‘सर्जाराजा’ची यंदा मनोभावे पूजा
▪वर्षभर अशीच साथ देण्याचे घेतले वचन
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
त-हाडी / धुमधडाक्यात साजरा होणारा बैलपोळा यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी आपापल्या घराच्या अंगणातच बैलांची पूजा करून त्याच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. येणाऱ्या वर्षभर अशीच साथ देण्याची वचन जणू यानिमित्त बैलांनी आपल्या मालकाला दिले.
शेतकऱ्यांचा सच्चा मित्र म्हणून ओळख असलेल्या बैलांची पोळ्याच्या निमित्ताने मनोभावे पूजा केली जाते. वर्षभर आपल्या मालकाच्या सोबतीने घाम गाळत काळ्या आईची सेवा केल्यानंतर पोळा सणाला त्याच्या ऋणातून उतराई होण्याची वेळ असते. यानिमीत्त शेतकरीवर्ग बैलांप्रती आपला स्नेह, प्रेम आणि ऋण व्यक्त करतात. यानिमीत्त गावोगावी धुमधडाक्यात मिरवणुका काढल्या जातात. . पोळा सणानिमीत्त शेतकऱ्यांनी आपल्या अंगणातच सर्जाराजाला गोड नैवेद्य खाऊ घालत त्याची पूजा केली.
यानिमीत्त शेतकऱ्यांनी सकाळीच बैलांना अंघोळ घालून त्यांच्या अंगावर रंगबिरंगी झूल, रिबिनी, घुंगरमाळ, तसेच रंगरंगोटी करून आकर्षकरित्या सजविले होते. मिरवणुक काढण्यात आली असल्याने सायंकाळी सुवासिनींनी आपल्या अंगणातच बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालत पूजा केली. वर्षभर माझ्या धन्याला अशीच साथ दे आणि शेतीत माणिकमोती पिकवू दे अशी मागणी यावेळी सुवासिनींनी केली.
यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. शेतात पिके दिमाखाने डौलत आहेत. यंदा समाधानकारक उत्पन्न हाती येईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. यानिमित्त निसर्गाने अशीच साथ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी परमेश्वराकडे केली. शहरी भागात देखील महिलांनी मातीच्या बैलांची पूजा केल्याचे चित्र दिसून आले.
“त-हाडी गावात वाजतगाजत मिरवणूक!”







