर्व माहिती सांगितली आणि प्रसिद्ध झालेल्या संबंधित बातम्या दाखवल्या.







