21 वर्षाचा वनवास संपवा, प्राध्यापक व सेवकांची आ. अरुणअण्णा लाड यांच्याकडे याचना..!
24 नोव्हेंबर, 2001 पूर्वीची मान्यता असणाऱ्या अनुदान तत्त्वावरील महाविद्यालयात पाठीमागील 21 वर्षापासून विनावेतन सेवा करत असणाऱ्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सांगली येथे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा. अरुणअण्णा लाड यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याचना केली आहे.
आज दिनांक 05 डिसेंबर, 2022 रोजी 24 नोव्हेंबर, 2001 पूर्वीची मान्यता असणाऱ्या अनुदान तत्वावरील महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अनुदान कृती समितीच्या वतीने, आटपाडी येथील कला व विज्ञान महाविद्यालयाचे वतीने प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. रामदास नाईकनवरे, प्रा. नागेश चंदनशिवे, प्रा. भारती देशमुखे व प्रा. डॉ. बाळासाहेब कदम यांनी सांगली येथे पुणे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. अरुणअण्णा लाड यांची भेट घेतली व त्यांच्यापुढे आपला 21 वर्षाचा वनवास कथन करून आमच्या महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान द्यावे, अशी विनंती करण्यात आली.
प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते त्यांना निवेदन देण्यात. यावेळी प्राध्यापकांनी सांगितले की, आमचे संपूर्ण आयुष्य पगार नसल्यामुळे अनंत संघर्षात गेलं आहे. किमान आमच्या मुला बाळाच्या भविष्याची तळमळ पाहून तरी महाराष्ट्र शासनाने आम्हाला शंभर टक्के अनुदान देऊन पगार सुरू करावा व त्यासाठी मा. अरुणअण्णा लाड यांनी प्रयत्न करावेत, अशी तळमळची विनंती करण्यात आली.
यावेळी मा. आमदार अरुणअण्णा लाड यांनी सांगितले की, ‘मी उद्याच्या नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आपल्या समस्येसंदर्भात लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून, तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन.’







