गणेशोत्सवाला महागाईची झळ/ फटका, जीएसटीमुळे मूर्तींच्या दरात 20 टक्के वाढ!
प्रतिनिधी -त-हाडी
गणेश मूर्तीच्या कच्च्या मालावर असलेल्या जीएसटीमुळे दरांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे पीओपीच्या दरात सुमारे 40 ते 50 टक्के वाढ झाल्याने गणेश मूर्तींच्या दरात सुमारे 20 टक्के वाढ करण्यात आली आहे.
दोन वर्षांपूर्वी जगभरामध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराने शिरकाव केला. यातून सर्वांचे जनजीवन ठप्प झालं. भारतात देखील निर्बंध लावण्यात आले. यामुळे सर्व सण उत्सव नियमांचे पालन करून साजरे करावे लागले. पण यंदा निर्बंध मुक्त झाल्याने सर्वच धर्मीय सण उत्सव हे मोठ्या उत्साहाने साजरे होत आहेत. पुढच्या महिन्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे.
मात्र, वाढत्या महागाई मध्ये रंग, माती आणि कारागिरांचा खर्च वाढल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेश मूर्तींच्या किंमती 20 टक्क्यांनी महागलेल्या असतील,असे सुरेश कुंभार मूर्तिकार सांगतात.
कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेश उत्सव निर्बंध मुक्त साजरा करण्यात येणार आहे. यासाठी मूर्तिकारांची 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. देशातील व राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव निर्बंध मुक्त साजरा करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे गणेश भक्तांसह जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.







