विभूतवाडीत सहा महिन्यापासून शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित, महावितरणचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
आठ दिवसात विद्युत वाहिन्या जोडून शेतीपंप सुरू करावेत. अन्यथा महावितरणच्या कार्यालयासमोर कोणतीही सूचना न देता बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल- युवा नेते शंकर खर्जे
विभूतवाडी ता. आटपाडी येथे सहा महिन्यापूर्वी वादळाचा तडाखा बसला होता .या वादळाच्या तडाक्यामध्ये सलग चार दिवस विद्युत पंप व घरगुती लाईट बंद होती. वृक्ष उन्मळून पडले होते ,अनेकांच्या घरांचे नुकसान झाले होते, अनेकांच्या घराचे पत्रे उडाले यामध्ये अतोनात नुकसान झाले होते. त्यातच विभूतवाडीतील खर्जे मळा येथील उंबराची विहीर व खर्जे विहीर याकडे गावातून जाणारा विद्युत पुरवठा विद्युत वाहिन्या पडल्याने खंडित झाला होता.
याबाबत विभूतवाडीतील शेतकरी शंकर खर्जे यांनी अनेक वेळा महावितरण कडे विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी विनंती केली, परंतु गेले सहा महिने पासून अद्याप विद्युत पुरवठा सुरू केला नाही. त्यामुळे खर्जे मळा येथील दोन्ही विहिरीवरील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे .
विद्युत वाहिनी बंद असल्याने मोटारी बंद आहेत .विहिरीमध्ये पाणी भरपूर आहे, परंतु पाणी उपसा करायचा कशाने हा गंभीर प्रश्न आहे ,परंतु याकडे महावितरण जाणून-बुजून दुर्लक्ष करीत आहे, गेल्या सहा महिन्यापासून विद्युत वाहिन्या बंद असल्याने जवळपास 50 एकर क्षेत्र पडून आहे, याबाबत महावितरणला कोणतेही गांभीर्य नाही.
तरी महावितरण ने निदान रब्बी हंगामातल्या पिकासाठी तरी विद्युत वाहिन्या जोडाव्यात म्हणजे शेती पंपाने शेतीला पिकांना पाणी देता येईल ,अन्यथा पिकांचे नुकसान होणार असून संपूर्ण नुकसानीला महावितरण जबाबदार असणार आहे .
तरी आठ ते दहा दिवसाच्या आत मध्ये विद्युत वाहिन्या न जोडल्यास महावितरण च्या समोर कोणतीही सूचना न देता बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा नेते शंकर खर्जे यांनी दिला आहे







