हिवताडमध्ये लांडग्याच्या हल्ल्यात सहा शेळ्या मेंढ्या फस्त,
60.000 शेतकऱ्याचे नुकसान.
आटपाडी प्रतिनिधी
हिवतड ता. आटपाडी गावाच्या हद्दीतील खांडेकर वस्तीवर रात्री लांडग्याच्या कळपाने शेळ्या, मेंढ्याच्या वाड्यावर हल्ला करून सहा लहान मोठी जनावरे फस्त केली आहेत. यामध्ये शेतकऱ्याचे 60 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.
रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हिवतड गावापासून शुकनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या खांडेकर वस्तीवर काकासो धोंडीराम खांडेकर यांच्या शेळ्या मेंढ्याच्या वाड्यावर लांडग्याच्या काळपाने हल्ला करून शेळ्या, मेंढ्या व कोकरू अश्या सहाजण जनावराचा फडशा पाडला.
काकासो खांडेकर हे रात्री घरासमोरच पिकाला पाणी देत होते. मेंढ्यांचा ओरडण्याचा आवाज झाल्यानंतर मेंढ्या का ओरडतात हे पाहण्यासाठी त्यांनी वाड्याकडे धाव घेतली , असता लांडग्याच्या कळपांनी त्यांच्या शेळ्या, मेंढ्याच्या वाड्यावरती हल्ला केलेला दिसून आले. तेव्हा त्यांनी आरडा ओरड करण्यास सुरुवात केली. त्यांचाआवाज ऐकून घरातील व शेजारीपाजारी आवाज कशाचा आहे. म्हणून वाड्याकडे धावत आले. वाड्यामध्ये व वाड्याच्या आजूबाजूला बघतात तर हस्तव्यस्त पसरलेल्या शेळ्या मेंढ्यां झाल्या होत्या. त्या शेळ्या मेंढ्यांना एकत्र करून वाड्यात कोंडण्याचा प्रयत्न केला.
मात्र एवढ्या वेळामध्ये लांडग्याच्या टोळीने त्यांच्या वाड्यातील दोन मोठ्या मेंढ्या तीन कोकरे व एक बोकड अशी सहा जनावरे बाजूला नेऊन खाऊन फस्त केली होती.
यामध्ये या मेंढपाळाचे बाजारभावाप्रमाणे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सकाळी ही माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाचे शितल मांगले व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास बाजार भावाच्या 75 एवढी टक्के नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. मात्र वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या प्राण्यांवरती हल्ला करतात तेव्हा बऱ्याच वेळा लहान कोकरांना शेळ्या मेंढ्यांना हे प्राणी दूरवर घेऊन जातात व पूर्णपणे त्याला खाऊन संपवून टाकतात अशा वेळेला पंचनामा करण्यासाठी पुरावा उपलब्ध राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची सध्या तरतूद नाही. मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांतून मागणी होत आहे की ज्या ठिकाणी शेतकऱ्याचा प्राणी पूर्णपणे खाऊन संपवलेला असतो अशा परिस्थितीमध्ये त्याला मदत मिळण्यासाठी विशेष तरतूद असावी.
चौकट – लांडग्याने हल्ल्यामध्ये ज्या शेळ्या मेंढ्या मारल्या आणि ज्या प्रत्यक्षात शेळ्या-मेंढ्या मारलेल्या दिसतायेत त्याचाच पंचनामा केला जातो तर लहान पिल्लांना लांडगा उचलून लांब ठिकाणी घेऊन जातो त्याचा पंचनामा होत नाही व त्याची कोणतीही भरपाई मिळत नाही. तरी शासनाने लहान पिल्लांचा विचार करून त्यांनाही नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.







