आटपाडी तालुक्यात वृक्ष लागवड जोमात -पण रोपे गेली कोमात….
यंत्राचा वापर, खड्डे अपुरे,रोपे सुकली, रोपांची आकडेवारी जुळवली…
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यांमध्ये खरसुंडी ,करगणी, मिटकी व घरनिकी येथे वन विभागाने वृक्ष लागवड मोठ्या जोमाने केली असून, सध्य परिस्थितीमध्ये रोपे सुकू लागलेली आहेत. तर अनेक ठिकाणी खड्डे रिकामेच आहेत. त्या खड्ड्यांमध्ये झाडे लावलीच नाहीत, काही ठिकाणी अर्ध्या फुटावर खड्डे आहेत ,त्यामध्ये झाडे लावली आहेत, तर अनेक ठिकाणी रोपे असलेल्या पिशव्या आहेत.त्यातील रोपे सुकून गेली आहेत. असा सर्व वृक्ष लागवडीचा गोलमाल वन विभागाने चालवला आहे.


झाडे लावा झाडे जगवा यासाठी महाराष्ट्र शासन करोडो रुपये खर्च करून झाडे लावण्यासाठी वन विभागावर जबाबदारी सोपवली असताना वन विभाग या जबाबदारी झटकून देत आहे. असे निदर्शनाला आले आहे.
यावर्षी घरनिकीत 5,500, करगणी 11,000 ,मिटकीत 9,000 तर खरसुंडी येथे 13,500 रोपांची लागवड केली आहे.
वरील सर्व ठिकाणी यंत्राच्या साह्याने खड्डे पाडण्यात आले आहेत, अनेक ठिकाणी अर्धा फूटच खड्डे पाडले आहेत ,दीड फुटापर्यंत खड्डा असावा असा शासनाचा नियम आहे. परंतु तो नियम डावलून कशीतरी झाडे लागवड करायची म्हणून केली आहे.यातील 50% रोपे सुकू लागली आहेत. सध्या रोपांना पाण्याची गरज आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेला खर्च हा वायफळ जाणार यात काही शंकाच नाही. मुळात लागवड खोलवर केली नाही, त्यामुळे रोपांची मरजड जास्त प्रमाणात होऊ लागली आहे. रोपे खोलवर लावली असती तर जमिनीतील ओलाव्यावर रोपे जिवंत राहीली असती.
याबाबत वनक्षेत्रपाल अशोक खाडे यांच्याशी संपर्क साधला असता म्हणाले मजुरांना शासनाचा दर परवडत नाही त्यामुळे यंत्राच्या साह्याने खड्डे पाडले आहेत.
तरी घरनिकी , खरसुंडी, मिटकी,
करगणी येथील लागण केलेल्या रोपांची चौकशी व्हावी. खड्डे किती फूट खोल काढले आहेत ,सध्या झाडांची स्थिती काय आहे, यंत्राच्या साह्याने खड्डे काढले किंवा मजूर लावून खड्डे काढले पाहिजेत या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ओबीसी चे जिल्हाध्यक्ष विलासराव काळेबाग यांनी केली आहे.



(लागवड केलेले रोपांची संख्या- खरसुंडी 13500, करगणी 11000 ,मिटकी 9000, घरनिकी -5500)
कोट – वृक्ष लागवडीच्या खड्ड्याची खोली कमी आहे. अनेक खड्ड्यामध्ये रोपेच नाहीत. सध्या सर्वच रोपे सुकू लागली आहेत. खड्डे यंत्राच्या साह्याने काढले आहेत, लावलेल्या रोपांची संख्या प्रत्यक्षात जुळत नाही. या सर्व प्रकाराची वरिष्ठाकडून चौकशी व्हावी – विलास काळेबाग (जिल्हाध्यक्ष -ओ.बी.सी. मोर्चा सांगली जिल्हा)
2) लागण केलेली रोपे सुकू लागली आहेत. त्यासाठी रोपांच्या पाण्यासाठी वरिष्ठाकडे पत्रव्यवहार करणार आहे. मजुरांना शासनाचा दर परवडत नसल्याने मशीनच्या साह्याने खड्डे काढले आहेत. काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात खड्डे निघाले आहेत. तसेच त्या भागातील वनरक्षकांकडून अधिक माहिती घेऊन चौकशी करतो.
अशोक खाडे (वनक्षेत्रपाल आटपाडी)
चौकट- वृक्ष लागवड करताना दीड फुटापर्यंत खड्डा काढलेला नाही. सद्यस्थितीमध्ये रोपे सुकू लागलेली आहेत. त्यांना पाण्याची गरज आहे, चार ठिकाणी 39 हजार रोपे लावली आहेत. सद्यस्थितीमध्ये वरील आकडा जुळून येत नाही. वनक्षेत्रपाल यांना विचारले असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही.तरी वनविभाच्या कामकाजाची चौकशी करण्याची गरज आहे.







