डॉ.शंकरराव खरात स्मारकासाठी एक एकर जागा देणार !माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख
आटपाडी दि . ९ (प्रतिनिधी )
थोर साहित्यिक व आटपाडीचे सुपुत्र डॉ.शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी आटपाडी येथे एक एकर जागा देण्याची घोषणा ‘डॉ.शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी केली.
आटपाडी येथे दि.११ व १२ जुलै रोजी होत असलेल्या ‘डॉ.शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलन,आटपाडी २०२२’ या संमेलनाच्या नियोजनाच्या आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी येथील अंतिम बैठकीमध्ये अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
राजेंद्रआण्णा देशमुख पुढे म्हणाले, आटपाडीला साहित्याचा खूप मोठा वारसा आहे. कला,साहित्य,संस्कृती व इतर विविध क्षेत्रात जगभर नाव कमावणाऱ्या आटपाडीकरांचे योगदान खूप मोलाचे आहे. त्या समृद्ध परंपरेचे आपण वारसदार आहोत.दि.११ व १२ जुलै रोजी होत असलेले साहित्य संमेलन सर्वार्थाने यशस्वी होईल,असा मला आत्मविश्वास आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी गेली अनेक दिवस झटणारे साहित्यिक,कवी,लेखक,कथाकार आणि साहित्यप्रेमी या सर्वांच्या एकसंघ प्रयत्नातून या संमेलनाला मूर्त स्वरूप आले आहे. भागात आलेल्या कृष्णेच्या पाण्याने आटपाडी व लगतचे तालुके समृद्ध होणार आहेत.
तर या समृद्धीचा सदुपयोग सर्व क्षेत्रांना होण्यासाठी आटपाडीमध्ये विकासाच्या अनेक संकल्पना साकारल्या गेल्या पाहिजेत. कृषी विद्यापीठ, आटपाडी मार्गे जाणाऱ्या दोन नव्या रेल्वे मार्गांची निर्मिती करणे, त्याचबरोबर शेकडो युवकांना रोजगार देईल अशी व्यापक स्वरूपाची औद्योगिक वसाहत उभारणे हे महत्त्वाचे आहे. आपल्या साहित्याचा व जीवनकार्याचा मूळ गाभा शेतकरी संवर्धनाचा नेहमीच राहिला आहे.
डॉ. शंकरराव खरात यांचे स्मारक बहुउद्देशीय असले पाहिजे. या स्मारकाचा उपयोग समाजातील सर्व गुणवंत,प्रज्ञावंत आणि इतर क्षेत्रातील सर्वांना झाला पाहिजे, यादृष्टीने या स्मारकाची अभिनव रचना आपण सर्वांनी केली पाहिजे. हे स्मारक मराठी भाषेतील सर्वांना प्रेरणा देत राहील,अशीच याची व्याप्ती असली पाहिजे, असेही राजेंद्रआण्णा देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले.
प्रतिष्ठानचे सचिव विलासराव खरात यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अनेक मान्यवर, साहित्यिक कवी, लेखक यांनी विविध सूचना केल्या. या महत्त्वपूर्ण सूचनांवर सर्व समावेशक चर्चा झाली. त्यातील काही सूचनांचा स्वीकार करण्यात आला.आटपाडीचे माजी सरपंच शिवाजीराव तात्या पाटील, माजी जि . प सदस्य अरुण बालटे , भाजपाचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब काळेबाग,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, दै.’प्रगल्भनायक’चे संपादक लक्ष्मणराव खटके,आटपाडीचे माजी उपसरपंच प्रा.डॉ.अंकुश कोळेकर, प्राथमिक शिक्षकांचे नेते व आदर्श शिक्षक हैबतराव पावणे,माजी प्राचार्य डॉ.कृष्णा इंगोले, भिलवडी येथील कवी सुभाष कवडे, सुधीर इनामदार,प्रा.श्रीकृष्ण पडळकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुनील दबडे, प्रा.सिताराम सावंत, मेडशिंगीचे कवी शिवाजीराव बंडगर, माजी प्राचार्य तानाजीराव वाघमारे, माणगंगा कारखान्याचे संचालक आप्पासाहेब खरात, माडगुळेचे माजी सरपंच विठ्ठलराव गवळी, वसंतराव विभुते, आटपाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आनंदराव ऐवळे,भाजपा नेते स्नेहजीत पोतदार, मंगलनाथ देशमुख, दिलीप बोराडे, नरेंद्र दीक्षित, कृष्णा हनवते, प्रदीप लांडगे, आदि मान्यवर उपस्थित होते. प्रा.विजय शिंदे यांनी आभार मानले.
यावेळी स्नेहजीत पोतदार यांनी शंकरराव खरात यांच्या वीस प्रतिमा भेट देण्याचा संकल्प करून पाच प्रतिमांचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केले. यावेळी काही मान्यवरांनी संमेलनासाठी निधी दिला.
स्वागताध्यक्ष माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी डॉ. शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी देऊ केलेल्या एक एकर जागेच्या घोषणेबद्दल त्यांचे उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले.आपल्या स्वतःच्या मालकीच्या दोन एकर जागा एकाच महिन्यात क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी आणि थोर साहित्यिक डॉ. शंकरराव खरात या दोन महान व्यक्तींच्या स्मारकासाठी देण्याची घोषणा करणारे राजेंद्रअण्णा देशमुख या माणदेशी भूमीतील शाहूंचे खरे वारसदार असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.







