त-हाडी परिसरात तुरीचे पीक जोमात; यंदा उत्पन्न वाढण्याची शक्यता
त-हाडी प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यातील त-हाडीसह परिसरात खरीपात लागवड केलेल्या तुरीच्या पिकांची मात्र उत्तम वाढ झाली असून सध्या तुरीच्या शेतात कळी व फुलांनी पिवळा शालू पांघरला असल्याचे सुखद चित्र पाहायला मिळत आहे. तुरीचे पिक बघता उत्पादनातही वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
यंदा परतीचा पाऊस देखील जोरदार बरसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली खरीपांची पिके पावसामुळे गेली. खरीपातील कापूस, मका ही नगदी पैसा देणारी पिके हातातून गेली. सोयाबिन व मका सोंगणीच्या काळातच ऐन पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली होती.
विशेष म्हणून कोरडवाहू क्षेत्रातील तुरीलाही परतीच्या पावसाचा चांगलाच फायदा झाला आहे. शेतकऱ्यांना या पिकांतून मोठे उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.
खरीप पिकांमध्ये तूर हे पिक उत्कृष्ट आलेले असून कापसाच्या तुलनेत तुरीला खर्च कमी असून यावर्षी तरी उत्पादन वाढणार आहे.
दरम्यान तुर हे खरिपातील शेवटचे पिक आहे. सध्या तुर ही फुलोऱ्यात असून एक ते दीड महिन्यात नविन तुर ही बाजारात दाखल होणार आहे. शिवाय आता पावसाने उघडीप दिली असल्याने धोका नाही मात्र, वातावरण बदलामुळे किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागलेला आहे.
मारुका अळीच्या व्यवस्थापनासाठी जिथे तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. तेथे सर्वेक्षण करून शेतात 20 ते 25 ठिकाणी प्रती मीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास किटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे.
फ्लूबेंडामाइड 20 डब्ल्यूजी 6 ग्रॅम किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू.पी 20 ग्रॅम किंवा नोवलुरोन 5.25 इंडोक्झाकार्ब 4.50 एससी 16 मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. – : महेंद्र पाटील, कृषी सहाय्यक त-हाडी







