ग्राहकांच्या प्रतिसादावरच छोट्या विक्रेत्यांची दिवाळी
त-हाडी ( वार्ताहर ) पूर्वी दिवाळीला : संपूर्ण अंगणभर मातीच्या पणत्या लावल्या जायच्या आणि याच पणत्या आणि इतर साहित्याच्या खरेदीमुळे कुंभार व्यावसायिकांची दिवाळी गोड व्हायची; परंतु गेल्या काही वर्षापासून बाजारात प्लास्टिकच्या पणत्या दाखल होऊ लागल्या आहेत. मातीच्या पणत्यांच्या तुलनेत प्लास्टिकच्या पणत्या स्वस्त असल्याने ग्राहक त्यांच्याकडे वळत आहेत. इंधन दरवाढ व महागाई आदींचा परिपाक म्हणून पारंपरिक कुंभार व्यवसाय धोक्यात येऊन त्यांचे दिवाळे निघण्याची वेळ आली आहे.
तेजोमय प्रकाशाच्या दिवाळीसाठी आवश्यक वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पणत्या, बोळके, नंदादीप, लामणदिवे,आकाशकंदील, रांगोळी, रांगोळीचे विविध ठसे, केरसुणी व रंगीबेरंगी दीपमाळा, लाह्या बत्ताशे, मेंदीचे कोन, विविध आकाराची तोरणे बाजारात दाखल झाली आहेत.
दिवाळीसाठी छोट्या विक्रेत्यांनी हातगाड्या भाड्याने घेतल्या आहेत, तर काही लोखंडी पलंग अथवा खाटेवर
माल मांडला आहे. काही विक्रेत्यांनी रस्त्यांवर थेट पथारी पसरली आहे. दिवाळी सणासाठी लागणारी प्रत्येक वस्तू माफक दराने खरेदी करता येत असल्याने गोरगरिबांपासून ते उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंतांपर्यंत साऱ्यांनीच खरेदीला छोट्या विक्रेत्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.
*ग्रामीण भागात घरोघरी केरसुणी विकून त्यापासून मिळणाच्या पैशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो परंतु यंदा पाऊस झाल्याने माल तयार करता आला नाही. त्यामुळे कोणतेच उत्पन्न नसल्याने दिवाळी कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळीतील उलाढालीवर पुढील वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते.
रत्नाबाई ईशी
*दिवाळीच्या चार दिवसांत चांगली कमाई होते. त्यावरच आमची दिवाळी साजरी होते. या काळात सकाळी नऊ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत विक्रीसाठी ठाण मांडून दुकानावर बसावे लागते. आमच्या घरातील व्यक्ती दिवभर क्रमाक्रमाने दुकानावर बसतात. सायंकाळी पाच वाजेनंतर मात्र बाजारात गर्दी होते, त्यावेळी घरातील सर्व सदस्यांना दुकानात बसावे लागते.
शिवाजी कुंभार त-हाडी







